आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​दोन महिने थांबा; काँग्रेस, राष्ट्रवादीला लागेल गळती, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे भाकीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - 'निवडणुकांना अजून सहा महिन्यांचा अवधी आहे. फक्त दोन महिने थांबा. राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांना गळती लागणार आहे', असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. समविचारी पक्षांबरोबर निवडणुका लढवण्याची आमची तयारी आहे; परंतु 'त्यांची' तशी तयारी नसेल तर आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, असेही त्यांनी शिवसेनेचा नामोल्लेख न करता स्पष्ट केले. 


दानवेंनी सोमवारी 'दिव्य मराठी'च्या नगर कार्यालयाला भेट दिली. या वेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी उपस्थित होते. 'नशिबाच्या जोरावर निवडणुका लढण्याचे दिवस आता संपले आहेत. भाजप विकासाचा अजेंडा घेऊन संघटनेच्या बळावर निवडणुकींना सामोरे जाईल, असा टोला दानवे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला. 


निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अन्य पक्षांतील अनेक नेते इच्छुक आहेत. असाच प्रयोग २०१४ मध्ये झाला, त्यानंतर अशा आयात उमेदवारांचा अनुभव कसा होता? या प्रश्नाच्या उत्तरात दानवे म्हणाले, 'अनुभव अतिशय चांगला होता. पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांचे नेहमी स्वागतच होते. कारण भाजप हा सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन जाणारा सर्वसमावेशक पक्ष आहे. प्रवेश करताना काही अपेक्षा नेत्यांच्या असतात. त्या गैर नव्हते. परंतु पक्षाच्या ध्येयधोरणानुसार योग्य व्यक्तीला योग्य ती संधी देण्याचे काम आजपर्यंत पक्षाने केले आहे.

 
भारतीय जनता पक्षात येणाऱ्यांचा सन्मानच 
भाजपमध्ये प्रवेश करणारी व्यक्ती ही केवळ संघाचीच असली पाहिजे, असे नाही तर राष्ट्रहिताचे विचार असणारी, कोणत्याही जाती-धर्माची व्यक्ती असेल तरीही त्याला प्रवेश देण्याचे धोरण भाजपचे आहे, असेही दानवे म्हणाले. येत्या दोन महिन्यांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढणार आहे. अशा सर्व नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा पक्षस्तरावर यथोचित सन्मान केला जाईल, याची ग्वाही त्यांनी दिली

बातम्या आणखी आहेत...