आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकास दराची चिंता असल्याने रिझर्व्ह बँकेची व्याजदरात घट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण आढावा समितीच्या पहिल्या बैठकीत रेपो दर ०.२५% कमी करण्याचा निर्णय झाला. बँकेने आधीचा कडक दृष्टिकाेनही न्यूट्रल केला आहे. महागाई दर कमी असला तरी जागतिक बाजाराची स्थिती पाहता विकासाची चिंता असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे शेअर बाजार आणि बाँड बाजारात आनंद दिसला नसला तरी रुपयात सुधारणा झाली आहे. व्याजदर कमी झाल्याने सरकारसाठीही बाजारातून उधार घेणे स्वस्त होणार आहे. 

 

अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये आणखी घसरणीची शक्यता 
अनिल अंबानी समूहाने आरोप केला की, एलअँडटी फायनान्स आणि अॅडलवाइजने अवैध पद्धतीने कंपन्यांचे गहाण ठेवलेले शेअर विकले आहेत. यामुळे कंपनीचे मूल्य सुमारे ५५ टक्के म्हणजेच १३,००० कोटी रुपयांनी कमी झाले आहे. तर आम्ही नियमानुसारच या शेअरची विक्री केली असल्याचे एलअँडटी आणि अॅडलवाइज यांनी स्पष्ट केले आहे. आरकॉमने एनसीएलटीमध्ये जाणार असल्याची घोषणा केल्यानंतरच समूहाच्या कंपन्यांचे शेअर विकले होते. या आठवड्यात यातही घसरणीची शक्यता आहे. 

 

जेट एअरमध्ये अध्यक्ष नरेश गोयल करणार २५० कोटी रुपये गुंतवणूक 
जेट एअरवेजमध्ये अध्यक्ष नरेश गोयल २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. जेटने अद्याप पायलट आणि इंजिनिअर यांचा नोव्हेंबरचा ५० टक्केही पगार दिलेला नाही. कर्ज फेडण्यास कंपनीने डिफॉल्ट केले आहे. भागीदार कंपनी एतिहाद एअरवेजने काही अटींसह २५० कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली आहे. या अटींनुसार एअरलाइनमध्ये गोयल यांना भागीदारी ५१% वरून कमी करून २२ टक्के करावी लागेल. तर एतिहादचा वाटा २४ टक्क्यांवरून वाढून ४० टक्के होईल. कर्ज देणाऱ्याच्या शेअरची भागीदारी ३० टक्क्यांच्या जवळपास राहण्याचा अंदाज आहे. यात एसबीआयचा सर्वाधिक १५ टक्के वाटा असेल. गोयल संचालक मंडळातून राजीनामा देतील. त्यांच्या जागी त्यांचा मुलगा निवान संचालक मंडळात असेल.
 
झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा पेमेंटसाठी वैयक्तिक गॅरंटी देतील 
झी समूहाला कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांनी ते फेडण्यासाठी अध्यक्ष सुभाष चंद्रा यांची वैयक्तिक गॅरंटी मागितली आहे. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या औपचारिक करारानंतर वित्तीय संस्थांचे समूहावरील नियंत्रण वाढणार आहे. झी' ला शेअर विक्री करण्याच्या आधी त्यांच्यासोबत करार करायचा आहे. शेअरच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशासाठी एस्क्रो खातेदेखील उघडायचे आहे. समूहावर सुमारे १३,५०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाच्या सिक्युरिटीसाठी झी एंटरटेनमेंटसारख्या कंपन्यांचे शेअर गहाण ठेवले आहेत.
 
व्होडाफोन-आयडियाच्या प्रदर्शनाबाबत पुढील काळात चांगली अपेक्षा 
विलीनीकरणानंतर दुसऱ्या तिमाहीत, ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये व्होडाफोन-आयडियाला ५,००४ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. सप्टेंबर तिमाहीमध्ये ४,९७४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ग्राहकांची संख्या ३.५ कोटींनी कमी झाली असली तरी प्रति युजर सरासरी महसुलात वाढ झाली आहे. महसूल २.२ टक्क्यांनी कमी हाेऊन ११,७६४ कोटी राहिला, एबिटा १६.३% सुधारला आहे. सप्टेंबरच्या तुलनेमध्ये डिसेंबर तिमाहीमध्ये व्यवस्थापनावरील खर्च ७५० कोटी रुपये कमी झाला आहे. गुंतवणूकदारांना भविष्यात सुधारण्याची अपेक्षा आहे. यामुळे शेअरचे भाव स्थिर आहेत. 

 

ब्रोकर देताहेत टाटा मोटर्सचे शेअर विक्री करण्याचा सल्ला 
टाटा मोटर्सला कन्सोलिडेटेड आधारावर विक्रमी २६,९६० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. डिसेंबर तिमाहीमध्ये महसूल ७७,६८२ कोटी रुपये राहिला. जग्वार लँडरोव्हरच्या संपत्तीच्या मूल्यामुळे (अॅसेट इंपेअरमेंट) कंपनीला इतके मोठे नुकसान झाले आहे. तोटा झाल्याचे वृत्त आल्यानंतर टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स डीव्हीआर (नॉन-व्होटिंग) च्या शेअरमध्ये २०% पेक्षा जास्त घसरण झाली. ब्रोकरदेखील शेअर विक्री करण्याचा सल्ला देत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...