आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नास नकार; प्रेयसीकडून प्रियकराचा कोयत्याने खून; पुण्यातील धायरीजवळील नऱ्हे येथील घटना

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे : लग्नाचे वचन देऊन, प्रियकराने आधीच लग्न केल्याचे समजताच, प्रेयसीने त्याच्या मानेवर कोयत्याचे घाव घालून हत्या केल्याची घटना येथील धायरीजवळ नऱ्हे परिसरात मंगळवारी उघडकीस आली. प्रियकराची हत्या केल्यानंतर तरुणी स्वत:च रक्तमाखल्या हत्यारासह पोलिस ठाण्यात हजर झाल्याने खळबळ उडाली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराधा करे (वय २४, रा. नारायण निवास, नऱ्हे, धायरी रस्ता, मूळ राहणार करेवाडी जत तालुका, जिल्हा सांगली) असे युवतीचे नाव आहे. महंतेश बिरादार (वय २८, रा. तालुका जत, जिल्हा सांगली) हे बालपणापासून मित्र होते. एकाच तालुक्यातील होते. अनुराधा नवले रुग्णालयात परिचारिका होती. चार-पाच वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र, तो विवाहासाठी टाळाटाळ करू लागला होता. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाले होते. या युवतीने आधी सिंहगड  पोलिस ठाण्यात त्याच्याविषयी तक्रारही दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री तो मद्यपान करून तिच्या घरी आला आणि माझे लग्न झाले आहे, असे त्याने तिला सांगितले. यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाले. पहाटे तो झोपलेला असताना, तिने कोयत्याने त्याच्या मानेवर वार करून त्याचा खून केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्वत:ही केला आत्महत्येचा प्रयत्न

प्रियकराला ठार केल्यानंतर तरुणीने स्वत:ही ओढणीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही. तेव्हा तिने वडिलांना फोन केला आणि खून केल्याचे सांगितले. वडिलांनी तिला पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. त्यानंतर ही युवती स्वत:च हत्यारासह पोलिस ठाण्यात हजर झाली आणि खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी तिला अटक केली आहे.