आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी, राजूबापू पाटील यांनी भरला अपक्ष अर्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संदीप शिंदे  माढा- सोलापूर जिल्ह्यातील  माढा विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अनेक नाट्यमय घडामोडी घडत असताना दिसत आहे. तालुक्यातील आ.बबनराव शिंदे विरोधकांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब  साठे, माजी ता.प.सदस्य.पृथ्वीराज सावंत, समाज कल्याण विभागाचे माजी सभापती शिवाजी कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे धानोरे ता.माढा येथील  पंडित देशमुख, शेकाप नेते अॅड. सुरेश उर्फ बाळासाहेब पाटील या सर्वांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत. दादासाहेब साठे हे भाजपा पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भुषवित आहेत. ते गत 2014 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपा पुरस्कृत निवडणुक लढवली होती. पाच वर्षापासून भाजप पक्षात ते सक्रिय आहेत. त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा अॅड. मीनल साठे यांनी देखील गुरुवारी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मागील जि.प.च्या निवडणुकीत जि.प.गटाचे तिकिट न मिळाल्याने शिवाजी कांबळे हे आमदार शिंदेंपासुन दुर गेलेत. अॅड बाळासाहेब पाटील हे माजी आ.भाई एस.एम पाटील यांचे पूत्र असुन, त्यांनी गळ्यात शेकापचे पंचे घालत व डोक्यावर गांधी टोपी परिधान करुन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाई एस.एम पाटील यांची आठवण जागृत झाली.
पंढरपुर तालुक्यातील भोसे गावचे राजुबापु पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन राष्ट्रवादी काँग्रेस मधुन बंडखोरी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक वर्षांपासून ते काम करीत आले आहेत. माढा विधानसभा मतदार संघात पंढरपुर तालुक्यातील 42 गावे समाविष्ट असुन ती नेहमीच निर्णायक ठरत आली आहेत. राजुबापु पाटील हे माढ्याचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांना आतापर्यंत च्या  निवडणुकीत मदत करत आले आहेत. जि.प.अध्यक्ष संजय शिंदे यांना लोकसभेच्या निवडणुकीत देखील राजुबापु पाटील यानी साथ दिली होती. दरम्यान त्यानंतर आ.बबनराव शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत दुरावा घेत जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यक्रमाला दांडी मारत पक्षांतर करण्याच्या दृष्टीने तिकिटासाठी शिवसेना व भाजपा पक्षात राहिले. तिथे मेळ लागेना म्हणुन ते राष्ट्रवादीत आले. त्यांच्या  उमेदवारीचा निर्णय घेताना पक्ष श्रेष्ठींनी विचारात घेतले नसल्याची खंत व्यक्त करताना शरद पवार माझ्या हृदयात असल्याचे ही त्यांनी दिव्य मराठी शी बोलताना सांगितले.
त्यांनी बंडखोरी करत समर्थकांसह आपला अपक्ष उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. त्यांचा अर्ज शेवटपर्यंत राहिल्यास पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीची  मते पाटील यांच्या पारड्यात पडतील. याचा फटका राष्ट्रवादी पक्षालाच बसणार आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज अखेर पर्यंत राहणार? की पक्ष श्रेष्ठी त्यांची मनधरणी करणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
  

ट्रॅफिकचा उमेदवाराला फटका अन हिरमोड
माढा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत असलेल्या बाळासाहेब नामदेव इंगवले या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारास येण्यास तीन मिनिट उशीर झाला. तीन वाजून तीन मिनिटांनी ते कक्षा समोर पोहचले. शहरातील ट्रॅफिकचा मला फटका बसल्याचे यावेळी त्यांनी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यांना उशीर झाल्याने अर्ज घेणार नसल्याचे स्पष्ट केले आणि त्यांचा हिरमोड झाला.

बातम्या आणखी आहेत...