आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिझर्व्ह बँकेने व्याजदर 0.25% घटवले, बँकांनी एवढीच कपात केल्यास गृहकर्जाचा ईएमआय घटणार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारती रिझर्व्ह बँकेने गुरुवारी १९ महिन्यांनंतर रेपो दरात ०.२५ टक्के कपात केली. यापूर्वी ऑगस्ट २०१७ मध्ये व्याजदर घटवले होते. आता व्यापारी बँकांनीही कर्जावरील व्याजदरात एवढीच कपात केली तर २५ लाख रुपयांच्या गृह कर्जाचा मासिक हप्ता (ईएमआय)३९८ रुपयांनी कमी होईल. तसेच ५ लाख रुपयांच्या वाहन (कार) कर्जाचा ईएमआयमध्ये ६० रुपयांनी घट होईल. अर्थमंत्री पीयूष गोयल म्हणाले, व्याजदरातील कपातीमुळे घर खरेदी करणाऱ्यांना अाणि छोट्या व्यावसायिकांना कर्ज स्वस्तात उपलब्ध होईल. यामुळे अर्थचक्र गतिमान होईल. 

घाऊक महागाई दरातील घसरण लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने आपले आगामी काळात धोरण कडकवरून सर्वसामान्य (नॉर्मल) असे केले आहे. या धोरणाच्या आधारावरच रिझर्व्ह बँक व्याजदरातील घट-वाढ ठरवत असते. कारण सध्या महागाई दर २.१९ टक्के या दीड वर्षाच्या नीचांकावर आहे. यावरून एप्रिलच्या पतधोरणात रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे. 

 

गृह कर्ज : ५० लाखांवर ८०० रुपये बचत 
कर्ज रक्कम नवा ईएमआय जुना ईएमआय बचत 
२५ लाख २१,७७५ २२,१७३ ३९८ 
५० लाख ४४,०२६ ४४,८२६ ८०० 
७५ लाख ६६,०३९ ६७,२३८ ११९९ 
( ३० लाखांच्या कर्जावर सध्या ८.८० टक्के आणि ३० ते ७५ लाखांवर ८.९५ टक्के व्याज आहे. नव्या ईएमआयसाठी व्याजदरात ०.२५ टक्के कपात गृहीत धरली आहे. ) 

 

वाहन कर्ज : १० लाखांवर १२३ रुपये बचत 
कर्ज रक्कम नवा ईएमआय जुना ईएमआय बचत 
५ लाख १०,४८९ १०,५५० ६१ 
१० लाख २०,९७७ २१,१०० १२३ 
(जुना ईएमआय ९.७० टक्के, नवा ईएमआय ९.४५ टक्के व्याजावर आधारित आहे.) सर्व आकडे रुपयांत 


निवडणुकांवर डोळा : महागाई वाढू नये 

यासाठी यापूर्वी व्याजदर घटवले नाहीत 
- तज्ज्ञांच्या मते, अंतरिम अर्थसंकल्पातील प्रस्तावामुळे आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे. अशी शक्यता असल्यास रिझर्व्ह बँक व्याजदर घटवत नाही. 
- रिझर्व्ह बँकेच्या निर्णयापूर्वी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ६५ विश्लेषकांशी चर्चा केली. त्यापैकी ६७ टक्के अर्थात ४४ जणांनी दर 'जैसे थे'ची शक्यता वर्तवली होती. मात्र, घडले नेमके उलटे. 
- गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या काळात ऑगस्ट २०१७ ते मे २०१८ पर्यंत रेपो दर ६ टक्क्यांवर स्थिर होता. महागाईचे कारण सांगत ते घटवले नाहीत. मात्र जून २०१८ मध्ये दर ०.२५ टक्के वाढवला. 

 

सरकार, बँका, लोकांचा फायदा कसा, हे समजून घ्या 

सरकार : बाजारातील कर्जावर कमी व्याज द्यावे लागेल 
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी रोख व कामगारांसाठी पेन्शनची तरतूद आहे. त्यासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागेल. व्याज कमी झाल्याने सरकारचा फायदा होईल. 

 

हमीशिवाय कृषी कर्ज मर्यादा १ वरून १.६० लाख झाली 
रिझर्व्ह बँकेने हमीशिवायच्या (गॅरंटी) कृषी कर्जाची मर्यादा वाढवली आहे. आतापर्यंत ही मर्यादा एक लाख होती. रिझर्व्ह बँकेच्या मते, शेतीतील वाढता खर्च लक्षात घेता ही मर्यादा आता १,६०,००० रुपये केली आहे. यापूर्वी ही मर्यादा २०१० मध्ये वाढवली होती. कृषी कर्जातील समस्या निराकरणासाठी रिझर्व्ह बँक एक वेगळी समिती नेमणार आहे. 

 

लोक आणि बँक : मोठ्या ठेवींची मर्यादा २ कोटी झाली 
रिझर्व्ह बँकेने बल्क डिपॉझिटची मर्यादा एकवरून वाढवून दोन कोटी रुपये केली. अशा ठेवींवर बँका अधिक व्याज देतात, यामुळे लोकांचा फायदा होईल. 
 

 

बातम्या आणखी आहेत...