आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर महाराष्ट्रात बंडखोरांचा उच्छाद; युतीला फुटला घाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही अपवाद वगळता उत्तर महाराष्ट्रात महायुतीचाच प्रभाव राहिल, असे चित्र हाेते. पण बदलत्या राजकीय घडामाेडीत भाजप व शिवसेनांतर्गत बंडाळी, हिशेब चुकते करण्याची इर्षा यामुळे महायुतीचा प्रभाव घटत असल्याची चिन्हे अाहेत. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर ५ या जिल्ह्यातील ४७ मतदारसंघ अाहेत. सुरुवातीला, अर्थात महाजनादेश यात्रेपर्यंत एकतर्फी दिसणारी ही निवडणूक अाता चुरशीची बनली अाहे. मंदी, बेरोजगारी, कांदा निर्यातबंदी, शेतकरी आत्महत्या, शहर विकासाच्या प्रश्नांकडे कानाडोळा करीत भावनिक व राष्ट्रवादाशी संलग्न कलम ३७० अन्् तलाकसारख्या मुद्यांवर भर दिला जात असल्याने निवडणुकीची हवा कोणत्या दिशेने वाहते आहे, हेच स्पष्ट होत आहे. तथापि, शरद पवारांच्या ईडी कार्यालयावरील चालीमुळे निवडणुकीच्या शिडात हवा भरली गेल्याने रंगत वाढली अाहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १५ मतदारसंघ आहेत. १९८५ चा शरद पवार यांचा अपवाद वगळला तर या जिल्ह्यातील सर्व जागांवर कधीच एका पक्षाला मिळाल्या नाहीत. २०१४ ला अगदी मोदी लाटेतही भाजपला अवघ्या ४ जागा मिळाल्या. त्या तुलनेत शिवसेना बऱ्यापैकी प्रभाव आहे. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी भक्कम आहे. माकपचा एकमेव आदिवासीबहुल पारंपरिक मतदारसंघ आहे. जिल्ह्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी चार तर काँग्रेसचे दाेन अामदार अाहेत. नाशिक पूर्वमध्ये तिकीट नाकारल्याने भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांंनी बंड करत राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली. भाजपने त्यांना शह देतानाच जातसमीकरणाचा समतोल साधण्यासाठी मनसेतून अालेले राहुल ढिकलेंना मैदानात उतरविले. त्यामुळे निष्ठावान तर दुखावलेेच, शिवाय अनेक इच्छुकांचाही हिरमोड झाला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सानप यांची कार्यालयात जाऊन गळाभेट घेतली. पश्चिममध्येही भाजपच्या सीमा हिरे यांना सेनेचे बंडखोर विलास शिंदे यांनी आव्हान दिले आहे. सेना नेतृत्वाने हिरे यांना दिलासा देण्याऐवजी शिंदे यांची निशाणी बॅटद्वाराच बॅटिंग करण्याची भूमिका घेतली. मध्यमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे यांना काँग्रेसच्या हेमलता पाटील व मनसेचे नितीन भोसले यांचे कडवे आव्हान आहे. देवळालीत सेनेचे आमदार योगेश घोलप यांना भाजपतून राष्ट्रवादीत गेलेल्या सरोज अहिरे यांनी नाकात दम आणला आहे. येवला, नांदगाव, निफाड, मालेगाव बाह्य, कळवण, देवळा, इगतपुरी, सिन्नर येथील लढतीही चुरशीच्या ठरू शकतात. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मांजरपाड्याचे पाणी दुष्काळग्रस्त येवल्यात आणल्यामुळे मतदार अन्् ते स्वत: सुखावले. त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी अजित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या अटकेचा जुना मुद्दा उकरून काढत निवडणुकीच्या तोंडावर जखमेवरील खपली काढली आहे. मुलगा पंकजसमोर नांदगाव मतदारसंघात सेना उमेदवार सुहास कांदे यांच्या आव्हानामुळे लागलेली चिंता, स्वत:च्या येवला मतदारसंघातूनही वाढत गेलेला विरोध, ईडीचा जाच अन्् त्यात या नवीन वादाची भर यामुळे छगनराव चक्रव्यूहात अडकले अाहेत. शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनाही मालेगाव बाह्यची जागा शाबूत ठेवण्याची कसरत करावी लागत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे यांच्यामुळे तिथे चुरस अाहे. देवळ्यात आमदार राहुल आहेर यांनी कांदा प्रश्नावर थेट पंतप्रधानांना साकडे घालून शेतकऱ्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला खरा, पण देवळा विरुद्ध चांदवड या प्रांतवादावर ते कसे मात करतात हे पहायचे. निफाडमध्ये आमदार अनिल कदम व राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांच्यात लढत आहे. कदमांचे चुलत बंधू यतिन यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उडी मारली खरी; पण भाजपकडून विरोधकांना छुपी मदत होत असल्याची बोंब झाल्याने येथील वातावरणही गरम झाले आहे. इगतपुरीच्या आमदार निर्मला गावितांनी निवडणुकीआधीच शिवबंधन बांधल्याने या मतदारसंघातील राजकीय फासे उलटे पडतात की सरळ, याकडे लक्ष लागले आहे. मालेगाव मध्य हा मुस्लिमबहुल मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात असला तरी यावेळी एमआयएममुळे चुरस अाहे.

