आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंदाचे रहस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा वर्षांपूर्वीची ही घटना आहे. सकाळची वेळ होती. सोलापुरातल्या विवेकानंद केंद्रात योगवर्ग सुरू होता. बसवराज देशमुख हे योगशास्त्रातील ‘आनंदमीमांसा’ हा विषय समजावून सांगत होते. ‘गेल्या किती महिन्यांत तुम्ही रात्रीच्या वेळी आकाशातले तारे पाहिले नाहीत, हे प्रत्येकाने सांगावे’, त्यांचा प्रश्न. वर्गात तीस जण होते. सगळेच विचार करू लागले. अरेच्चा! गेल्या किती तरी वर्षांत शांतपणे आकाशातले तारे निरखलेत असे झालेच नाही. या घटनेने अंतर्मुख केले आणि गावाकडचे दिवस आठवले.

हजार लोकवस्तीचे माझे गाव - शिर्पनहळ्ळी. सोलापूरपासून 15 किलोमीटर अंतरावर असूनही शहरी वारा न लागलेले. उन्हाळ्याचे चार महिने गावालगतच्या मोकळ्या फडात (रानात) झोपण्यासाठी निम्मे गाव यायचे. चांदण्या मोजत, गप्पा-गोष्टी करत कधी झोप लागायची कळायचंही नाही. आम्हा लहान मुलांची दिनचर्या म्हणजे पहाटे उठून गाई-गुरांना चारायला न्यायचे. नऊच्या सुमारास गुरांना गोठ्यात सोडायचे की आम्ही 20-25 पोरं विहिरीवर हजर. रात्रीच्या शिळ्या भाकरी अन् दही-चटणीचा नाष्टा करतच विहिरीकाठच्या लिंबाच्या झाडावरून पाण्यात उड्या मारणे सुरू व्हायचे. साडेदहाच्या ठोक्याला दप्तर कसली पिशवीच ती, खांद्याला अडकवून शेजारच्या धोत्रीकडे शाळेसाठी पळायचे.

संध्याकाळी पिशवी घरात ठेवायचा अवकाश इष्टाप, चिर घोडा, चिटे-मिटे खेळण्यासाठी सारे मित्र हजर. ९ वाजता जेवण. थोडा वेळ अभ्यास अन् फडाकडे पावले वळायची. उन्हाळ्यातील चार महिने आकाशातील ग्रह-ता-यांची सोबत नेहमीचीच असायची. सुगीच्या दिवसांत वडिलांसोबत शेतात राखण करायला जाणे, आई-बाबांना शेतातल्या कामांत चिमुकल्या हातांनी मदत करणे, सूरपारंब्या खेळणे. या आनंददायी जीवनशैलीविषयी सांगावे तेवढे कमी. बसूदादांच्या प्रश्नाने अचूक वेध घेतला होता. ती आनंददायी जीवनशैली लुप्त होत असल्याची वेदना मनाला बोचत राहते.