आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियल लाइफ पबजी!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल बनसोडे

इराणचे लष्करप्रमुख कासिम सुलेमानी यांची ड्रोनद्वारे हत्या केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आता जगात तिसरे महायुद्धच घडवून आणणार आहेत अशी शक्तिशाली प्रतिमा उभी करण्यातही त्यांच्या समर्थकांना यश आले आणि ट्विटरवर युद्धाचे हॅशटॅग येऊ लागले. या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात न घेता या हॅशटॅग ट्रेंडमध्ये लाखो रिकामटेकड्या आणि बाष्कळ लोकांनीही सहभाग घेतला आणि जगभर तिसऱ्या महायुद्धाचा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. सध्या वीस ते चाळीस गटातल्या या लोकांनी उभ्या आयुष्यात कधी युद्ध अनुभवलेले नाही, युद्धाचा संहार त्यांना माहिती नाही, युद्ध संपल्यानंतर आपल्या जवळच्या लोकांशिवाय उर्वरित आयुष्य कसे जगावे लागेल याची कुठलीही कल्पना त्यांनी केलेली नाही, केवळ खुमखुमी म्हणून किंवा ‘रियल लाइफ पबजी’ पाहायला मिळावे म्हणून किंवा मग टोकाच्या राष्ट्रभक्तीने भारावलेले असल्याने त्यांना युद्ध हवे आहे, महायुद्ध त्याहूनही भारी आणि ते तिसरे जागतिक महायुद्ध तर सगळ्यात भारी अशी त्यांची फँटसी आहे. 

इराणचे लष्करप्रमुख कासिम सुलेमानी यांची हत्या होऊन आज दहा दिवस पूर्ण होत आहेत. गेली दशकभर मध्यपूर्वेत चाललेल्या वाताहतीत आणि पाच लाखांहून अधिक लोकांचा बळी गेलेल्या सिरियन युद्धाच्या आगीत या सुलेमानींच्या हातूनही बऱ्याच समिधा पडल्या होत्या. गेली चाळीस वर्षे इराणी लष्करी सेवेत आणि त्यातली अलीकडची काही वर्षे लष्कराचा सर्वोच्च पदभार सांभाळताना सुलेमानी नेमक्या किती लोकांच्या मृत्यूला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत ठरले असावे याचा हिशेब मांडला तर तो हजारोंच्या घरात जाईल. या मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्व धर्मांचे आणि अनेक महत्त्वाच्या राष्ट्रांचे नागरिक आहेत आणि असे असले तरी सुलेमानींकडे सगळी राष्ट्रे खुनी म्हणून पाहत नाहीत. कारण ते इराणचे अधिकृत सैन्य अधिकारी होते, त्यांच्याकडे जाडसर कपड्यांचा युनिफॉर्म होता आणि त्या युनिफॉर्मवर खंडीभर मेडल्स आणि अधिकाराच्या पट्ट्या होत्या. सुलेमानींनी जे काही केले ते असा गणवेश न घालता एखादा नागरी पोशाख घालून केले असते तर ते ओसामा बिन लादेनपेक्षाही जास्त भयंकर अतिरेकी ठरले असते. पण चित्र तसे नाही... ते इराणचे अधिकृत लष्करप्रमुख असल्याने त्यांची हत्या ही त्याच्या देशातले लोक खून म्हणून पाहतात... त्यांच्यावरचा हल्ला हा आपल्या देशावरचाच हल्ला म्हणून पाहतात... आणि असा हल्ला झाल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून आता अमेरिकेला सडेतोड उत्तर दिले जावे अशी मागणी इराण एक राष्ट्र म्हणून करते.