जळगावात खडसे- महाजन वाद
मुख्यमंत्र्यांचे विश्वासू गिरीश महाजन व वादग्रस्त भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्षामुळे चर्चेत राहिलेल्या जळगाव जिल्ह्याला पक्षांतर्गत बंडाळीने ग्रासले आहे. जिल्ह्यात ११ मतदारसंघ आहेत. एरंडोलचा अपवाद सोडला तर अन्य दहा जागी युतीचे वर्चस्व आहे. पण, महाजन विरुद्ध खडसे यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईतून भाजपात मोठी बंडाळी उभी राहिली. त्याचाच परिपाक म्हणजे एकेकाळी पक्षातील अनाथांचे नाथ असलेल्या नाथाभाऊंना उमेदवारीच्या रिंगणातूनच अनाथ होण्याची वेळ आली. कन्या रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली. तथापि, शिवसेना जिल्हाप्रमुखांनीच रोहिणींच्या विरोधात बंड उभारले असून त्याला महाजनांची फूस असल्याची चर्चा आहे. ज्या भडगाव पाचोरा, चोपडा, एरंडोल व जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार लढत आहेत, तिथे भाजपच्या बंडखोरांनी विरोधाचे निशाण फडकावले आहे. हीच बाब मोदी यांच्या सभेच्या वेळी जलसंपदामंत्री महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीतून उघड झाला.

नाशिकमध्ये भाजप- शिवसेनेतील धुसफूस वाढल्याने अधिकृत उमेदवारांना डाेकेदुखी; भुजबळ- खडसे- महाजनांची प्रतिष्ठा पणाला... 
विधानसभा मतदारसंघ : ४७
जिल्हे : ०५, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर
प्रभावी समाजघटक : मराठा, माळी, वंजारी, धनगर, आदिवासी, मुस्लिम, अनुसूचित जाती

२०१४ ची अामदार संख्या
१९ भाजप
०८ शिवसेना
१० काँग्रेस
८ राष्ट्रवादी
०१ माकप
०१ इतर

नगर : विखेंच्या पक्षांतरामुळे चित्र बदलले
नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे बडे नेते राधाकृष्ण विखे समर्थकांसह भाजपत दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातील संगमनेरवगळता १२ पैकी ११ जागांवर भाजपचे वर्चस्व राहील असा दावा केला जात आहे. पण, या जिल्ह्यातही बंडखोरीने डोके वर काढले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची संगमनेर बालेकिल्ला सांभाळताना कसाेटी लागत अाहे. तसेच अन्य उमेदवार निवडून आणण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे. शरद पवार यांचा नातू रोहितने कर्जत-जामखेडमधून नशीब अाजमावत असून भाजपचे मंत्री राम शिंदेंशी त्यांची लढत अाहे. कोपरगावला स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर भाजपचेच माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांचे पुत्र विजय तसेच राधाकृष्ण विखेंचे शालक राजेश परजणे यांनी आव्हान उभे केले आहे.

