आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वंचितां’चे बंड!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात विधानसभा निवडणुकीत रंग भरू लागलेले असताना राजकारणाचे एकापेक्षा एक अनोखे ढंग उभा महाराष्ट्र ‘याचि डोळा’ अनुभवतो आहे. काल-परवापर्यंत स्वबळाचा शड्डू ठोकत विरोधकांप्रमाणेच आडव्या येणाऱ्या मित्रांनाही उचलून पटकावण्याची तयारी ठेवणाऱ्यांनाही यंदाचे मैदान वाटते तितके सोपे राहिलेले नाही. एखाद्या पक्षाला कुठल्या ना कुठल्या कारणामुळे हमखास सत्ता मिळते, असा समज दृढ झाला की तिकडे अनेकांची पावले वळू लागतात. त्या पक्षाची विचारसरणी, कार्यपद्धती, ध्येयधोरणे असे कोणतेही गुण न जमणारेही तिथे जाऊन घरोबा करतात. आपल्या पक्षात वंचितावस्था आली म्हणून चलती असलेल्या पक्षांत उड्या मारणाऱ्या सत्तातुरांना आपल्याकडे सन्मानाने घेऊन उमेदवारी देण्याची स्पर्धा सर्वच प्रमुख पक्षांमध्ये लागते. त्याचे जरासेही वैषम्य कुणाला वाटत नाही. सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे आपले राजकारण किती सत्ताकेंद्री आणि निबर झाले आहे याची प्रचिती येण्यास या घटना पुरेशा आहेत. एक- दोन दिवसांत तर सत्ताधारी भाजप, शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाले आहे. अर्ज भरण्याच्या अखेरपर्यंत ते सुरू राहील. आपल्या पक्षाकडून उमेदवारी वा सोयीच्या मतदारसंघापासून वंचित झालेल्या अनेकांनी दुसऱ्या पक्षात शिरकाव केला, पण अशा उपऱ्या वंचितांना संधी देणाऱ्या पक्षांतील निष्ठावंत नेते मात्र उमेदवारीपासून वंचित राहिले. काही राहिले, तर काही ठेवले गेले. मुक्ताईनगरातील ‘नाथाघरची उलटी खूण’ आणि बोरिवलीतील ‘तावडी’त सापडलेली संधी ही या दुसऱ्या प्रकाराची उदाहरणे. संधिसाधू वंचित विरुद्ध निष्ठावान वंचित यांच्या संघर्षात अनेक ठिकाणी बंडाचे झेंडे फडकण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याला बळ देणारे नाराजांचे मेळे जागोजागी भरू लागले आहेत. सत्तेसाठी फोडाफोडीचे सत्र सुरू केलेल्यांना या असंतोषाची धग लागू शकते. त्याच वेळी आपणच सुरू केलेला हा खेळ त्यांच्या अंगाशीही येऊ शकतो. सत्तेपासून वंचित राहण्याची वेळ आल्यावर काहीही कारणे काढून अन्य पक्षांत जाणाऱ्यांवरही त्याची किंमत चुकवण्याची वेळ येऊ शकते. केंद्रात दुसऱ्यांदा सत्ता आल्याने चौखूर उधळलेल्या भाजपला निष्ठावंत वंचितांचा फटका बसू शकतो. या पक्षाने प्रसंगी सर्व जागा लढवण्याची तयारी ठेवली होती, पण त्यातही काहींना तिकीट न देण्याचे आधीच ठरले असावे, अशी शंका नंतरच्या घटनाक्रमावरून येते. अनेक निष्ठावंतांच्या ‘वंचितां’पर्यंतच्या प्रवासामागे पक्षांतर्गत राजकारण हेच प्रमुख कारण आहे. साम-दाम-दंड-भेदाच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा मंत्र गवसल्यावर तत्त्वनिष्ठा वगैरे गोष्टींना फारसा अर्थ उरत नाही. मग पक्षांच्या सीमा इतक्या धूसर होतात की ‘स्वाभिमान’ गुंडाळून ‘रयत क्रांती’ची भाषा केली जाते! गुणवत्ता आणि एकनिष्ठता ही मूल्ये प्रचलित राजकारणातून कालबाह्य झाली आहेत, असे वाटावे इतकी अवकळा एकूणच या क्षेत्रातील वर्तनव्यवहाराला आली आहे. ‘अंतिम सत्ता जनतेची’ हे नागरिकशास्त्रातील सूत्र प्रत्यक्षात कसे आणि किती येते यावरच आता राजकारणाचे भवितव्य अवलंबून आहे!

बातम्या आणखी आहेत...