आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोष्ट छोटीशीच, पण...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळी नऊची वेळ होती. मी घरातील सर्व कामे आटोपून नोकरीच्या ठिकाणी जायला निघाले. खरे तर स्त्रियांची नोकरी म्हणजे तारेवरची कसरतच असते. घरातील सर्व कामे उरकून, कुटुंबातील सर्व सदस्यांना हवं-नको ते पाहून नोकरीच्या ठिकाणी वेळेवर हजर राहणे हे दिव्यच. तशी मी सर्व कामे आटोपून स्टॉपवर आले. अचानक लक्षात आले की, मोबाइल कुठेतरी विसरला किंवा रस्त्यात पडला. आता तो शोधायला घरी परत गेले तर कामावर जायला उशीर होणार. काय करावे ते समजत नव्हते. माझे मिस्टरही ऑफिसला निघाले असतील. पण त्यांच्याशी संपर्क कसा साधावा हा प्रश्न होता. विचाराच्या गोंधळात असतानाच स्टॉपवर मला एक सद्गृहस्थ भेटले. मी त्यांना अडचण सांगितली व त्यांना थोडा वेळ मोबाइल देण्याची विनंती केली. त्यांच्या फोनवरून मी मिस्टरांना फोन लावला आणि सर्व हकिगत सांगितली.

घराला कुलूप लावताना मोबाइल बाहेरच्या खिडकीत तसाच राहिला होता. तो चोरीला जाण्याचीही शक्यता होती. ऑफिसला निघालेले मिस्टर माझा निरोप मिळाल्यावर घरी परत गेले. त्यांनी तो मोबाइल मी उभ्या असलेल्या स्टॉपवर आणून दिला. अडचणीच्या वेळी मला मदत करणा-या त्या सद्गृहस्थाचे मन:पूर्वक आभार मानले. कारण त्यांच्यामुळे माझी धावपळ आणि दगदग टळली होती. आपल्या सभोवती जगात चांगली, सहकार्य करणारीदेखील माणसे असतात. थोड्या वेळासाठी मोबाइल देण्याची गोष्ट तशी साधीच आहे, परंतु त्यामुळे मला खूप मोलाची मदत झाली. त्यांनी मोबाइल दिला नसता तर कदाचित माझा मोबाइल हरवलादेखील असता. त्यांच्या रूपाने मला चांगुलपणाचा प्रत्यय आला. गोष्ट छोटीच आहे, पण त्यातील अर्थ अधिक महत्त्वाचा वाटतो. जगात जे चांगले आहे, त्याची सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी. आपोआप जग सुधारेल.