आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Readers Reaction In Divya Marathi About Namantar Andolan

विद्यापीठ नामांतराचे क्रांतिकारी आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक क्षेत्रातील अतुल्य योगदान लक्षात घेऊन त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र विधानसभेत २७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असे नामांतर करण्याचा ठराव पारित करण्यात आला; पण या नामांतराला प्रखर विरोध झाला. यातून संपूर्ण मराठवाड्यात नामांतरवादी व विरोधी असा संघर्ष निर्माण झाला. नामांतराच्या समर्थनार्थ आंबेडकरवादी जनता रस्त्यावर उतरली. दलित पँथरचा या आंदोलनातील आक्रमक सहभाग एेतिहासिक ठरला. गंगाधर गाडे यांचे सातत्यपूर्ण आंदोलन महत्त्वपूर्ण ठरले. दलितांसोबत पुरोगामी विचारांच्या सर्व जातीय कार्यकर्ते, नेत्यांच्या सहभागातून या आंदोलनास व्यापकता आली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर आग्रा, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद येथेही नामांतरासाठी आंदोलने झाली, मोर्चे निघाले. पोचीराम कांबळे, गौतम वाघमारे, सुहासिनी बनसोड यांच्यासारख्या लढवय्या असंख्य आंबेडकरवाद्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. जोगेंद्र कवाडे यांनी नागपूर येथून काढलेल्या लाँगमार्चमधील जनतेचा आक्रमक उत्स्फूर्त प्रतिसाद या आंदोलनातील मैलाचा दगड ठरला. सर्व आंबेडकरी जनता, नेते, कार्यकर्ते यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनातून १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले आणि विद्यापीठाचा नामविस्तार होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असे नाव दिमाखात झळकले. नामांतराचे आंदोलन म्हणजे आंबेडकरवाद्यांच्या अस्मिता, शौर्य, लढाऊ वृत्ती आणि बाणेदारपणाचा इतिहास आहे.
उज्ज्वलकुमार म्हस्के, सिडको, एन-२, औरंगाबाद.