आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद : सगळ्याच नियोजनाचा दुष्काळ

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

28 जून रोजीच्या अंकातील ‘दुष्काळ केवळ नियोजनाचा’ हा प्रा. विजय दिवाण यांचा लेख वाचला. आपल्या देशात सगळ्याच नियोजनाचा, चांगल्या योजनांचा दुष्काळच आहे. भारतात लहान-मोठी धरणे बांधण्यासाठी जवळपास एक लाख 42 हजार कोटी इतकी रक्कम खर्च केली गेली आहे. हे वाचून डोळे न विस्फारले तरच नवल! एवढा खर्च करूनही शेती व लहान-मोठी धरणे कोरडीच. हा विरोधाभास कसा, तर लेखकाचे म्हणणे की दुष्काळ केवळ नियोजनाचाच ! हे तंतोतंत खरे आहे. नियोजनाचा दुष्काळ का? तर चांगल्या प्रकारे नियोजन करणा-या विचारवंतांचाच खरा दुष्काळ आपल्या देशात आहे. देशाची नि:स्वार्थ सेवा, नोकरी करणा-या योग्य कर्मचा-यांचा दुष्काळ आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्या हुतात्म्यांच्या वंशजांचा दुष्काळ आहे. बाबा आमटे यांच्यासारख्या सच्च्या समाजसेवकांच्या पुढच्या पिढीचा दुष्काळ आहे. सशक्त देश बनवण्यासाठी जी नेतेमंडळी हवी त्या बुद्धिवंत नेतृत्वाचा दुष्काळ आहे. जिजाऊ माता आणि शहाजीराजे यांच्यासारख्या पालकांचा दुष्काळ आहे. स्वयंशिस्त, परिसराची स्वच्छता ठेवणा-या जागरूक नागरिकांचा दुष्काळ आहे. देशप्रेम, नैतिकता, कर्तव्य, अधिकार जाणून घेणा-या युवा पिढीचा दुष्काळ आहे. शासकीय योजना कितीही चांगली असली तरी ती चांगल्या प्रकारे राबवून घेणा-यांचा दुष्काळ आहे. देश अशीच वाटचाल करीत राहिला तर सुजलाम सुफलाम देशाचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
पोपटाचे चातुर्य