आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखाेर लवकरच युतीला पाठिंबा देतील : चंद्रकांतदादा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माेडकळीस आलेले पक्ष आहेत. या पक्षातील नेते व कार्यकर्त्यांना भविष्य राहिलेले नााही. त्यामुळेच ते भाजप-शिवसेनेकडे येत आहेत. अगदी पवार कुटुंबातीलही कुणी उद्या आमच्याकडे आले तर आश्चर्य वाटू नये, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना व्यक्त केले. भाजपमधील अनेक बंडखाेरांची मने आम्ही वळवून त्यांना माघार घ्यायला लावली आहे. जे रिंगणात आहेत तेही लवकरच युतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देतील, असा दावाही पाटील यांनी केला.

प्रश्न : जर भाजपची खरंच ताकद वाढली तर तुमचा पक्ष यंदाही स्वबळावर का नाही लढला?
पाटील : आम्ही शिवसेनेसाेबत युती ही तडजाेडीसाठी नव्हे तर एकसमान अजेंड‌्यासाठी केली आहे. हिंदुत्व आणि विकास हे एकमेकांना समानार्थी शब्द आहेत. हिंदू हे उपासना पद्धत म्हणून अपेक्षित नाही तर हिंदू हे गुणवाचक आहे. प्रेम, आपुलकी, श्रद्धा, विश्वास याच्याशी जाेडलेला ताे शब्द आहे. या गुणवाचक शब्दावर जी संस्कृती निर्माण झाली तिला हिंदू संस्कृती म्हणतात. त्या प्रेम, आपुलकी, आत्मीयतेत विकास येताे, प्रेमातूनच लाेकांच्या अडचणी साेडवता येतात आणि त्यावर मात करता येते. हिंदुत्व व विकासाचा समान धागा असल्याने ताेच पकडून आम्ही एकत्र आलाे आहाेत. राज्यात मित्रपक्षांसह भाजप १६४ जागा लढवत आहे. मित्रपक्षांना साेबत घेऊनच आम्ही सत्ता स्थापन करणार.

प्रश्न : आयात उमेदवारांमध्ये निष्ठावंतांवर अन्याय झालाय का?
पाटील : फक्त १० टक्केच जागांवर भाजपने आयात उमेदवारांना संधी दिली आहे. उर्वरित ठिकाणी भाजपचे जुने, निष्ठावंत व राज्यस्तरावर काम करणारे लाेक हेच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आयारामांमुळेही पक्षाला फटका बसणार नाही.

प्रश्न : विजयसिंह माेहिते, रणजितसिंह माेहिते यांच्याबाबत काय ठरवलं अाहे?
पाटील : लाेकसभेच्या कामात ते पक्षासाेबत सक्रिय हाेते. त्यांचा माळशिरस मतदारसंघ हा राखीव असल्याने ते लढू शकत नव्हते. त्यांनी सांगितलेल्या राम सातपुते या उमेदवाराला तिकीट दिले आहे. निवडणुकीनंतर या दाेघांना उचित सन्मान देण्यात येल.

प्रश्न : निवडणूक महाराष्ट्राची असूनही 'कलम ३७०' सारख्या मुद्द्यांवर जाेर का?
पाटील : कलम ३७० बाबत बाेलणे काय पाप आहे का? जम्मू-काश्मीर काय देशाचा हिस्सा नाही का? ताे देशविराेधी मुद्दा आहे का? नाही तर विराेधकांना आपत्ती का वाटते. कलम ३७० साेबतच मागील पाच वर्षांत राज्य सरकारने काेणती विकासकामे केली याबाबतही आम्ही जनतेत जाऊन सांगत आहाेतच. पुढील पाच वर्षांत आम्ही काेणती कामे करणार हे पण सांगत आहाेत. शरद पवार यांनी प्रथम हे जाहीर करावे की कलम ३७० रद्द करणे देशद्राेह आहे का?

प्रश्न : आदित्य यांना उपमुख्यमंत्रिपद देणार का?
पाटील : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा निवडणुकीनंतरचा विषय आहे. दाेन्ही पक्षांतील वरिष्ठ नेते व निवडून आलेले आमदार हे एकमताने त्याबाबत निर्णय घेतील. आमच्या पक्षात केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय अंतिम असताे. राज्य नेतृत्वात काेणताही बदल हाेणार नाही.

प्रश्न : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणे ही राष्ट्रवादीची चूक हाेती, अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे? त्याबद्दल काय सांगाल...
पाटील : ज्यांनी त्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा निर्णय घेतला, त्यांना काय शिक्षा हाेणार हेही अजित पवारांनी स्पष्ट करायला हवे.

प्रश्न : काेथरूडच का?
पाटील : पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले म्हणून काेथरूड मतदारसंघ निवडला.

प्रश्न : एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांची तिकिटे का कापली?
पाटील : हा निर्णय सर्वस्वी केंद्रीय नेतृत्वाचा आहे. याबाबत काही माहिती असेल तरी मी सांगणार नाही.

प्रश्न : बारामतीत गाेपीचंद पडळकर हे अजित पवारांना आव्हान देतील का?
पाटील : गाेपीचंद पडळकर हे प्रामाणिकपणे लढून बारामतीत राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांना कडवी लढत देतील यात शंका नाही.

प्रश्न : बंडखाेरीचा कितपत फटका बसेल?
पाटील : शिवसेना आणि भाजपच्या काही जागांवर बंडखाेरी झाली हाेती हे खरंय, पण ती शमवण्यातही यश आलेले आहे. बंड करणे हा मनुष्याचा स्थायी भाव असून पक्ष जिवंतपणाचे लक्षण आहे. परंतु त्यानंतर बंडखाेराशी चर्चा करून त्यांना समजावून सांगणे हे महत्त्वाचे असते. ज्या ठिकाणी भाजप बंडखाेरांनी अर्ज मागे घेतले नाहीत, त्यांच्याशी बाेलणी करण्यात येत आहे. पेपरवर जरी ते निवडणूक लढवत असले तरी यापैकी अनेक जण लवकरच अधिकृत उमेवाराला पाठिंबा देतील, असे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...