मुद्दे आणि दावे-प्रतिदावे
मुख्यमंत्र्यांचे दत्तक नाशिक
नाशिकमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत ३००
कोटींची कामे
वैद्यकीय महाविद्यालय
ग्रामीण भागातील रस्त्यांचे विस्तारीकरण
टायरबेस्ड मेट्रो

धुळे : पटेल, पावरांमुळे भाजपची ताकद वाढली
धुळे जिल्ह्यातील पाचपैकी साक्री, शिरपूर व धुळे ग्रामीण काँग्रेसकडे तर धुळे शहर व शिंदखेडा-दोंडाईचा भाजपकडे आहेत. बंडाळीची लागण येथेही आहे. धुळ्यातील आमदार अनिल गोटे यांनी भाजपला रामराम करत यंदा अाघाडी पुरस्कृत उमेदवारी दाखल केली. त्यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी व अपक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याशी लढत आहे. काँग्रेसचा एकेकाळचा हा गड अा. अमरिश पटेल व काशीनाथ पावरा यांच्या भाजप प्रवेशामुळे खिळखिळा झालाय. पर्यटनमंत्री जयकुमार रावल दोंडाईतून उमेदवारी करीत आहेत. तथापि, काँग्रेसचे माजी नेते रोहिदास दाजी पाटील यांचे पुत्र विद्यमान आमदार कुणाल हे पुन्हा धुळे ग्रामीणमधून नशीब अाजमावत आहेत. काँग्रेसचेच नेते द. वा. पाटील यांच्या स्नुषा ज्ञानज्योती भदाणे यांनी भाजपकडून कुणाल यांना आव्हान दिले आहे.

विरोधकांचे प्रतिदावे
स्मार्ट सिटीची कामे रखडली
बससेवा-मेट्रो कागदावरच
संपूर्ण कर्जमाफीचा दावा फोल
बेरोजगारी व मंदीत वाढ
शेतीमालाच्या भावाचा प्रश्न
कांदा निर्यातबंदीचा मुद्दा

नंदुरबार : पक्षांतरामुळे काँग्रेस खिळखिळी
एकेकाळचा बालेकिल्ला नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस संपतेय की काय अशी राजकीय स्थिती आहे. ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा मुलगा भरत भाजपमध्ये तर कन्या निर्मला शिवसेनेत गेल्यात. काँग्रेसचे चंद्रकांत रघुवंशी सेनेत आले आहेत. सुरुपसिंग नाईक, के. सी. पाडवी, पद्माकर वळवी हीच बोटावर मोजण्याइतकी मंडळी काँग्रेसमध्ये शिल्लक राहिलीत. खासदार हिना गावित यांच्या रूपाने भाजपचा या जिल्ह्यात प्रवेश झाला. त्यांचे वडील डाॅ.विजयकुमार यांनी पकड घट्ट करीत जिल्हाच भाजपमय करण्याच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत काँग्रेस चारपैकी किती मतदारसंघांवर कब्जा मिळवते यावर बरेच काही अवलंबून आहे. असे सारे एकूण उत्तर महाराष्ट्राचे चित्र आहे.

हायप्रोफाइल उमेदवार
छगन भुजबळ (येवला), दादा भुसे (मालेगाव बाह्य,) जयकुमार रावल (शिंदखेडा), डाॅ. विजयकुमार गावित (नंदुरबार), गिरीश महाजन (जामनेर), रोहिणी खडसे (मुक्ताईनगर), गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), बाळासाहेब थोरात (संगमनेर), राम शिंदे व रोहित पवार (कर्जत-जामखेड)