Home | National | Other State | rebel mla of karnataka detained in alleged 400 crore corruption case, what is ima scam

400 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी काँग्रेस आमदार विमानतळावरूनच ताब्यात, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 16, 2019, 12:21 PM IST

कर्नाटकच्या 16 बंडखोर आमदारांपैकी एक आहेत रोशन बेग

  • rebel mla of karnataka detained in alleged 400 crore corruption case, what is ima scam

    बंगळुरू - कर्नाटकमध्ये काँग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना विशेष तपास समितीने ताब्यात घेतले आहे. एका चार्टड प्लेनने ते बंगळुरू सोडणार होते. परंतु, ऐनवेळी एसआयटीने त्यांना अडवून ही कारवाई केली. रोशन बेग यांच्यावर 400 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. त्यांनी कथितरित्या 2006 मध्ये इस्लामिक बँकेचा संस्थापक मंसूर खानकडून ही लाच घेतली होती. विशेष म्हणजे, आयएमए घोटाळा म्हणूनही कुप्रसिद्ध असलेल्या या प्रकरणातील मुख्य आरोपी मंसूर खान सध्या परदेशात आहे. त्याने नुकताच एक व्हिडिओ जारी करून सर्वच गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार असे आश्वासन दिले आहे.


    कर्नाटकमध्ये बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावरून आधीच राजकारण पेटलेले आहे. त्यातच रोशन बेग यांना ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर येताच आणखी खळबळ उडाली आहे. कर्नाटकचे सीएम एचडी कुमारस्वामी यांनी ट्वीट करून या घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार, विशेष तपास समितीने आमदार बेग यांना 19 जुलै रोजी चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, कर्नाटकमध्ये ज्या 16 आमदारांनी राजीनामे जाहीर करून बंड पुकारला, त्यामध्ये रोशन बेग यांचाही समावेश आहे. बेग यांनी 9 जुलै रोजी राजीनामा दिला होता. त्याच्या अवघ्या काही तासांतच त्यांना आयएमए घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती. बेग यांनी आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.


    काय आहे आयएमए घोटाळा?
    मोहंमद मंसूर खानने 2006 मध्ये आयएमए नावाची एक पतसंस्था उघडली होती. या कंपनीच्या माध्यमातून इस्लामिक कायद्यानुसार, हलाल गुंतवणूक केली जाईल असे आश्वासन देण्यात आले. हलाल आणि हरामच्या नियमांमुळे बाजारात गुंतवणूक न करणारे धनाढ्य मुस्लिम व्यक्ती या संस्थेच्या रडारवर होते. या संस्थेने असंख्य मौलाना आणि धर्मगुरूंशी संपर्क साधला आणि धनाढ्य मुस्लिम कुटुंबांपर्यंत पोहोच मिळवली. अशाच पद्धतीने आयएमएने 2019 पर्यंत 2000 कोटींची गुंतवणूक मिळवली. यानंतर अचानक कंपनी देशोधडीला लागली आणि 7 जून रोजी संस्थापक मोहंमद मंसूर खान परदेशात पसार झाला. त्यानेच एक व्हिडिओ जारी करून काँग्रेस आमदार बेग यांच्यावर 400 कोटींची लाच घेतल्याचे आरोप लावले. तेव्हापासूनच चौकशीसाठी विशेष तपास समिती नेमण्यात आली.

Trending