आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोर, अपक्षच ठरणार ३० पैकी १४ जागी निर्णायक; जागा टिकवण्याचे असेल महायुतीपुढे मोठे आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाडगेबाबांचे जन्मस्थळ शेंडगावच्या ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार - Divya Marathi
गाडगेबाबांचे जन्मस्थळ शेंडगावच्या ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

सचिन कापसे   अमरावती महसुली विभागांतर्गत समावेश असलेल्या पश्चिम विदर्भातील विधानसभेच्या ३० जागांपैकी जवळपास निम्म्या तब्बल १४ मतदारसंघांत बंडखोर व अपक्ष उमेदवार निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. तसेच वंचित बहुजन विकास आघाडीवरही काही ठिकाणी युती व आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. विधानसभेचे वारे वाहू लागल्यापासूनच अनेक इच्छुक युती व आघाडीचे तिकीट पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत होते. उमेदवारी अर्ज भरेपर्यंत काहींना आशा होती, मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडखोर मैदानात आले. काहींनी वेळेवर बंडखोरी करत दुसऱ्या पक्षाचे तिकीटही मिळवले, तर काही अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. पश्चिम विदर्भातील अनेक मतदारसंघात युती, आघाडी व वंचित अशी तिरंगी लढत होणार आहे.     

बुलडाणा : शिवसेनेसह भाजपला बंडोबांची झाली लागण
बुलडाणा जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी केवळ बुलडाणा मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. युतीत शिवसेनेला सुटलेल्या या मतदारसंघातून माजी आमदार विजयराज शिंदे यांचे तिकीट कापल्याने त्यांनी बंडखोरी करत वंचितचा झेंडा हाती घेतला आहे. शिंदे यांच्या जागी गेल्या विधानसभेला दुसऱ्या क्रमांकाची मतं घेणाऱ्या संजय गायकवाड यांना शिवसेनेने रिंगणात उतरवले आहे. याच मतदारसंघातील भाजपचे इच्छुक योगेंद्र गोडे यांनीही बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला आहे. युतीतील या बंडखोरीचा फायदा आघाडीला होऊ शकतो. काँग्रेसचे विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ हे आघाडीचे उमेदवार आहेत. चिखली मतदारसंघात काँग्रेसचे राहुल बोंद्रे व भाजपच्या श्वेता महाले यांच्यात थेट लढत होणार आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे व शिवसेनेचे शशिकांत खेडेकर यांच्यातच लढत होणार आहे. या मतदारसंघात वंचितही निर्णायक ठरणार आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघ राखण्यासाठी विद्यमान आमदार चैनसुख संचेती यांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. खामगावमध्ये ऐनवेळी काँग्रेसचे माजी आमदार सानंदा यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. जळगाव जामोदवर वर्चस्व राखण्यासाठी मंत्री डॉ. संजय कुटे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. मेहकर मतदारसंघात युती व आघाडीत सरळ लढत आहे. 
 

अकोला :तीन मतदारसंघांत बंडखोरी
अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी तीन मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. बाळापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे संग्राम गावंडे व युतीचे नितीन देशमुख उभे आहेत. अकोला पूर्व मतदारसंघात वंचितकडून माजी आमदार हरिदास भदे, तर युतीकडून रणधीर सावरकर उभे आहेत. आघाडीचे विवेक पारस्कर आमने-सामने आहेत. अकोला पश्चिममध्ये युतीकडून गोवर्धन शर्मा, आघाडीकडून साजिद खान पठाण, तर काँग्रेसचे मदन भरगड यांनी बंडखोरी करत वंचित अाघाडीचा झेंडा हातात घेतला आहे. अकोटमध्ये काँग्रेसकडून संजय बोडखे, भाजपकडून आमदार प्रकाश भारसाकळे, वंचितकडून अॅड. संतोष रहाटे मैदानात आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे अनिल गावंडे यांनी बंडखोरी केली असून ते अपक्ष मैदानात आहेत. मूर्तिजापूरमध्ये भाजप-शिवसेनेकडून आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीकडून रवीकुमार राठी, वंचित बहुजन आघाडीकडून प्रतिभा अवचार मैदानात आहेत. या मतदारसंघात भाजपचे राजकुमार नाचणे व शिवसेनेचे आशिष बढे यांनी बंडखोरी करत युतीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढवल्या आहेत.
 

