आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात पाहुणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रवींद्र वानखडे  

बाहेरच्या बाजूला तैनात एका पीएसआयला फटीतून बिबट्याची हालचाल दिसली आणि पाठमोरा बिबट्या अगदी दहा-बारा फुटांवर बसला असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने फारसा विचार न करता सर्व्हिस रिव्हॉल्व्हर बाहेर काढले आणि त्या फटीतून नेम धरून चाप ओढला. रिव्हॉल्व्हरचा आवाज ऐकताच बिबट्याने झाडीच्या दिशेने धूम ठोकली आणि तो  दृष्टीआड झाला.   
 
अ कोला शहरात त्या दिवशी खळबळ माजली होती. शहराच्या मध्यवर्ती भागात एक तरुण, चपळ नर-बिबट्या तीनमजली इमारतीच्या गच्चीवर चढून पाण्याच्या टाकीवर मस्तपैकी ऊन खात बसलेला होता. मेळघाटच्या सीमेलगतच्या गावांकडून होणाऱ्या बांबू वाहतुकीच्या वाहनात चढून कुणाच्याही नकळत, विनामूल्य प्रवास करत अकोल्याच्या प्रमुख बाजारपेठेत तो आपसूक दाखल झाला असावा. सिमेंटच्या जंगलातील बघ्यांची गर्दी पाहून विचलित झालेला मेळघाटच्या अस्सल जंगलातील हा पाहुणा गर्दीपासून दूर सुरक्षित स्थळी जाऊ पाहत होता.  

थोड्याच वेळात स्थानिक प्रशासन जागे झाले. गर्दी नियंत्रणासाठी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. अकोल्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपवनसंरक्षक वन्यजीव व त्यांचे कर्मचारी असा बंदोबस्ताचा उच्चस्तरीय जामानिमा होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तेव्हा सहायक वनसंरक्षक म्हणून कार्यरत असलेला मी बंदुकीतून "ट्रँक्विलायझर डार्ट' मारणारा प्रशिक्षित अधिकारी होतो. वनसंरक्षकांचा आदेश मिळाला. पिलारीसेठ हे अनुभवी रेंज अधिकारी आणि मी अशा दोघांनी अकोल्याकडे प्रस्थान केले.

अकोल्यात घटनास्थळी पोहोचेपर्यंत सावल्या लांब झाल्या होत्या. बिबट्या पकडण्याच्या प्रयत्नात चार-पाच उत्साही युवक जखमी झाले होते. अनेक स्थळ बदलवून झाल्यानंतर आता हा भेदरलेला पाहुणा शहराच्या मध्यवर्ती भागातील आगरकर शाळेच्या आवारात ठाण मांडून बसला होता. शाळेच्या ब्रिटिशकालीन दुमजली दगडी इमारतीला एक-दीड एकराचे भव्य प्रांगण होते.  मुख्य रस्त्याच्या बाजूला लांबच लांब भिंत आणि त्या भिंतीवर टोकदार भाल्यांच्या आकाराचे लोखंडकाम. चारपैकी दोन बाजू इंग्रजी एल आकारातील भिंतींनी सुरक्षित होत्या, पण उर्वरित दोन बाजू कच्चे कुंपण किंवा झाडींवर विसंबून होत्या.  मुख्य रस्त्याला लागून असलेल्या भिंतीच्या आतल्या भागात एक विशाल काटेरी बाभळीचे (प्रोसोरिस) झाड होते, ज्याच्या फांद्या जमिनीपर्यंत लोंबकळत होत्या आणि याच फांद्यांच्या खाली विराजमान होता आपला रुबाबदार पाहुणा.  

अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत मी त्यांना सांगितले की, वेड्याबाभळीच्या फांद्यांच्या आडोशाला तो बसला असल्यामुळे डार्ट त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. शेवटी असं ठरलं की, झाडाच्या वरून जाळे सोडावे आणि बिबट्याला पूर्ण झाडासहित जाळ्यात घेऊन मग पुढील कारवाई करावी. “अजिंक्य साहसी” नावाचे तरुणांचे एक क्रीडा मंडळ सकाळपासूनच बिबट्याच्या थरारात स्थानिक प्रशासनाला मदत करत होते. प्रचंड घेर असलेल्या त्या संपूर्ण झाडाला कवेत घेईल इतकी मोठी जाळी कुठून आणायची, असा प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला. ताबडतोब  मिळेल तिथून फुटबॉलच्या गोल-पोस्टच्या मोठमोठ्या जाळ्या काढून आणल्या. फायर ब्रिगेडच्या गाडीवरची शिडी लांबवत झाडाच्या शेंड्यापर्यंत नेली गेली. शिडीवर मी स्वत: उभा राहिलो आणि सावकाश फुटबॉलचे जाळे त्या विशाल वृक्षावरून खाली उतरवू लागलो.  सुरुवातीला काहीशी अतर्क्य वाटणारी ही क्लृप्ती प्रत्यक्षात येऊ लागली होती. बिबट्यासहित संपूर्ण झाड जाळ्याने कवेत घेतले होते. मात्र जाळे पूर्णपणे जमिनीपर्यंत टेकले नव्हते. त्यावर पिलारीसेठ यांनी स्थानिक युवक आणि वनकर्मचाऱ्यांच्या साहाय्याने तारेची सलग जाळी (chainlink) झाडावरून खाली टाकल्या गेलेल्या जाळ्याच्या खालच्या भागाला लावून बिबट्याला बंदिस्त करायचे, असे ठरवले.

सर्वांना दक्ष करण्यात आले. जाळी धरून जवळ जाणाऱ्यांना शिरस्त्राण आणि चिलखत चढवण्यात आले होते. त्यांचे नेतृत्व पिलारीसेठ यांच्याकडे होते. मी वेड्याबाभळीच्या वरून अग्निशमन दलाच्या गाडीवरील शिडीवर बसून निर्देश देत होतो. जसजशी जाळी धरलेली फौज झाडाच्या दिशेने पुढे सरकू लागली, बिबट्या सावध झाला. परंतु अपेक्षेनुसार जाळी धरून येणाऱ्यांकडे न जाता हा स्मार्ट पाहुणा आठ फूट उंच भिंतीवरून उडी घेऊन बाहेर निघू शकेल याची आम्ही कल्पना केली नव्हती. पण घडले तसेच... बिबट्या भिंतीवर एका झेपेत चढला तशी भिंतीवरील लोखंडी बाणांमध्ये तात्पुरती खोचलेली जाळी अलगद निसटली आणि तो भिंतीवरून बाहेर झेपावला. ट्रँक्विलायझर रिव्हॉल्व्हर घेऊन अग्निशमन दलाच्या गाडीवरील शिडीच्या पायरीवर उभा असलेला मी उभाच राहिलो. बिबट्या भिंत ओलांडून बाहेर पडला आणि बघ्यांची त्रेधा उडाली. वाट मिळेल तसे लोक पळत सुटले. भिंतीवरून बाहेर उडी घेताच समोर आलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यास बिबट्याने सहज ढकलले. बाहेरील अभूतपूर्व गोंधळ पाहून त्याने निर्णय बदलला. भिंतीवर उडी घेऊन परत वेड्याबाभळीच्या झाडाखालच्या आधीच्याच सुरक्षित ठिकाणी तो येऊन बसला. सर्वकाही काही क्षणांच्या अवधीत घडले.    

