Home | Magazine | Rasik | Relation inbetween Kylidoscopic goff article by Yashodhara Katkar

नातेसबंधांचा कॅलिडोस्कोपिक गोफ

यशोधरा काटकर | Update - Dec 09, 2018, 12:22 AM IST

मानवी नाते संबंधांचा नवा गोफचा मागोवा घेणारा लेख...

 • Relation inbetween Kylidoscopic goff article by Yashodhara Katkar

  आपण म्हणतो याला महोत्सव. पण हा महोत्सव "आणि साजरा केला गेला' वर्गात मोडणारा नव्हे, तर जाणिवा समृद्ध करणारा, जगण्याचं नवं भान देणारा असतो. यंदाचा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही त्याला अपवाद नव्हता. या महोत्सवाने मानवी नाते संबंधांचा नवा गोफ समोर मांडला होता. त्याचा हा मागोवा...

  भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी)यंदाचे ४९वे वर्ष अनेक कारणांनी गाजले आणि वाजलेही. या वर्षीच्या महोत्सवात ‘वर्ल्ड पॅनोरमा', ‘फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप' असे नेहमीचे विभाग होतेच, शिवाय इंगमार बर्गमन या ज्येष्ठ-श्रेष्ठ स्वीडिश दिग्दर्शकाच्या चित्रपटांचे ‘रेट्रोस्पेक्टिव्ह', इस्त्रायल या चित्रपटक्षेत्रात तुलनेने नव्या देशावर ‘कंट्री फोकस' इस्रायलचे ज्येष्ठ दिग्दर्शक डॅन उलमन यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याने त्यांचे निवडक चित्रपट, चर्चासत्रे आणि कार्यशाळा, मान्यवरांचे ‘मास्टर क्लास’, स्टारमंडळींशी संवाद अशा अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा अंतर्भाव केलेला पाहून चित्रपटरसिक खूश झाले नसते तर नवलच.

  यावर्षी ‘इफ्फी’मध्ये भारतासह तीस देशांनी आपले चित्रपट सादर केले. त्यातले एखाद-दोन अपवाद सोडता, सगळेच चित्रपट विलक्षण गुंतवून टाकणारे, धक्के देत विचार करायला लावणारे होते. ‘थ्री फेसेस'(इराण, पर्शियन, अझेरी), ‘द गिल्टी’ (डेन्मार्क, डॅनिश), ‘द ट्रान्सलेटर’ (क्यूबा-कॅनडा, स्पॅनिश, रशियन), ‘द अनसीन’ (अर्जेंटिना, स्पॅनिश), ‘शॉपलिफ्टर्स' (जपान, जॅपनीज), ‘योमेडीन’ (इजिप्त - ऑस्ट्रिया - यूएसए, अरेबिक), ‘मग' (पोलन्ड, पोलिश) ही त्यातल्या काही निवडक चित्रपटांची नावे. स्थळ, काळ, भवताल बदलला तरी माणसे सगळीकडे सारखीच असतात, हे वास्वत अधोरेखित करणारे हे चित्रपट. ते सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जिण्याचे चित्रण करतात म्हणून इथे कथेचा गाभा आणि अवकाशाला पोषक अशी लोकेशन्स आहेत,प्रसंगी ती अंगावर येण्याइतकी रौद्र-भीषणही आहेत, पण देखणे सेट्स, संगीत-नृत्याची लयलूट, उंची रंगभूषा, प्रकाशयोजनेचे खेळ नाहीत, स्पेशल इफेक्ट्स आणि तंत्रज्ञानाचा वापर जाणवू न देण्याइतपतच आहे आणि अभिनेते त्या पर्यावरणातच श्वास घेणारी माणसे असावीत, इतक्या नैसर्गिकपणे आपली भूमिका जिवंत करून टाकणारे आहेत. नजरेला दिपवून टाकणारे असे इथे काहीच नाही, तरीही यातला प्रत्येक चित्रपट काही तरी विशेष सांगू पाहतो आहे. त्याचे ताणेबाणे कालखंड, भौगोलिक सीमारेषा, धर्म-वंश-संस्कृतीचे अडसर बाजूला एखादे वैश्विक सत्य सांगू इच्छितात, त्याचा शोध प्रत्येक प्रेक्षकाने आपापल्या परीने घ्यावा अशी अपेक्षा तिथे असते. कहाणीच्या माध्यमातून सामान्यातले असामान्यत्व अधोरेखित करत प्रेक्षकांची जीवनविषयक जाण समृद्ध करणारे हे चित्रपट आहेत.