सुलेमानींवर हल्ला करण्यात आला तो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने. गेली तीन वर्षे कांगावेखोर उजव्या राजकारणाचे महामेरू झालेले ट्रम्प महाशय यांच्या कृत्यांचा हिशेबही तसा चांगला नाही. अमेरिकेत आलेले स्थलांतरित लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचेच असून ते इथल्या स्थानिक लोकांच्या नोकऱ्या हिसकावून घेत आहेत, त्यांच्यामुळे देशाची सुरक्षितताच धोक्यात आली आहे आणि त्यांना अमेरिकेत येण्यापासून रोखण्यासाठी तीन हजार किलोमिटर लांबीची उंचच उंच भिंत बांधली जाईल अशी विधाने करून ट्रम्पबुवा सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या सीमेवर येणाऱ्या विस्थापितांसाठी तुरुंग बांधले, विस्थापितांच्या लहान मुलांना आईबापापासून वेगळे करून दुसऱ्या छावण्यांमध्ये ठेवले आणि या प्रक्रियेत निष्पाप लहान मुले हलाखीने मरून गेली तरी त्याबद्दल कुठलीही दयामाया दाखवली नाही की त्याबद्दल खंत व्यक्त केली नाही... असे असले तरी ट्रम्प यांना कुणी खुनी म्हणून पाहत नाही, कारण ते शक्तिशाली अमेरिकेचे अधिकृत अध्यक्ष आहेत. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्याने कुठल्या देशात युद्ध सरू करायचे हा निर्णय वर्षभरात घेण्याची परंपरा तशी बरीच जुनी, या परंपरेला साजेसा निर्णय घेण्यात ट्रम्प यांना तसा उशीरच झाला. हेच कारण म्हणून की काय, पण या आक्रस्ताळ्या राष्ट्राध्यक्षाच्या अध्यक्षपदाचा मोठा काळ तसा निरुद्योगाचा. ट्रम्प यांच्या अगोदरच्या काळापासून सुरू असलेले तंटे आणि त्यातला अमेरिकन सैन्याचा सहभाग मागच्या पानावरून पुढे चालू राहिले, त्यात ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांचे विशेष उल्लेख करावे असे काही नाही, पण अधूनमधून आपल्याला हव्या असलेल्या युद्धाच्या शक्यता दिसू लागल्या की ट्रम्प लगेच ट्विटरवरून धमकीसत्र सुरू करायचे, आपल्या आवडत्या माध्यमांतल्या पत्रकारांचा गोतावळा गोळा करून त्यात मी आता काय करतो ते पाहाच, अशा वल्गना करायचे आणि मग काही दिवसांनी तो नाद सोडून दुसऱ्याच एखाद्या विषयावरून वाद उभा करून द्यायचे. या परिस्थितीत बदल झाला तो गेल्या महिन्यात ट्रम्प यांच्याविरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये मंजूर झाल्यानंतर. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अमेरिकन सिनेटमध्ये त्यांच्याविरोधात रीतसर खटला सुरू होऊन त्यात ट्रम्प दोषी आहेत की नाही यावर मतदान घेतले जाईल आणि त्यात दोन तृतीयांश ट्रम्पविरोधात मतदान केल्यास त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागेल. ही सगळी कार्यवाही अमेरिकेच्या घटनेनुसार चाललेली असली तरी सिनेटमध्ये ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष बहुमतात आहे. या पक्षाच्या निर्वाचित प्रतिनिधींना ट्रम्प यांनी काही चूक केली आहे असे मुळात वाटतच नाही आणि काहींनी तर ट्रम्प यांनी लाख चुका केल्या तरी आपण त्यांच्याविरोधात मुळीच मतदान करणार नाही असे निक्षून सांगितले आहे. त्यामुळे या खटल्यातून ट्रम्प सहीसलामत सुटतील. मुळात आपल्याला दिलेल्या घटनादत्त अधिकारांचा आपण दुरुपयोग करतो आहोत वा देशाच्या कायद्याप्रति आपली काही बांधिलकी आहे असे ट्रम्प यांना वाटत नाही. देशाचा सर्वोच्च कायदा बासनात गुंडाळून त्यांचा राज्यकारभार चालू आहे त्याच पद्धतीने ते अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि युद्धनीतीदेखील हाताळत आहे. यापूर्वीची अमेरिकन युद्धे ही निदान तिथल्या जनतेला विश्वासात घेऊन केली जात होती, युद्धाची पूर्वकल्पना आणि रणनीती यावर इतर लोकप्रतिनिधींना माहिती दिली जात होती, अमेरिकेची युद्धे तशी संहारक असली तरी किमान ती त्या देशाची लोकशाही भूमिका होती. ट्रम्प यांना अमेरिकेच्या लोकांप्रति, लोकप्रतिनिधींप्रति वा कायद्याप्रति जणू काही घेणेदेणेच नाही अशा पद्धतीने ते युद्धाचे पुढचे निर्णय घेत आहेत. त्यांची रणनीतीदेखील सैन्यदल वा नियंत्रित हल्ल्यांची नसून ते एखाद्या खुनशी माणसाप्रमाणे शत्रुपक्षातल्या लोकांवर व्यक्तिगत हल्ले करीत आहेत. ड्रोन आणि युद्धाच्या प्रगत तंत्रामुळे ट्रम्प यांना हे करणे शक्य झाले असले तरी कुणालाही न जुमानता एखादी व्यक्ती अशी एकटीच निर्णय घेऊन जगभर हल्ले करत सुटणार असेल तर त्याच्या या वेडपटणामुळे सगळ्या जगाची शांतताच धोक्यात येऊ शकते. 

