आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करुणानिधींच्या निधनानंतर द्रमुकमध्ये बंडाचे सूर, मोठ्या भावाने स्टॅलिन यांना दिले आव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर सहा दिवसांनीच त्यांचे उत्तराधिकारी मानले जाणारे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांना मोठा भाऊ अळगिरी यांच्याकडून आव्हान मिळणार असल्याचे चित्र आहे. चार वर्षांपूर्वी पक्षातून निलंबित करण्यात आलेले अळगिरी यांनी सोमवारी ‘माझ्या वडिलांशी निष्ठा असलेले पक्षाचे सर्व कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहेत. तामिळनाडूची जनता आणि द्रमुकचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. काळच पुढील गोष्टींवर उत्तर देईल,’ असे म्हणत स्टॅलिन यांना खुले आव्हान दिले आहे. 


अळगिरी यांनी सोमवारी मरिना बीचवर जाऊन करुणानिधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  स्टॅलिन आणि अळगिरी हे दोघेही करुणानिधी यांची पहिली पत्नी दयालू यांचे पुत्र आहेत. मंगळवारीच पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. त्यापूर्वीच एक दिवस आधी अळगिरी यांचे हे वक्तव्य आले आहे. पक्षाची बैठक करुणानिधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बोलावण्यात आली आहे, पण तीत द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष असलेले एम. के. स्टॅलिन यांना कायमस्वरूपी अध्यक्ष करण्याबाबत चर्चा होऊ शकते. पक्षाच्या सर्व नेत्यांना बैठकीला हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.  


करुणानिधी यांनीच २०१४ मध्ये अळगिरींना पक्षामधून केले होते निलंबित
अळगिरी यांना मार्च २०१४ मध्ये करुणानिधी यांनीच द्रमुकमधून निलंबित केले होते. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया करणे आणि ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध वक्तव्ये केल्याचा आरोप होता. पक्षातून निलंबित केल्यानंतर अळगिरी यांनी ‘करुणानिधी हे माझ्यात आणि स्टॅलिन यांच्यात भेदभाव करतात,’ असा थेट आरोप केला होता. करुणानिधी यांनी स्टॅलिन यांना २०१४ मध्येच आपला उत्तराधिकारी जाहीर केले होते आणि जानेवारी २०१७ मध्ये कार्यकारी अध्यक्ष केले होते.  


स्टॅलिन यांचा पक्षकार्याचा अनुभव अळगिरींपेक्षा मोठा  
स्टॅलिन यांचा पक्षकार्याचा अनुभव अळगिरी यांच्यापेक्षा मोठा आहे. स्टॅलिन यांनी परिश्रमपूर्वक पक्षाचे काम सुरू केल्यामुळे ते  करुणानिधी यांचे आवडते ठरले. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाचे कोषाध्यक्षपद सोपवण्यात आले होते. तब्बल ३० वर्षे ते युवक शाखेचे सचिव होते. याउलट अळगिरी हे पडद्यामागेच होते. २००९ मध्ये मदुराईमधील तिरुमंगलम मतदारसंघातील पोटनिवडणुकीत द्रमुकच्या विजयानंतर अळगिरी यांच्याकडे दक्षिण विभागाच्या संघटनात्मक सचिव या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 


अळगिरी-स्टॅलिन यांच्यात अनेक वर्षांपासून वाद
करुणानिधींचा वारसा कोणाकडे, या मुद्द्यावरून अळगिरी आणि स्टॅलिन यांच्यात वाद आहेत. पक्षातून निलंबित होण्याआधी त्यांनी, ‘द्रमुक हा काही मठ आहे का, की तेथे मठाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याची निवड करू शकतात,’ असा प्रश्न उपस्थित केला होता.   

 

बातम्या आणखी आहेत...