आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... आणि वाघीण "खानदान की इज्जत' विसरली!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शेर अपनी शिकार खुद करता है’ या ज्ञात नियमाला हा अपवाद होता. बिबट्याची उरलेली शिकार खायला तयार झालेली वाघीण त्या क्षणी प्रथम भुकेजलेल्या तीन पिलांची आई होती. पिलांच्या भुकेपुढे वाघ खानदानाची इज्जत वगैरे तिच्यासाठी दुय्यम बाब होती. पिल्लांचे पोट भरणे हीच तिची प्रथम प्राथमिकता होती. पोटच्या पिलांसाठी आई कुठल्याही स्तराला जाऊ शकते, याचं ते उदाहरण होतं. 

 

दोन गाड्यांच्या हेडलाइट्समध्ये उपस्थितांनी ते दृश्य चवीने पाहिले.  सर्वांना चिडीचूप राहण्याच्या सूचना आधीच दिलेल्या होत्या, त्यामुळे बिबट्याच्या भोजन-यज्ञात बाधा उत्पन्न झाली नाही. प्रश्न खाण्याचा असला की तसाही बिबट्या कुणाची शरम बाळगत नसतो.

 

अमरावतीपासून १०५ कि.मी. अंतरावर वसलेल्या चिखलदरा या टुमदार थंड हवेच्या ठिकाणी वनविभागाच्या अखत्यारीतील रेंजर कॉलेजचा प्राचार्य म्हणून मी कार्यरत होतो, तेव्हाची ही घटना... चिखलदऱ्याच्या पश्चिमेकडील टोकाला हे रेंजर कॉलेज वसलेले आहे.  उत्तरेकडील चार हेक्टर जमिनीवर कॉलेजची इमारत, प्रशिक्षणार्थींचे वसतिगृह व क्रीडांगण तर दक्षिणेकडील चार हेक्टर जमिनीवर प्राचार्यांचा सरकारी बंगला आणि इतर क्वार्टर्स. समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंचीवर असलेले चिखलदरा हे स्थळ ब्रिटिशांनी आरोग्य उपचार स्थळ म्हणून स्थापन केले होते. चिखलदरा ते वैराट या सुळक्यावरून जाणारा हा रस्ता भौगोलिकदृष्ट्या पाणलोट रेषा (Watershed line) म्हणून ओळखला जातो. या रस्त्याच्या उत्तरेस पडणारे पावसाचे पाणी तापी नदीच्या ‘साक्री’ खोऱ्यात जाते तर दक्षिणेस पडणारे पावसाचे पाणी पूर्णा नदीच्या ‘पचंबा’ खोऱ्यात जाते. साक्री खोऱ्यातून पचंबा खोऱ्याकडे अथवा त्याच्या विरुद्ध अशी हालचाल करू इच्छिणाऱ्या वन्य जीवांना सुळक्यावरील पठार ओलांडण्याशिवाय पर्याय नसतो. रेंजर कॉलेजच्या कुंपणाला लागूनच प्राण्यांच्या आवागमनासाठी सोयिस्कर अशी एक खिंड होती. तिथून जंगली प्राण्यांचे आवागमन सुरू असायचे.  रेंजर कॉलेजच्या कुंपणाच्या आतूनच सुरक्षितरीत्या वाघ, बिबटे, अस्वल, रानडुक्कर, भेकर, सांबर इ. प्राण्यांचे दर्शन घेता येत असे.  