या  वर्षाच्या  शेवटी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार अजून निश्चित झालेला नसला तरी रिपब्लिकन पक्षातर्फे पुन्हा ट्रम्प यांनाच उमेदवारी मिळणार आहे. महाभियोगाचा प्रस्ताव पारित झाल्यानंतर समर्थकांमध्ये आपली प्रतिमा बळकट करण्यासाठी आणि पुन्हा निवडून येण्यासाठी ट्रम्प हा सगळा खेळ करताहेत हे सांगायला कुणा विश्लेषकाची गरज नाही. आश्चर्याची गोष्ट अशी की, २०१२-१३ मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा हे निवडून येण्यासाठी इराणवर हल्ला करतील असे ट्रम्प वारंवार ट्विट करून सांगत होते. ओबामा यांनी ते केले नाही, पण आता ट्रम्प यांनी स्वतःच तो खेळ करून दाखवला.  सुलेमानीला असे ड्रोन हल्ल्यात संपवल्यानंतर जगभरातल्या इतर उजव्या पक्षांच्या समर्थकांना या घटनेचा हेवा वाटला. ट्रम्पसाहेब जसे शत्रूला घरात घुसून व्हिडिओ गेम खेळल्यासारखे मारतात तसेच आपल्या देशाच्या प्रमुखानेही  केले तर काय भारी होईल,अशी इच्छा या समर्थकांची आहे, यातला भयावह भाग असा की या देशप्रमुखांनाही ट्रम्प यांच्याविषयी असूया निर्माण झाली असून केवळ ट्रम्प यांना खार देण्यासाठी तेही असेच हल्ले करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

जगभरातल्या अनेक स्वयंकेंद्री नेत्यांचे हे वागणे एखाद्या गल्लीत गोट्या खेळणाऱ्या वांड पोरांप्रमाणे झाले असून केवळ त्यांच्या आत्मप्रौढीसाठी सबंध देशाची सुरक्षा पणावर लावायला ते मागेपुढे पाहत नाहीत, आपल्या देशाच्या सैनिकांनी केलेली आक्रमणे आपण स्वतःच केली असल्याचे ते टीव्हीवर सांगतात आणि त्यांचे समर्थक अशा आक्रमणांचा उदोउदो करून त्याला देशभक्तीची जोड देतात. अशा आक्रमणांना विरोधी पक्षाने कुठल्या प्रकारचा आक्षेप घेतल्यास विरोधी पक्ष हा शत्रूची भाषा बोलतोय आणि शत्रूच्या मृत्यूवर अश्रू वाहतोय असा प्रचार केला जातो. सुलेमानीच्या मृत्यूनंतर रिपब्लिकन पक्षाच्या निकी हॅली यांनी "या घटनेवर आखाती देश काहीच बोलत नाहीये,  चीन काही बोलत नाहीये, रशिया काही बोलत नाही आणि आपल्या देशातल्या डेमोक्रॅटिक पक्षालाच सुलेमानीच्या मरण्याचे सुतक पडलेय' असे टीव्ही मुलाखतीत सांगितले. अमेरिकन अध्यक्ष युद्धाच्या निर्णयात घटनाबाह्य वागत असल्यास त्याला विरोध करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे, पण शत्रूविरुद्ध केलेल्या कुठल्याही कारवाईचे मूल्यमापन करणे वा त्याला सांस्कृतिक स्थळांना नष्ट करण्याच्या युद्धगुन्ह्यापासून रोखू पाहणाऱ्यांना सत्तासमर्थक थेट शत्रूचा हस्तक बनवून टाकतात आणि या युक्तीमुळे त्यांना पुढेही मनमानीपणा करण्याचे दरवाजे मोकळे राहतात. 