  स्वतःच्या देश-संस्कृतीवर विलक्षण प्रेम असणाऱ्या, आपल्या माणसांच्या दुःख-दैन्य-वेदनेच्या कहाण्या सांगू पाहणाऱ्या दिग्दर्शकांची एक मोठी फळी इराणमध्ये जन्माला आली. या सर्वच दिग्दर्शकांची गळचेपी करण्यात आली, चित्रपट काढणे काय, जगणे दुरापास्त झाले पण ही माणसे बंदिवासात राहूनही माणसाची स्वातंत्र्याची ओढ, मुक्तीचा मार्ग शोधण्याची धडपड दर्शवणाऱ्या सरस कलाकृती निर्माण करून जगासमोर पोचवत गेली. जाफर पनाहीचा ‘थ्री फेसेस' ही त्याच जातकुळीचा आहे. खरे तर बेहनाज (खरीखुरी अभिनेत्री बेहनाज जाफरी) आणि पनाही (खराखुरा पनाही) हे कुणीच नसतात मारझियेचे,(हीपण खऱ्या आयुष्यातली मारझिये रिझेल) पण एका कलाकाराची स्वातंत्र्याची भूक, त्यासाठी जीव गेला, तरी बेहत्तर म्हणण्याच्या वृत्तीशी त्यांचे नाते जुळते आणि ते त्या तद्दन अनोळखी मुलीचा शोध घ्यायला निघतात. एवढीशी कहाणी या चित्रपटात उलगडते. मारझियेच्या गावी घराघरांत बेहनाजच्या मालिका बघितले जात आहेत म्हणून तिचे आणि पनाहीचे स्वागत होते. पण ते सगळे त्यांच्या पारंपरिक आतिथ्य-संस्कृतीचा औपचारिक भाग म्हणून येते, माणुसकीच्या भावनेतून नाही. या गावाने शेरज़ाद या एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला गावापासून वाळीत टाकले आहे. पनाही या दुटप्पीपणाचे स्तर अक्षरशः सोलून काढत जातो. धर्ममान्य पितृसत्ताक संस्कृतीच्या हातात समाजाची सूत्रे गेल्यानंतर ती बुरसटलेली माणसे जे ठरवतील, तेच नियम बायका, शाळकरी मुले एवढेच काय गावातल्या गाई-बैलांना सुद्धा लागू होणार असतात. भूतकाळाने गाडून टाकलेली शेरजाद, सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली बेहनाज आणि अभिनेत्री बनण्याचे स्वप्न बघणारी मारझिये यांची भूत-वर्तमान-भविष्याचे ताणेबाणे विणणारी ही कहाणी, जग बदलले पण इराणी समाजातला राजकीय-सांस्कृतिक-धार्मिक स्तरात अजूनही बळकट असलेला दांभिकपणा उघडकीला आणत रिपोर्ताजसारखी उलगडत जाते. चित्रपटाच्या शेवटी, मारझिये गाव सोडून बेहनाजबरोबर निघते, तेव्हा त्या वळणावळणाच्या रस्त्यावर पनाही दिसत नाही, पण आता बेहनाज - मारझिये - पनाही हे एक नवे कुटुंब जन्माला आले आहे, त्यांची कहाणी पुढे प्रवाहित होणार असते. कुटुंब केवळ रक्ताच्या नात्यांनी बनलेल्या माणसांचे नसते, तर त्या पलीकडे जात ते माणुसकीच्या भावनेतून, सहकंप आणि सहवेदनेच्या जाणिवेतून एकत्र येणाऱ्या माणसांचेही असू शकते.