धामणगाव आणि  दर्यापूर : भाजप-काँग्रेसमध्येही नाराजीचे सू
अमरावती जिल्ह्यात असलेल्या आठ मतदारसंघांपैकी धामणगाव रेल्वेे मतदारसंघात काँग्रेसने आमदार वीरेंद्र जगताप यांना उमेदवारी दिली आहे. याच वेळी काँग्रेसचे प्रवीण घुईखेडकर यांनी धामणगाव रेल्वे मतदारसंघातून बंडखोरी केली आहे. तसेच याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नीलेश विश्वकर्मा उभे आहेत. विश्वकर्मा हे काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे कट्टर समर्थक व युवक काँग्रेसचे पदाधिकारी होते, मात्र मागील तीन वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडली. या निवडणुकीत विश्वकर्मासुध्दा धामणगाव रेल्वेत वंचितकडून मैदानात असल्यामुळे काँग्रेसच्या मतांवर काही प्रमाणात फरक पडू शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. दर्यापूर मतदारसंघात भाजपकडून सीमा सावळे यांनी मागील वर्षभरापासून निवडणुकीची तयारी सुरू केली होेती. भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चाही होती. मात्र पक्षाने विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांनाच पुन्हा संधी दिली. त्यामुळे सीमा सावळे या दर्यापूर मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
 

वाशीम : तिन्ही मतदारसंघांत फाटाफूट
 
 मंगरूळपीर मतदारसंघात भाजपकडून लखन 
मलिक, सिद्धार्थ देवळे वंचितकडून, रजनी राठोड काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे शशिकांत पेंढारकर यांनी बंडखोरी केली आहे. त्याशिवाय काँग्रेसचे दिलीप भोजराज यांनी बसपकडून उमेदवारी घेतली आहे. युती आणि आघाडीत बंडखोरी झाल्यामुळे हे बंडखोर निर्णायक ठरणार आहे. रिसोड- मालेगाव मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनीच बंडखोरी केली आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार व आमदार अमित झनक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेचे विश्वनाथ सानप हे युतीचे उमेदवार आहे. कारंजा मतदारसंघात वंचित विकास आघाडीचे मो. युसूफ पुंजानी यांनी बंडखोरी करत बसपची उमेदवारी घेतली आहे.
 
 

यवतमाळ : सातपैकी पाच मतदारसंघांत नाराजांचा बंडाचा झेंडा...
यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या सात विधानसभा मतदारसंघांपैकी यवतमाळ, वणी, आर्णी, उमरखेड आणि दिग्रस या पाच मतदारसंघांत बंडखोरांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यात आर्णी मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राजू तोडसाम यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. दिग्रस मतदारसंघात भाजपचे संजय देशमुख यांनी बंडखोरी करीत शिवसेनेचे संजय राठोड यांच्याविरुद्ध मैदानात उतरले अाहेत. यवतमाळला शिवसेनेचे विधानसभा सहसंपर्कप्रमुख संतोष ढवळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. उमरखेड विधानसभेतही शिवसेनेचे पदाधिकारी असलेले डॉ. विश्वनाथ विनकरे यांना तिकीट न दिल्याने त्यांनी बंडखोरी करत निवडणूक मैदानात उडी घेतली आहे, तर वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर आणि संपर्कप्रमुख असलेले सुनील कातकाडे या दोघांनीही बंडखोरी करीत स्वतंत्ररीत्या अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. याच विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले डॉ. महेंद्र लोढा यांनी पक्षासोबत बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळवून निवडणुकीत उडी घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी केवळ पुसद आणि राळेगाव या दोन मतदारसंघातच कुठलीही बंडखोरी झालेली नाही. त्यात पुसद मतदारसंघात युतीचे उमेदवार म्हणून अॅड. नीलय नाईक, तर आघाडीचे उमेदवार म्हणून इंद्रनील नाईक मैदानात आहेत. राळेगाव मतदारसंघात युतीकडून आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, तर आघाडीकडून माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांच्यात लढत हाेत अाहे. 
 

गाडगेबाबांचे जन्मस्थळ शेंडगावच्या ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

अमरावती - अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव हे  कर्मयोगी गाडगेबाबांचे गाव. ते दर्यापूर मतदारसंघात येते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी चार वर्षांपूर्वी  या गावाच्या विकासासाठी कृती अाराखडा मंजूर करण्याचे वचन दिले हाेते, मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. या गावात अनेक समस्या अाहेत.  शेंडगाव ते निंभारी या रस्त्याने तर बैलगाडीही जाऊ शकत नाही. या निषेधार्थ शेंडगावच्या ग्रामस्थांनी अाता विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला अाहे.

बातम्या आणखी आहेत...