अशा समर्थकांमध्ये सध्यातरी ट्रम्प यांचे समर्थक अव्वल आहेत. ट्रम्प यांनी घडवून आणलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी लगेचच अमेरिकन राष्ट्रभक्तीची गाणी आळवायला सुरुवात केली. हे इथेच थांबते तर ठीक, पण ट्रम्प आता जगात तिसरे महायुद्धच घडवून आणणार आहेत अशी शक्तिशाली प्रतिमा उभी करण्यातही त्यांच्या समर्थकांना यश आले आणि ट्विटरवर युद्धाचे हॅशटॅग येऊ लागले. या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात न घेता या हॅशटॅग ट्रेंडमध्ये लाखो रिकामटेकड्या आणि बाष्कळ लोकांनीही सहभाग घेतला आणि जगभर तिसऱ्या महायुद्धाचा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. सध्या वीस ते चाळीस गटातल्या या लोकांनी उभ्या 

आयुष्यात कधी युद्ध अनुभवलेले नाही, युद्धाचा संहार त्यांना माहिती नाही, युद्ध संपल्यानंतर आपल्या जवळच्या लोकांशिवाय उर्वरित आयुष्य कसे जगावे लागेल याची कुठलीही कल्पना त्यांनी केलेली नाही, केवळ खुमखुमी म्हणून किंवा "रियल लाइफ पबजी' पाहायला मिळावे म्हणून किंवा मग टोकाच्या राष्ट्रभक्तीने भारावलेले असल्याने त्यांना 

युद्ध हवे आहे, महायुद्ध त्याहूनही भारी आणि ते तिसरे जागतिक महायुद्ध तर सगळ्यात भारी अशी त्यांची फँटसी आहे. तिसऱ्या युद्धाच्या संभाव्यतेच्या या चर्चा तशा जगाला नवीन नाहीत, २००१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यापासून त्याच्या शक्यता इथे तिथे चर्चिल्या जात असतात. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात आरंभलेल्या युद्धामुळे आतापर्यंत एक लाखांहून जास्त लोकांचे प्राण गेले आहेत, अफगाण युद्धानंतर सिरीयन युद्धातही पाच लाखांहून अधिक जिवीतहानी झाली आहे, हा आकडा वेदनादायी असला तरी तो दोन महायुद्धांत झालेल्या आकड्याइतपत तो मोठा नाही.  ट्रम्प, पुतिन आणि ह्यांचे एकूण वागणे पहाता जग पुन्हा एकदा महायुद्धाच्या खाईत लोटले जाईल का? असा प्रश्न गेले दहा दिवस जगाच्या माध्यमांत घोंगावतो आहे. तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यतेकडे पाहताना सारासार मानवी बुद्धीचा विचार केला तर त्यात निरनिराळे तट पडतात. आपल्यातल्या काहींना युद्ध हवेच आहे आणि त्या युद्धांत निर्णायकी विजयही हवा आहे, आपल्यातल्या निराशावादी लोकांना महायुद्ध होईलच अशी भीती सारखी वाटत असते तर आशावादी लोकांना महायुद्ध कधीच होणार नाही असाही विश्वास असतो. पण ह्या सगळ्या भावना सामान्य जनतेतल्या विविध वर्गांच्या आहेत. सध्या जगात पॉवरप्लेमध्ये सहभागी असलेल्या मूठभर खुदपसंद लोकांच्या मानसिकतेत डोकावून पाहिले तर तिसरे महायुद्ध होईल का ह्या प्रश्नाचे उत्तर काहीसे वेगळेच येते. महायुद्ध घडवून आणण्याइतपत संहारक अण्वस्त्रे आणि शक्ती आज अनेक देशांकडे आहे. त्यामुळे कुठलाही देश आपल्या शत्रूदेशांवर थेट हल्ला करण्याचे धाडस करु शकत नाही.

