रसेलच्या झंझावाती खेळीने काेलकात्याची विजयी गुढी; काेलकाता नाइट रायडर्स संघाची बंगळुरूवर पाच गड्यांनी मात

वृत्तसंस्था

Apr 06,2019 09:05:00 AM IST

बंगळुरू - सामनावीर आंद्रे रसेलच्या (नाबाद ४८) झंझावाती खेळीच्या बळावर काेलकाता नाइट रायडर्सने शुक्रवारी आयपीएलच्या आपल्या चाैथ्या सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद केली. दिनेश कार्तिकच्या काेलकाता संघाने लढतीत विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा घरच्या मैदानावर पराभव केला. काेलकाता संघाने १९.१ षटकांत पाच गमावत विजयश्री खेचून आणली. रसेलने झंझावाती खेळी करून काेलकाता संघाला लीगमध्ये तिसरा विजय मिळवून दिला. दुसरीकडे यजमान बंगळुरू संघाचा घरच्या मैदानावर पराभवाची मालिका खंडित करण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. बंगळुरूच्या संघाला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला.


यजमान बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २०५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात काेलकाता संघाने पाच गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या काेलकाता संघाकडून सुनील नरेन (१०) आणि राॅबिन उथप्पाने (३३) अर्धशतकी भागीदारी केली. यासह त्यांनी संघाच्या विजयाचा मजबूत पाया रचला. त्यानंतर आंद्रे रसेलने नाबाद ४८ धावांची झंझावाती खेळी केली आणि विजयश्री खेचून आणली. त्याने ७ उत्तंुग षटकार खेचून ही खेळी केली.

काेहलीचा झंझावात व्यर्थ :

संघाच्या पराभवाची मालिका खंडित करण्याच्या इराद्याने काेहलीने शनिवारी आपल्या घरच्या मैदानावर तुफानी फटकेबाजी केली. यातूनच त्याने झंझावाती अर्धशतक झळकावले. त्याने ४९ चेंडूंमध्ये ९ चाैकार आणि दाेन षटकारांसह ८४ धावांची खेळी केली. मात्र, त्याला आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. याशिवाय त्याला डिव्हिलयर्सची माेलाची साथ मिळाली. डिव्हिलियर्सनेही (६३) शानदार अर्धशतक साजरे केले. मात्र, त्या दाेघांचीही खेळी व्यर्थ ठरली.

बंगळुरू संघाचा सलग पाचवा पराभव
यंदाच्या सत्रामध्ये सातत्याने अपयशी ठरत असलेल्या विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला शुक्रवारी लीगमध्ये सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. या टीमचा घरच्या मैदानावर विजयी ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. पाचव्या पराभवाने बंगळुरू गुणतालिकेत तळात आहे.

X
COMMENT