कॉलेजच्या कुंपणावर गस्तीसाठी दोन प्रशिक्षणार्थी आणि एक मजूर असा चमू तयार कला गेला होता. एका संध्याकाळी कुणा जंगली श्वापदाने गाय मारल्याची  वार्ता घेऊन ते माझ्या बंगल्यावर आले. त्यांना सोबत घेऊन मी घटनास्थळी पोहोचलो. कुंपणाबाहेर  एक गाय मरून पडली होती. जवळून निरीक्षण केले असता गायीच्या मानेवर सुळ्यांनी पडलेली भोकं होती आणि त्यातून रक्तप्रवाह सुरूच होता.  मानेवरच्या सुळ्यांच्या छिद्रांतील अंतर, गायीचे आकारमान आणि पंज्यांच्या ठशांवरून हा पराक्रम बिबट्याचा असावा, असा अंदाज बांधला. अंधार पडण्यास थोडा अवधी होता,  रात्र होताच बिबट्या पुन्हा शिकारीवर येणार, हे निश्चित होते. संध्याकाळी लहान, लहान गटात आम्ही घटनास्थळी दाखल झालो. पाहतो तर काय... बिबट्याचे डिनर आम्ही पोहोचण्याच्या आधीच सुरू झाले होते. त्याने पुढच्या पाऊण तासात शांतपणे गायीचा शक्य तेवढा फडशा पाडला. टॉर्चच्या प्रखर उजेडात ते दृश्य पन्नासच्या संख्येने उपस्थित प्रशिक्षणार्थींनी पाहिले. प्रशिक्षण काळातील हा अनुभव त्यांना आजीवन स्मरणात राहणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा घटनास्थळ गाठले.  बिबट्याने रात्री अंदाजे दहा एक किलो मांस फस्त केले होते. अजून भरपूर मांस शिल्लक असल्यामुळे तिथे बिबट्या पुन्हा येणार होता आणि म्हणूनच त्या जागेचे पर्यटन मूल्य अद्याप अबाधित होते.  झाडाच्या थुटात गायीचा एक पाय अडकल्यामुळे बिबट्या तिला ओढत आडोशाला नेऊ शकत नव्हता आणि हीच बाब आमच्या पथ्यावर पडली होती. संध्याकाळी पुन्हा बिबट्याचा "बुफे' पाहण्यासाठी आम्ही अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी एकत्र आलो. वक्तशीरपणाचा दाखला देत बिबट्या बरोबर साडेसातनंतर आला आणि त्याने उरलेल्या गायीचा काही भाग सार्थकी लावला. दोन गाड्यांच्या हेडलाइट्समध्ये उपस्थितांनी ते दृश्य चवीने पाहिले.  सर्वांना चिडीचूप राहण्याच्या सूचना आधीच दिलेल्या होत्या, त्यामुळे बिबट्याच्या भोजन-यज्ञात बाधा उत्पन्न झाली नाही. प्रश्न खाण्याचा असला की तसाही बिबट्या कुणाची शरम बाळगत नसतो. तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मृत गायीचे निरीक्षण केले,  दहा ते पंधरा किलो गाय अजून कमी झालेली दिसली.  