युद्धाची सध्याची अवस्था ही बरीचशी मुत्सद्देगिरीच्या आणि शत्रूंवर आर्थिक बंधने लादण्याच्या मार्गातून जाते, ही अर्थात सध्याची परिस्थिती आहे. मानवप्रजातीचा एकूण इतिहास पाहता ही प्रजाती अनंत पातळ्यांवर हुशार आहे आणि अनंत पातळ्यांवर मुर्ख देखील. एक प्रजाती म्हणून आपल्यातला शहाणपणा अद्याप तरी बराचसा तगून असल्याने महायुद्धाची परिस्थिती आलेली नाही, ह्याचवेळी आत्मकेंद्री राजकारण्यांच्या हातात युद्धांची सर्व सुत्रे जात असतील तर त्यांच्या शहाणपणाची मात्र ग्वाही देता येणार नाही. जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर अजून जरी पोहचलेले नसले तरी सत्तेसाठी हिंसेचा वापर करण्याची सवय त्याला अधिकाधिक वाईट परिस्थितीकडे नेत आहे. जगाची परिस्थिती काल होती त्यापेक्षा आज जास्त वाईट आहे आणि उद्या ती आजपेक्षा थोडी आणखी वाईट असेल, महायुद्ध होणार नसले तरी अशा दिवसेंदिवस अधिकाधीक वाईट होत जाणाऱ्या जगाला कालपेक्षा आज थोड्या चांगल्या परिस्थितीत आणि उद्या आणखी चांगल्या परिस्थितीकडे घेऊन जाणे शक्य आहे पण त्याची सुरुवात अद्याप झालेली नाही. ही सुरुवात कधीतरी होईल तोवर राजकारण्यांनी आपला शहाणपणा गमावला नाही म्हणजे मिळवले!

कोण होते कासिम सुलेमानी?

सुलेमानीचे वर्गीकरण अमेरिका व मित्र राष्ट्रांनी दहशतवादी असे केले होते, पण इराक व त्याच्या मित्रराष्ट्रांसाठी सुलेमानी हा एखाद्या हीरोपेक्षा कमी नव्हता. इंटरनेट आणि मोबाइल कॅमेऱ्याचा वाढता वापर आणि जगभरात उजव्या राजकारण्यांच्या उदयाच्या समांतर काळात सुलेमानीची प्रतिमा ही अधिकाधिक लोकाभिमुख बनू लागली. एखाद्या कंपनीच्या सीईओप्रमाणे सुलेमानी आपली प्रतिमा बळकट करण्यासाठी थेट जमिनीवर लढणाऱ्या त्याच्या सैनिकांसमवेत जेवण करू लागला. कुणी युद्धात मारले गेले तर त्यांच्या अंत्ययात्रांना जाऊ लागला, त्याचे फोटो काढले जाऊ लागले आणि चौकाचौकात बॅनर्सही लागू लागले. त्याचा प्रभाव पाहता त्याने इराणच्या राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशी मागणी त्याच्या चाहत्यांकडून होऊ लागली. पण आपण फक्त एक साधा सैनिक आहोत असे म्हणून सुलेमानीने ही मागणी नाकारली. ही मागणी त्याचा नम्रपणा वाटत असला तरी ती तशी नव्हती. कारण सुलेमानीचा प्रभाव आता फक्त इराणपुरता मर्यादित नव्हता तर तो थेट इराक, लेबनॉन आणी सिरियापर्यंत पोहोचला होता. मध्यपूर्वेतल्या या चार देशांत लष्करी प्रभाव असण्याचा सरळ सरळ अर्थ एकच होता. सैन्य आणि लष्करी कुमक इराणमध्ये उभी करुन ती अगोदर इराक, त्यानंतर लेबनॉन आणि सिरियाच्या मार्गाने थेट इस्त्रायलच्या सीमेवर नेऊन ठेवायची आणि जेरुसलेमचे मंदिर ज्यू लोकांपासून मुक्त करायचे, या प्रक्रियेत इस्त्रायलला जगाच्या नकाशावरुन नष्ट करायचे आणि गेल्या कित्येक शतकांपासूनच्या वादाला निर्णायकी स्वरूप द्यायचे. गेल्या दहा वर्षांत वाढत गेलेल्या जगाच्या अंताच्या कथांवरती सुलेमानीची ही महत्त्वाकांक्षा काहींसाठी त्यांचे सर्वोच्च स्वप्न होते. कासिम सुलेमानीची हत्या या परिघात पाहिल्यास अमेरिका आणि इस्त्रायलसाठी तो मरणे किती महत्त्वाचे होते आणि 
इराणसाठी तो जगणे किती महत्त्वाचे होते याचा अंदाज येईल.