आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Reasons For Railway Land Acquisition .. Where's The Problem? Tell Me : Nimbalkar

रेल्वे भूसंपादनाबाबत कारणे नकोे.. कोठे अडचण ? मला सांगा : खा. निंबाळकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या रेल्वेमार्गाचे पहिल्या टप्प्यातील भूसंपादनाच्या कामाला लालफितीच्या कारभारामुळे ब्रेक लागला होता. याबाबत 'दिव्य मराठी'ने ३ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधल्यानंतर खासदार ओमराजे यांनी बुधवारी (दि.६) रेल्वेचे अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कशामुळे काम रेंगाळले याची विचारणा करून 'मला कारणे नको, काम हवे. माझी कोठे मदत लागेल मला कळवा, परंतु, काम रेंगाळले नाही पाहिजे, अन्यथा याची उत्तरे सभागृहात द्यावी लागतील' असे बजावत कामाला गती देण्याचे आदेश दिले.


लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणोत्तर रेल्वेमार्गापैकी पहिला टप्पा असलेल्या सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या ८४ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाची पंतप्रधानांनी घोषणा करून अंतरिम बजेटमध्ये सर्व्हे अंतिम करणे, भूसंपादनापूर्वीच्या मोजणी, प्रशासकीय कामांसाठी १ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. त्यानंतर नूतन खासदार ओमराजे यांनी रेल्वेचे अधिकारी व महसूलचे अधिकारी यांच्यासह संयुक्त पाहणी करून या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका लागल्या आणि नेते निवडणुकीत दंग झाले. दुसरीकडे पहिला प्रस्ताव आलेल्या शिंगोली शिवारातील सर्व्हेतील जमिनीच्या मोजणीकरिता भूमी अभिलेख विभागाने दिलेले ३ लाख रुपयांचे चलन भरण्याचे पत्र दिले. हे पत्र उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी कार्यालयाने रेल्वे विभागाकडे पाठवले. त्यानंतर चार महिन्यांत तीन वेळा स्मरणपत्र देऊनही कोणतीच हालचाल होत नसल्याने हे काम रेंगाळले होते. पहिल्याच टप्प्यात लागलेल्या या ब्रेकबाबत 'दिव्य मराठी'ने वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बुधवारी शिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहावर रेल्वेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी व महसूलचे अधिकारी यांची संयुक्त आढावा बैठक घेऊन याबाबत विचारणा केली. या वेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया जीएसटी व अन्य तांत्रिक कारणामुळे रेंगाळल्याचे सांगितले.


परंतु, पुढील आठवड्यात हा मुद्दा निकाली निघून मोजणीचे पैसे भरले जातील असे सांगितले. यावर खासदार ओमराजे यांनी 'मला तुमचे कारणे सांगू नका, तुम्हाला माझी कुठे मदत लागेल ते सांगा, मी सहकार्य करतो. परंतु, काम थांबले नाही पाहिजे, कामाला गती द्या नाहीतर याची उत्तरे सभागृहात येऊन द्या', असे बजावत महसूल-भूमी अभिलेख व रेल्वे विभागाने समन्वयाने दर महिन्याला एकदा बैठक घेऊन कामाचे ध्येय ठरवून चर्चा करा, अडीअडचणी सांगा अशा सूचना केल्या. या वेळी आमदार कैलास पाटील, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, सोलापूरचे उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी, रेल्वेच्या बांधकाम विभाग पुणेचे उप कार्यकारी अभियंता एम. जी. जगदीश, डी. के. श्रीवास्तव, रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य संजय मंत्री, भूमी अभिलेख विभागाचे जावळे, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सोमाणी आदींची उपस्थिती होती.

मार्चअखेरपर्यंत भूसंपादनाचे प्रस्ताव पूर्ण करणार
यावेळी खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी रेल्वेच्या कामासंदर्भात टार्गेट निश्चित करून काम करण्याच्या सूचना केल्या. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नोव्हेंबरअखेरपर्यंत ६ गावांचे भूसंपादनाचे प्रस्ताव दाखल करण्यात येतील. तसेच नंतर प्रत्येक महिन्यास दहा प्रमाणे उर्वरित उस्मानाबाद जिल्ह्यातील २८ व सोलापूर जिल्ह्यातील १२ गावांचे प्रस्ताव दाखल केले जातील असे सांगितले. यावर खासदार ओमराजेंनी आपली प्रत्येक महिन्याला आढावा बैठक होईल. यामध्ये महिनाभरातील कामाचा आढावा घेऊन पुढील महिन्याच्या कामाचे नियोजन करण्याबाबत सूचना केल्या.

तुळजापूर स्थानकाचे ठिकाण बदलणार
रेल्वेच्या पूर्वीच्या सर्व्हेनुसार तुळजापूर येथील रेल्वेस्थानक शहराच्या उत्तर-पूर्व भागात धारूळ रोडवर निर्धारित झाले होते. परंतु, तेथे वन विभागाची जमीन असल्याने व त्यांच्या परवानग्या व इतर अडचणी, होणारा विलंब लक्षात घेता सदरचे स्थानकाचे ठिकाण बदलावे लागणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि.८) रेल्वे व महसूलचे अधिकारी संयुक्त पाहणी करणार आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...