रात्रीची वेळ होती. परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्ठांनी मला बहाल केला होता. शक्यतो बिबट्यास जेरबंद करावे आणि ते शक्य न झाल्यास त्याला थेट गोळी घालावी असे ठरले होते. प्रथम त्या परिसरात सर्च लाइटची व्यवस्था केली आणि दोन शार्प शूटर मोक्याच्या ठिकाणी तैनात केले. मध्यरात्रीनंतर हे सगळे घडत होते. मी व माझे सहकारी गुंगीच्या औषधाचे बाण (dart) आपापल्या बंदूक आणि रिव्हॉल्व्हर मध्ये भरून बिबट्या बसला होता त्या भिंतीला लागून असलेल्या एका पानटपरीच्या छतावर पोझिशन घेऊन बसलो होतो. वेड्याबाभळीच्या झाडाखालून बिबट कधी बाहेर येतो, एवढा एकच ध्यास आम्हाला लागला होता. आणि अचानक ते घडले. बिबट्या उठला आणि तीरासारखा सुटला. शार्प शूटरांनी बंदूकीचे चाप ओढले.  ठो, ठो आवाज झाले, दोन्ही नेम चुकले होते. ज्या पानटपरीवर आम्ही पोिझशन घेऊन बसलो होतो तिला लागून असलेल्या मोठ्या वृक्षावर बिबट्या वेगाने चढला. अंदाजे पंधरा ते वीस फूट उंचीवर बुंध्याला कवटाळून तो काही क्षण स्थिरावला. मी आणि माझा सोबती आता त्याच्यापासून फक्त पाच फुटांच्या अंतरावर होतो.  ट्रँक्विलायझरचा बाण वरच्या दिशेने सोडणे शक्य नव्हते. तरी पण माझ्यासोबतच्या पिलारीसेठ यांनी रिव्हॉल्व्हरचा चाप ओढला.   डार्ट बिबट्याला लागला.  बिबट्या सावध झाला आणि बुंध्यावरील पकड सैल करत जमिनीवर उतरला. थोडी उसंत घेऊन तो  एक-दीड फूट उंचीच्या गवतात दिसेनासा झाला. आणि एक अनपेक्षित घटना घडली. भिंतीच्या कॉलमच्या बाजूला उभी फट होती. बाहेरच्या बाजूला तैनात एका पीएसआयला फटीतून बिबट्याची हालचाल दिसली आणि पाठमोरा बिबट्या अगदी दहा-बारा फुटांवर बसला असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने फारसा विचार न करता सर्व्हिस रिव्हॉल्व्हर बाहेर काढले आणि त्या फटीतून नेम धरून चाप ओढला. रिव्हॉल्व्हरचा आवाज ऐकताच बिबट्याने झाडीच्या दिशेने धूम ठोकली आणि तो  दृष्टीआड झाला. 
  
काळोखात बिबट्या गेला. रात्रीचे दोन वाजून गेले होते.  शोधमोहीम राबवली गेली. त्या  संपूर्ण परिसरात रात्रभर गस्त घातली गेली, पण बिबट्या नजरेस पडला नाही.  सकाळी पुन्हा नव्या जोमाने मैदानातील झुडपांच्या परिसरात शोधमोहीम सुरू झाली. एका झोपडीच्या अंगणातील पाण्याच्या रांजणाजवळ बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून पडले. संध्याकाळी आम्ही आपापल्या मुख्यालयात परत आलो.  त्यानंतर पूर्ण अकोला शहरात दोन दिवस शोधमोहीम जारी होती, पण बिबट्या मिळता तर शपथ. अकोल्याचे प्रशासन त्यांच्या दिनचर्येत रुळले. हळूहळू सामान्य जनतेच्या स्मृतीतून तो प्रसंग धूसर होत गेला. तो बिबट्या कुठे अंतर्धान पावला त्याचे कोडे कधीच सुटले नाही. अज्ञातातून आलेला हा पाहुणा अज्ञातात निघून गेला होता.  

शब्दांकन : जी. बी. देशमुख
संपर्क : ९४२३१२४८३८
gbdeshmukh21@rediffmail.com

बातम्या आणखी आहेत...