आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपकारकर्त्याची जाणीव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमची एन -2 सिडको कॉलनी उच्चभ्रू लोकांची आहे. महापालिकेचा सफाई कर्मचारी दररोज येऊन कचरा गोळा करतो. काही लोकांच्या घरासमोर घंटानाद करतो, तर काही लोकांच्या घरातून जाऊन कचरा स्वत: घेऊन येतो. हे एका शेजारच्या महिलेने पाहिले आणि तिला संशय आला. ती गाडीवाल्यास बोलावून म्हणाली, ‘काय रे! त्यांच्या घरातून कचरा आणतोस. आमच्या घरासमोर तर थांबतही नाहीस. ते काही बिदागी देतात काय?’ तो कर्मचारी म्हणाला, ‘आपल्या बोलण्यात तथ्य आहे, पण सत्यांश नाही. मी त्या देशमुखांच्या घरातून कचरा आणतो, पण त्यांनी जे उपकार माझ्यावर करून ठेवले आहेत. त्याची उतराई या आयुष्यात तर होऊ शकत नाही. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून माझा पगार नव्हता. त्यामुळे मुलांच्या शाळेची फीस सुद्धा भरता आली नाही. तशात वाढती महागाई, कामाचा ताण यामुळे कंटाळून गेलो. त्यात एक आपत्ती क ोसळली. माझ्या मुलाला एका अज्ञात रिक्षावाल्याने ठोस मारली अन् तो फरार झाला. मी घेरी येऊन पडलो. डोळे उघडले तेव्हा एका खासगी रुग्णालयात होतो. शेजारच्या कॉटवर माझा मुलगा जखमी अवस्थेत दाखल होता. त्याच्यावर उपचार झालेले होते. मला काहीच कळेनासे झाले. पुढची चिंता सतावत होती. या दवाखान्याचे बिल भरणार कसे? पोटात गोळाच आला.’ इतक्यात डॉक्टर आले आणि म्हणाले, ‘हे पाहा तुमचं बिल पूर्ण अ‍ॅडव्हान्स भरले गेले आहे. शिवाय डिस्चार्ज देताना 200 रुपये तुला खर्चासाठी ठेवले आहेत. हे बिल देशमुख साहेबांनी भरले आहे.’ त्यांनी देवासारखे धावत येऊन मदत केली. माझ्या मुलाचा जीव संकटात आलेला होता. त्यांच्यामुळे वाचला, पण त्याबाबत त्यांनी आजही कधी चकार शब्द काढलेला नाही. तुम्हाला वाटले असावे, मी पैसे घेऊन कचरा उचलत असतो. ते चुकीचे आहे. त्यांचे उपकार फेडू तर शकत नाही. अशी सेवा करून त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहे. अशी देवमाणसे फार कमी असतात. मी हा प्रकार दुरून पाहत होतो. मला हा हृदयस्पर्शी अनुभव आला.