आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक पक्ष; आजचे दंडकारण्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपक पटवे   विंध्य पर्वतापासून थेट गोदावरीपर्यंत पसरलेले, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील काही भौगोलिक भाग व्यापलेले ९२,३०० चौरस किलोमीटर एवढ्या महाकाय क्षेत्रात पसरलेले जंगल म्हणजे दंडकारण्य. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवासात असताना या जंगलात काही काळ वास्तव्याला होते, असे संदर्भ रामायणात आहेत. महाभारतातही दंडकारण्याचा उल्लेख आढळतो. दंडक नावाच्या राक्षसावरून हे नाव पडले, असे सांगणारे तसेच हा प्रांत रावणाच्या राज्याचा भाग होता, असेही संदर्भ समोर येतात. इथे जसे राक्षस होते तसेच इथे ऋषी-मुनी साधनेसाठी येत असत. आज या नावाने एकत्रित प्रांत अस्तित्वात नाही. म्हणूनच दंडकारण्य हे एक मिथक मानले जाते. पण या सर्व संदर्भांचे आणि दंडकारण्याचे इथे काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. याचा संबंध या सदरातील मजकुराच्या प्रकृतीशी आहे आणि म्हणून सदराचे नामकरण ‘दंडकारण्य’ असे केले आहे. दंडशाही, राक्षसी वर्तन, अराजक, समृद्धी, शाप, उ:शाप, चारित्र्यवान आणि चारित्र्यहीन व्यक्तिमत्त्वे, संपन्नता, विपन्नता, लढाया, पराभव, जिंकणे, तह, शह, काटशह अशा साऱ्यांचे एकत्रित अस्तित्व म्हणजे तेव्हाचे दंडकारण्य आणि हेच सारे म्हणजे आजचे प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे राजकारण. महाराष्ट्रात सध्याचे सरकार अस्तित्वात येताना तुम्ही-आम्ही जे काही पाहिले आणि अनुभवले ते त्या दंडकारण्यापेक्षा वेगळे होते? व्यास मुनींनाही आपली प्रतिभा खुजी वाटावी असे राजकीय नाट्य या आधुनिक महाभारतात घडत होते. शह- काटशह, दावे-प्रतिदावे, आव्हाने-प्रतिआव्हाने, घुसखोरी, फितुरी, घरवापसी, सत्तेचा वापर, गैरवापर, भावनांचे भांडवल, पराभूत झालेला विजय, विजयी झालेला पराभव आणि काय काय नव्हते घडत इथे ? महाराष्ट्रातले राहू द्या, काही महिन्यांपूर्वी कर्नाटकात जे काही घडत होते आणि घडवले जात होते त्यात काय वेगळे होते? आणि या सर्वांचे खेळाडू होते प्रादेशिक पक्ष. त्या त्या राज्यातले प्रादेशिक अस्मितेवर मोठे झालेले आणि त्याच अस्मितांशी तडजोडी करणारे स्थानिक पक्ष. यासाठीच का हे प्रादेशिक पक्ष अस्तित्वात येतात? असा प्रश्न पडवा, अशी स्थिती. ही तर अलीकडची दोन राज्यांतील प्रादेशिक पक्षांची ताजी उदाहरणे आहेत. इतर राज्यांमध्ये फार काही वेगळी स्थिती नाही. कोणी १९ तर कोणी २० एवढाच फरक. स्थापन होतात तेव्हा त्यांचे काही उद्दिष्ट असते. त्यांची अशी खास अस्मिता असते. ती कधी भाषेची असते, तर कधी प्रांताची. कधी संस्कृतीची असते, तर कधी धर्माची. दक्षिणेकडे तर एखादी व्यक्तीच अस्मिता बनते. त्या अस्तिमेच्या पायावर यांची राजकीय इमारत उभी राहते आणि एकदा का त्या इमारतीला सत्तेचा सुखद वारा लागला की पाया कसला आहे हेच ते इमारतीचे कर्तेधर्ते विसरून जातात. मग सुरू होतात राजकीय तडजोडी आणि कारनामे. या तडजोडी नेहमीच यशस्वी होतात असे नाही. त्या त्या प्रांतातील जनताही त्या तडजोडी प्रत्येक वेळी स्वीकारते किंवा नाकारते, असेही नाही. जिथे व्यक्तीच अस्मिता असते आणि त्या अस्मितेचे रूपांतर देवत्वात होते तिथे तर त्या ‘देवा’ला काहीही  करण्याचा अधिकारच मिळतो. व्यक्तिपूजक ‘भक्त’ मग फरफटत जातात. पण त्यांचाही एक काळ असतो. तो संपतो. इतिहास बनतो. त्या इतिहासापासून काही शिकलेच तर त्या ‘देवा’ची जागा घेऊ पाहणारेच शिकतात. फरफटत जाण्यासाठी जनता पुन्हा आतुर झालेलीच असते.  प्रादेशिक पक्षांचा पाया स्थानिक अस्मिता असते हे सर्वसाधारण चित्र आहे. पण अस्मितेतून जन्मलेले सर्वच पक्ष, संघटना टिकतात, मोठे होतात, सत्ताधारी बनतात असे नाही. काही अस्मिताजन्य पक्ष उद्देश पूर्ण झाला की अस्तित्व गमावून बसतात. या सदरातून त्या सर्वांवर आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत. त्यासाठी आजपासून दर पंधरा दिवसांनी हा आजच्या दंडकारण्यातील फेरफटका मारायला तयार होताय ना?