आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकत्वाचा पेच : एनआरसीमध्ये नोंदणीसाठी पुनर्प्रक्रिया २५ सप्टेंबरपासून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये (एनआरसी) नाव सामील करण्यासाठी दाखल दाव्यांची प्रक्रिया २५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येईल. याविषयीच्या तक्रारींवरही या अवधीत सुनावणी करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. न्यायमूर्ती रंजन गोडगोड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले की, २५ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही प्रक्रिया ६० दिवस चालेल. ज्या नागरिकांची नावे एनआरसी यादीत नाहीत ते पुन्हा यासाठी दावा करू शकतात. कोर्टाने स्पष्ट केले की, दुसरी संधी केवळ १० दस्तऐवजांच्या आधारावर अवलंबून राहणार आहे. बाकी ५ दस्तऐवजांवर नंतर विचार केला जाईल. 


एनआरसी समन्वयक प्रतीक हजेला यांच्याकडे मागितला होता खुलासा
याप्रकरणी पुढील सुनावणी २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. एनआरसी आसामचे समन्वयक प्रतीक हजेला यांना केंद्र सरकारच्या याचिकेवर खुलासा देण्याचे आदेश न्यायपीठाने दिले होते. या नागरिकांकडे असलेल्या कागदपत्रांची वैधता आणि अवैधता तपासणे अपेक्षित आहे. कोणती कागदपत्रे ग्राह्य धरावीत हे प्रतीक हजेला यांनी सांगणे कोर्टाला अपेक्षित आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस कोर्टाने एनआरसीच्या अंतिम यादीतून वगळलेल्या ४० लाख लोकांना आणखी एक संधी देण्याचे फायदे व तोटे; यातील संभाव्य अडचणी यांच्यावर अहवाल देण्याचे आदेश दिले होते. या यादीतून नाव वगळल्याची अनेक नागरिकांची तक्रार आहे. या प्रकरणाचा आवाका आणि गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना दुसरी संधी देण्यात आली आहे. 


३० जुलै २०१८ रोजी अंतिम एनआरसी यादी झाली होती जारी 
३० जुलै २०१८ रोजी एनआरसी अंतिम यादी जारी करण्यात आली होती. यात ३.२९ कोटी लोकांपैकी २.८९ कोटी नागरिकांची नावे आहेत. ४० लाख ७० हजार ७०७ आसामी नागरिकांची नावे यात नाहीत. त्यातही ३७ लाख ५९ हजार ६३० जणांचा नागरिकत्वाचा दावा फेटाळण्यात आला आहे. २ लाख ४८ हजार ७७ नागरिकांचे दावे विचाराधीन आहेत. ५ सप्टेंबर रोजी कोर्टाने सुनावणी केली होती. नागरिकत्वासाठी दावा करणाऱ्यांचे पात्रता निकष या वेळी निश्चित केले. एकूण १५ विविध कागदपत्रांपैकी १० दस्तऐवजांना प्राधान्य देण्यात आले आहे. 


या कागदपत्रांना महत्त्व नाही 
१९५१ मधील प्रकाशित मतदार यादीतील नाव, प्रशासनाने जारी केलेले नागरिकत्व प्रमाणपत्र, अधिकृत प्राधिकरणाने जारी केलेले निर्वासित प्रमाणपत्र, अधिकृत शिक्का व स्वाक्षरी असलेले रेशन कार्ड यांचा समावेश एनआरसी यादीत नाव नोंदवण्यासाठी निर्धारित केलेल्या कागदपत्रांत नाही. आसाममध्ये अवैध मार्गाने घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींचे प्रमाण मोठे आहे. या एकमेव राज्यात एनआरसी लागू आहे. याची पहिली यादी १९५१ मध्ये जारी झाली होती. 


काय आहे समन्वयक प्रतीक हजेला यांच्या अहवालात ? 
२८ ऑगस्ट रोजी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आसाम एनआरसी समन्वयक प्रतीक हजेला यांनी अहवाल दिला होता. १० कागदपत्रे, योग्य निकष असल्याचे त्यांनी म्हटले. जमिनीसंबंधीची कागदपत्रे, नोंदणीकृत सेल डीड, स्थायी निवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट, एलआयसी विमा, सरकारकडून प्राप्त एखादा परवाना, सरकारी नोकर असल्याची कागदपत्रे, बँक- पोस्ट ऑफिस खाते, जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे इ.आधारे नागरिकत्व सिद्ध करणे अपेक्षित आहे. २४ मार्च १९७१ पासूनची ही कागदपत्रे असणे अपेक्षित आहे. 

बातम्या आणखी आहेत...