आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाचे रक्षण काळाची गरज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात २०१४ या वर्षात १२,३६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामध्ये एकट्या महाराष्ट्र राज्यातील २,५६८ शेतकरी आत्महत्येचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचा आलेख सतत वाढत आहे. अाज जरी याच्या एकंदरीत परिणामांची कल्पना येत नसली, तरी सतत होत असलेल्या या घटनांचे परिणाम मात्र गंभीरच होण्याची शक्यता आहे. आता जर या आत्महत्या पूर्णपणे थांबल्या नाहीत, तर शेतकऱ्यांच्या येणाऱ्या पिढीत शेती व्यवसायावर आस्थाच राहणार नाही आणि शेती नामशेष होण्याची शक्यता निर्माण होणार आहे. पोटापुरतेदेखील शेतीत उरत नसेल आणि बारोमास अत्यंत हलाखीचे किंवा शेती असूनही उपासमार वाट्यात येत असेल, तर कोणीही शेती करणार नाही. शेवटी शेतकरी आपली जमीन िवकून शहराकडे वळतील आणि नंतर त्या जमिनीवर एकतर औद्योगिक अथवा वसाहती उभ्या राहतील; पण उद्योग व मानवी वसाहती उभ्या असून प्राधान्य शेतीलाच द्यावे लागते. कारण शेती अन्नदायी असून अन्न पिकले नाही तर काय होईल, याची कल्पना भयदायी आहे. सरकार कोणतेही असो, ते शेतकरी केंद्रित असणे आता तरी अनिवार्य बनले आहे. तसेच शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज आहे.

सुभाषचंद्र भंडारी, बुलडाणा.