बिबट्याच्या डिनरची वार्ता आता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रमाणेच तेथून परतवाड्याला मुक्कामी असलेल्या माझ्या पत्नी आणि मुलांपर्यंतसुद्धा पोहोचली आणि संध्याकाळी रेंजर कॉलेजच्या कुंपणात अक्षरश: प्रेक्षक गॅलरीच तयार झाली. सर्वांना आवाज न करता बसण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु बिबट्याला आजच्या व्यवस्थेची चाहूल लागली असावी. आज काही केल्या पाहुणे जेवायला उगवले नाही. रात्री आठनंतर त्या परिसरात अस्वलांचा वावर सुरू होतो.  त्यामुळे बहुतेकांनी परतीची वाट धरली.  मी आणि कुटुंंबीय मात्र एका गाडीत बसून राहिलो. काही प्रशिक्षणार्थी सोबतीला होतेच.  सुमारे एक तास आम्ही शांतपणे, शिस्तीत  बसून होतो.  अचानक हाडूक चावून फोडल्यासारखा आवाज आला,  लगेच गाडीचा हेडलाइट ऑन केला.  गायीच्या अवशेषांपाशी हालचाल नक्कीच होती.  दुर्बीण चिरंजीवांनी डोळ्याला लावली होती.  तो म्हणाला, “ बाबा, वाघ आहे.”  मी त्याच्यावर डाफरलो, “ अरे शहाण्या, शिकार बिबट्याने केली आहे.  वाघ कसा असणार ?”  तेवढ्या वेळात त्याच्या हातून मॅडमने दुर्बीण स्वत:च्या हातात घेतली.  तिने ते दृश्य दुर्बिणीतून नीट बघितले आणि काही न बोलता दुर्बीण माझ्या हाती दिली.  दुर्बिणीतून पुढील दृश्य पाहून मी उडालोच! डोळ्यांवर विश्वास बसेना.  एक, दोन, तीन नव्हे... एकूण चार वाघ गायीच्या देहाभोवती होते.  माझ्या तोंडून शब्द फुटले, “ वाघ!  वाघच आहेत !! एक नव्हे चार, चार आहेत !!” पत्नी म्हणाली, “मला आधीच दिसले होते. पण मला ‘शहाणं’ ठरायचं नव्हतं म्हणून मी गप्प बसले.” साक्षात चार-चार वाघ समोर असूनही उपहासाची कला न विसरणाऱ्या बायकोचं मला त्याही स्थितीत कौतुक वाटलं. हे अद्भुत दृश्य कुणाकुणाला दाखवू असं मला झालं होतं.  वसतिगृहावर निरोप धाडला. काही प्रशिक्षणार्थी गाडीपर्यंत येऊन वाघीण आणि तिचे  मोठे व्हायला आलेले तीन छावे याची डोळा पाहून गेले. भोजनाची पहिली फेरी आटोपल्यावर वाघिणीने उर्वरित ढाचा ओढून झाडीआड नेण्याचा प्रयत्न केला. भक्ष्य ओढून नेण्यामागे नेमका अडथळा कोणता याचे निदान चाणाक्ष वाघिणीने लगेच केले होते. इतकी अक्कल नैसर्गिकरीत्या प्राप्त असल्यामुळेच वाघ घराण्याला जंगलात राजघराण्याचा दर्जा प्राप्त आहे. काही क्षणांत वाघिणीने दातांनी चावून, चावून गायीच्या पायापासून खूर वेगळे केले आणि उर्वरित ढाचा ओढत झुडपाआड घेऊन गेली. आधी बिबट्या आणि नंतर वाघ कुटुंबीयांच्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भोजन यज्ञाची आमच्यापूर्ती सांगता झाली होती. इतक्या मोठ्या संख्येतील व्याघ्र-दर्शनाची माझी ही पहिलीच वेळ होती.  हे अहोभाग्य जंगलात फिरताना नव्हे तर, रेंजर कॉलेजचा प्राचार्य असताना लाभले, हे विशेष.  चिरंजीवांनी ‘वाघ आहे’ म्हटल्यावर त्याला ‘शहाणा’ ठरविण्यामागे ‘वाघ  दुसऱ्या प्राण्याने केलेली उष्टी शिकार खात नसतो’,  हा समज होता. ‘शेर अपनी शिकार खुद करता है’ या ज्ञात नियमाला हा अपवाद होता.  बिबट्याची उरलेली शिकार खायला तयार झालेली वाघीण त्या क्षणी प्रथम भुकेजलेल्या तीन पिलांची आई होती.  पिल्लांच्या भुकेपुढे वाघ खानदानाची इज्जत वगैरे तिच्यासाठी दुय्यम बाब होती. पिलांचे पोट भरणे हीच तिची प्रथम प्राथमिकता होती. पोटच्या पिलांसाठी आई कुठल्याही स्तराला जाऊ शकते, याचं ते उदाहरण होतं. तीन छावे मोठे करायचे म्हणजे तिला प्रॅक्टिकल होणे गरजेचे होते. अख्ख्या जंगलात तिची दहशत असली तरी तिच्या पिलांसाठी ती माधव ज्युलियनांची ‘वात्सल्यसिंधू आई’ च होती.  

 

शब्दांकन : जी. बी. देशमुख
gbdeshmukh21@rediffmail.com

संपर्क : ९४२३१२४८३८

 

बातम्या आणखी आहेत...