Mumbai / उशिराचे शहाणपण : जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाची माेहीम आता युद्धस्तरावर, डोंगरी दुर्घटनेनंतर जाग 

दुर्घटनेसाठी जबाबदार लोकांवर कारवाई : सुभाष देसाई

दिव्य मराठी

Jul 17,2019 09:20:00 AM IST

मुंबई - मुंबईच्या डोंगरी भागातील इमारत कोसळून ११ जणांचे जीव गेल्यानंतर सरकारला उशिराचे शहाणपण सुचले आहे. गृहराज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. ते म्हणाले, ‘इमारत कुणाच्याही मालकीची का असेना, दुर्घटना घडली असून त्याची जबाबदारी सरकार म्हणून आम्ही स्वीकारत आहोत. यापुढे अशा सर्व जुन्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आलेला होता. मात्र इमारत कोसळण्याच्या वाढत्या घटनांकडे पाहता पुनर्विकासाची ही मोहीम युद्ध स्तरावर राबवण्यात येणार आहे.’


मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. ‘या अपघाताला जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन त्यांनी दिले. जखमींना जलद गतीने मदत पोहोचवण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले असून मुंबईतील धोकादायक इमारती आणि तेथील नागरिकांचे पुनर्वसन या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. मुंबईतील जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर झालेला आहे. दरवर्षी पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. प्रशासनाने अशा इमारतीमधील नागरिकांचे तत्काळ पुनर्वसन करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.


पुनर्विकास होण्याआधीच घडली भीषण दुर्घटना
डाेंगरीतील स्थानिक नागरिक अब्दुल सत्तार म्हणाले, या इमारतीची स्थिती अत्यंत वाईट झाल्याने पुनर्विकास करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला होता. मी आणि याच दुर्घटनेत ठार झालेले अब्दुल शेख इमारतीचे नवीन बांधकाम करणार होतो. गेल्याच आठवड्यात आमची बैठक झाली होती. ट्रस्ट अर्धे पैसे आणि रहिवासी अर्धे पैसे काढून या इमारतीचा पुनर्विकास करणार होते. परंतु त्याआधीच ही दुर्घटना घडून निष्पापांचे जीव गेले.


इमारत म्हाडाची नाही : वैशाली गडपाले
म्हाडाच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले म्हणाल्या, डोंगरी येथील २५/सी केसरबाई ही उपकरप्राप्त इमारत होती. परंतु ती कोसळलेली नाही. २०१८ मध्येच इमारत रिकामी केलेली आहे. ही इमारत आजही उभी आहे. दुर्घटनेत २५/सी केसरबाई इमारतीच्या मागील अनधिकृत बांधकामाचा भाग कोसळला अाहे. हे अनधिकृत बांधकाम उपकर प्राप्त नसल्याने म्हाडाच्या अखत्यारित येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


राजकीय नेत्यांच्या गर्दीमुळे रहिवाशी संतापले
डाेंगरी येथील दुर्घटनेनंतर राजकीय नेते मंडळींची घटनास्थळी लुडबूड वाढल्याने स्थानिक नागरिक चांगलेच संतापले. जिवंत असताना आम्हाला कसलीही मदत करत नाहीत, आता इमारत कोसळल्यावर नक्राश्रू ढाळण्यास नेते मंडळी येत आहेत, असा संताप स्थानिक रहिवाशांनी व्यक्त करत घोषणबाजीही केली.

X