आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांशेजारी होते खोतकरांचे सीट, पण साहेबांनी राज ठाकरेंना जवळ बसवले, वाचा विमानात त्यादिवशी काय घडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शरद पवार आणि राज ठाकरे यांची विमानात भेट झाल्याचा फोटो समोर येतात एकच राजकीय खलबते रंगू लागली. शरद पवार आणि त्यांचे राजकारण इथपासून ते राज ठाकरेंना त्यांचे मार्गदर्शन असल्याच्या चर्चाही मग सुरू झाल्या. पण त्यादिवशी विमानात त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे त्या दोघांशिवाय दुसरे कोणी सांगू शकणार नाही. मात्र त्यांच्यातील बोलण्याचा तपशील समजणे शक्य नसले तरी विमानात नेमके काय घडले हे मात्र समोर आले आहे. त्यादिवशी विमानात असलेल्या किर्तीकुमार शिंदे यांनी त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये या भेटीचा संपूर्ण तपशील दिला आहे. 


खोतकरांच्या जागी राज यांना बसवले..
त्यादिवशी विमानामध्ये ठरल्यानुसार शरद पवार यांच्याजवळ शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे सीट होते. पण शरद पवानांनी खोतकरांना म्हटले की तुम्ही तिकडे बसा आणि राजला माझ्याजवळ बसू द्या. खोतकर यांनीही शरद पवारांचा मान राखला आणि स्वतः बाळा नांदगावकर यांच्याजवळ जाऊन बसत, राज यांना त्यांच्याजवळ जागा दिली. किर्तीकुमार शिंदे यांनी यासंपूर्ण प्रसंगाबाबत फेसबूक पोस्टमध्ये सांगितले आहे. वाचुयात त्यांनी नेमके काय लिहिले आहे...

 

किर्तीकुमार शिंदे यांची पोस्ट..

"राजला इथे बसू द्या!"
दोन मोठे राजकीय नेते जेव्हा प्रत्यक्ष भेटतात, तेव्हा छोट्यांनी तिथं घुटमळत उभं राहू नये, आणि तरीही, त्यांच्यात झालेला संवाद कानावर पडलाच तर त्याची जाहीर वाच्यता करू नये, असे संकेत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विमानप्रवासातील भेटीबाबत ज्या चर्चा वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियात काल सायंकाळपासून सुरू आहेत, त्या पाहता हा संकेत मोडणं मला गरजेचं वाटतंय.

औरंगाबाद-मुंबई विमानप्रवासातील "पवार-ठाकरे भेट ठरवून घडवण्यात आली" इथपासून ते "आता एनसीपी आणि मनसे एकत्र येणारच" इथपर्यंत आणि "राज हे पवारांची प्रत्येक गोष्ट ऐकतात" इथपासून ते "मनसेला आमच्या महाआघाडीत स्थान नाही" या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या मतापर्यंत प्रत्येक गोष्टीवर गेल्या काही तासात अक्षरश: महाचर्चा झडल्या आहेत. भाजपच्या ट्रोल आर्मीने आणि शिवसेनेच्या ऑनलाईन वीरांनी नेहमीप्रमाणे या भेटीची थट्टा उडवत राज यांच्यावर टीका केली आहे. पण विमानात प्रत्यक्षात काय घडलं, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे.

औरंगाबाद विमानतळाहून मुंबईकडे प्रयाण करण्यासाठी सज्ज असलेल्या विमानात राज ठाकरे यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा ते त्यांच्या सीटवर बसत होते. राज आणि बाळा नांदगावकर यांच्या सीट्स उजवीकडे बाजूबाजूला होत्या, तर शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार, राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या सीट्स डावीकडच्या रांगेत बाजूबाजूला होत्या. विमानातील आपल्या सीटवर शरद पवार बसल्यावर त्यांच्या बाजूच्या सीटवर अर्जून खोतकर बसणार..., इतक्यात पवार त्यांना म्हणाले, "तुम्ही (खोतकर) तिथे बसा, राजला इथे (माझ्या बाजूला) बसू द्या."

पवार यांच्या या बोलण्याचा मान राखत खोतकर उजवीकडच्या रांगेत म्हणजे बाळा नांदगावकरांच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यानंतर पुढच्या साधारण तास-दीड तासाच्या विमान प्रवासात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गप्पा रंगल्या.

राजकारणातील प्रत्येक गोष्ट प्लांटेड असते, हा एक गैरसमज आहे. राजकीय नेत्यांच्याही आवडीनिवडीची काही खास माणसं असतात, त्यांनाही आवडीच्या माणसांशी गप्पा मारायला आवडतं, हे आपण विसरतो. अर्थात, या गप्पांमध्ये राजकीय विषय निघालेच नसतील, असं म्हणणंही मूर्खपणाचं ठरेल.

फोटो : शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गप्पा सुरु असताना त्यात थोड़ा वेळ का होईना पण सहभागी होण्याचा मोह शिवसेनेचे आमदार, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि मनसे नेता बाळा नांदगावकर यांनाही आवरला नाही. त्यासाठी सीट सोडून हे दोघे (मुंबईतल्या लोकल ट्रेनप्रमाणे) विमानातही उभे राहिले!

 

- कीर्तिकुमार शिंदे (फेसबूक पोस्टवरून साभार)

 

बातम्या आणखी आहेत...