आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सगळे नकार नाकारून 'त्या' चालल्या अंधारातून प्रकाशवाट, 'तिमिरातुनी तेजाकडे' नेणारा नाइट वॉक पुण्यात उत्साहात

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे : तोडुनी आंधी-तुफाने चालल्या त्या.. पुण्यातला जंगली महाराज रस्ता नेहमीच प्रचंड वाहतुकीचा, वर्दळीचा..पण रविवारी रात्री हा वाहता रस्ताही थबकला होता. राणी लक्ष्मीबाईंच्या पुतळ्याभोवती आणि संपूर्ण परिसरात राज्य होतं लक्ष्मीबाईंच्याच लढाऊपणाचा, झुंझारपणाचा वारसा चालविणाऱ्या रातरागिणींचं.. शेकडोंच्या संख्येनं एकत्रित आलेल्या या स्त्री शक्तीच्या आविष्काराकडे येणारे जाणारे कुतूहलानं पाहात राहिले..त्यांच्या मुखातून उमटणाऱ्या रणगर्जनांनी आसमंत दुमदुमला. त्यांनी हातात धरलेल्या प्रज्वलित मशालीच्या ज्योतींनी उजळलेल्या त्यांच्या चेहऱ्यांवर नव्या आत्मविश्वासाचं, तेजानं आणि निर्भयतेचं लखलखतं चांदणं पसरलं होतं.

दै. दिव्य मराठी आयोजित महिलांचा नाइट वॉक हा आगळावेगळा उपक्रम रविवारी पुण्यात शेकडोंच्या संख्येनं उपस्थित स्त्री शक्तीनं खऱ्या अर्थानं नवी वाट उजळवणारा ठरला. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या पदांवर जबाबदाऱ्या पेलणाऱ्या स्त्रीशक्तीचं एक प्रातिनिधिक रूपच जणू जंगली महाराज रस्त्यावर अवतरलं होतं.

बालगंधर्व चौकातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ रात्री ठीक दहा वाजता नाइट वॉक उपक्रमाचा प्रारंभ झाला. थंडावा देणाऱ्या हवेत चहापानाने साऱ्या रातरागिणी ताज्यातवान्या झाल्या. अयोध्येहून आलेल्या विद्यार्थी मित्रांनी स्त्री शक्तीच्या जागरणाची गाणी सादर केली आणि हळूहळू उपस्थित रातरागिणींनींदेखिल त्या सुरांत सूर मिळवायला सुरुवात केली. पाठोपाठ कवयित्री आश्लेषा महाजन यांच्या स्त्रीमधील सुप्त सामर्थ्याला साद घालणाऱ्या कवितेने चैतन्य जागवले. अंनिच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांच्या सांगण्यातून अंधश्रद्धेचा अंधार दूर करण्याचा संदेश मिळाला.पुणे फॅमिली कोर्टच्या अध्यक्ष अॅड. रूपाली चांदणे, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्त्या माधुरीताई आवटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, पुण्याच्या उमपहापौर सरस्वती शेंडगे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

अंधारावर मात कराया, निघाल्या रातरागिणी

नाइट वॉक सुरू करण्याआधी रातरागिणींनी 'हात लावाल, खाक व्हाल, डोळे वटाराल राख व्हाल...सावित्रीच्या लेकी आम्ही, अंधाराला डरणार नाही..आम्ही दामिनी आम्ही वाघिणी, अंधारावर मात कराया, निघाल्या रातरागिणी...अशा घोषणा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...