आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळखोरीचा अर्ज देताच अनिल अंबानींच्या आरकॉम कंपनीच्या शेअरमध्ये 48% घसरण 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम)च्या शेअरमध्ये मुंबई शेअर बाजारात सोमवारी ४८.२५ टक्क्यांची घसरण झाली. प्रति शेअर सहा रुपयांच्या पातळीवर गेल्यानंतर सायंकाळी आरकॉमचे शेअर ३४.९१ टक्क्यांच्या नुकसानीसह ७.५५ रुपयांवर बंद झाले. नगदीच्या संकटाचा सामना करत असलेल्या आरकॉम कंपनीवरील कर्जाचे ओझे वाढून ४६,००० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 

 

कंपनीच्या संचालक मंडळाने शनिवारी झालेल्या बैठकीत कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या योजनेचा आढावा घेतला होता. यामध्ये मागील १८ महिन्यांत संपत्ती विकून कर्ज फेडण्यास पूर्णपणे अपयश हाती आल्याचे दिसून आले. यामुळे कंपनीच्या संचालक मंडळाने कर्ज फेडण्यासाठी एनसीएलटीच्या माध्यमातून फास्ट-ट्रॅक रिझोल्युशन प्रोसेसमध्ये जाण्याचा पर्याय निवडला होता. हा निर्णय यासंबंधीच्या सर्व पक्षांच्या हिताचा असल्याचे मत संचालक मंडळाचे आहे. यामुळे २७० दिवसांत निश्चित कालावधीत आरकॉमची संपत्ती विकून कर्ज फेडण्याची पारदर्शी प्रकिया निश्चित होईल. दुसरीकडे स्वीडनची दूरसंचार उपकरणे बनवणारी कंपनी एरिक्सनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आरकॉमचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या सर्व खासगी संपत्तीवर दावा करण्याची तयारी केली असल्याचे वृत्त आहे. यामुळे आरकॉमच्या शेअरमध्ये सोमवारी मोठी घसरण दिसून आली. विशेष म्हणजे मोठा भाऊ मुकेश अंबानी यांची नवी कंपनी रिलायन्स जिओ बाजारात आल्यामुळे दूरसंचार बाजारात दर कपातीची स्पर्धा सुरू झाली होती. यामुळे आरकॉम व्यवसायात टिकू शकली नाही. मार्च २०१७ पर्यंत कंपनीवर ४५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे कर्ज थकलेले होते. 

 

भाऊ मुकेश अंबानीकडूनही मदत नाही: आरकॉमला संपत्ती विकून २५,००० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती. या पैशाचा वापर करून ४० कर्ज दात्यांची थकीत रक्कम देण्याची आरकॉमची योजना होती. तर आरकॉम मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओलाही स्पेक्ट्रम विक्री करण्यात अपयशी ठरली. आरकॉमला स्पेक्ट्रम विक्रीतून ९७५ कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती. यातील ५५० कोटी रुपये एरिक्सनला तर २३० कोटी रुपये रिलायन्स इन्फ्राटेलला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दूरसंचार विभाग भविष्यात आरकॉमवर काढेल अशी कोणतीच देणेदारी देण्यास जिओने नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...