  जागतिक पातळीवरील सत्ताधाऱ्यांचे डावपेच लक्षात घेता पुढच्या कालखंडात युद्ध, यादवी, वांशिक हल्ले, रोगांच्या साथी, अणुबॉम्ब, जैविक शस्त्रे, सायबर हल्ले आणि त्सुनामीसारख्या

  अनेक नैसर्गिक संकटांना मानवजात सामोरी जाणार आहे. माणसाचे माणूसपण हिसकावून घेतले जाऊन तो पराकोटीचा एकाकी आणि हतबल होत जाणार आहे, कदाचित माणूस माणूस उरणारच नाही, मग भविष्यकाळाबद्दल कोणती आशा बाळगावी? अशा वेळी अशी देश-भाषा-संस्कृतीच्या अडसरांवर मात करून एकत्र येऊ पाहणाऱ्या माणसांची कुटुंबे ‘द अदर फॅमिली' अस्तित्वात येतील, यावीत. त्यांनीच मानवजातीचे, नव्या संस्कृतीचे चित्र रेखाटावे असा आशावाद अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. विशेष म्हणजे ‘द अदर फॅमिली' ही संकल्पना इतर देशातल्या ‘द गिल्टी’, ‘द ट्रान्सलेटर’, ‘द अनसीन’ अशा चित्रपटांतूनही दृश्य-अदृश्य स्वरूपात आकारताना दिसते. त्यातला ‘अ ट्रान्सलेटर' (क्यूबा-कॅनडा, स्पॅनिश-रशियन) हा एक विलक्षण चित्रपट. हवाना युनिव्हर्सिटीत रशियन शिकवणाऱ्या मालिनला हॉस्पिटलमध्ये दुभाषा म्हणून जाण्याची ऑर्डर मिळते. मालिन फिडेलच्या हुकूमशाहीपुढे झुकत हॉस्पिटलमध्ये रुजू होतो आणि तिथली परिस्थिती बघून हादरतो. चेर्नोबिलच्या अणुस्फोटाचे भीषण परिणाम भोगणाऱ्या कोवळ्या मुलांसाठी क्यूबामध्ये औषधोपचार सुरु असतात आणि त्यांना तिथे पाठवून सोव्हिएत युनियनने त्यांच्यावर काट मारलेली असते. अतिशय आशावादी, कृतीशील नर्स ग्लॅडिस आणि संवेदनशील, निराशेकडे झुकणारा मालिन अशा दोन वेगळ्या संस्कृतीतल्या, एकमेकांना छेद देणाऱ्या व्यक्तिरेखा इथे उभ्या राहतात. फटफटीत हिरवा रंग मारलेल्या हॉस्पिटलच्या तुरुंगात मालिन, ग्लॅडिस, कीमो-रेडिएशन घेणारी कोवळी मुले आणि त्याचे निराश पालक यांचेच एक कुटुंब जन्माला येत जाते. मालिन हळूहळू त्या मुलांमध्ये गुंतत जातो. बाहेरचे जगही बदलत असते. सोव्हिएट युनियनचे विघटन होऊन अर्थव्यवस्था कोसळते. मालिन अंतर्बाह्य खचत जातो, पण तो स्वतःला थांबवत नाही, तो पुनःपुन्हा हॉस्पिटलमध्ये जात, त्या मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलवत, त्यांचे मनोधैर्य राखून सुरक्षिततेची जाणीव देणारा पालक बनतो. हुकूमशाही व्यवस्थेत एका माणसाचे अवमूल्यन होत त्याचे व्यक्तिमत्व आणि जग कणाकणाने दुभंगत जाते, तो प्रवास मांडण्यात रॉड्रिगो आणि बेस्तियन रिउसो हे दिग्दर्शक बंधू यशस्वी ठरले आहेत. हा नायक कुठेही सुपर-हीरो होत नाही, तो एक माणूस, एक बापच राहतो. या चित्रपटाचे खरे नायक असलेल्या प्राध्यापक मॅन्युअल रिउसो अँडिनो यांच्या जीवन-कहाणीवर त्यांच्या मुलांनी हा चित्रपट निर्माण केला. त्यापैकी ‘इफ्फी’ला उपस्थित बेस्तियन हा सिनेमा संपल्यावर प्रेक्षकांना सामोरा आला, तेव्हा एकच शब्द मनात उमटला-सॅल्यूट!

  ‘यॉमेडाईन’मधला बिशे हा तर कुष्ठरोगी. रोगाने पछाडलेल्या या मुलाला त्याच्या लहानपणी वडिलांनी या वस्तीत सोडत काढता पाय घेतलेला असतो. आता तो बरा झाला तरी त्याचे रूप विद्रूपच आहे. पुढे-मागे कुठलेही लागेबांधे नसणाऱ्या बिशेला एक हाक ऐकू येते आणि तो आपल्या कुटुंबाचा शोध घ्यायचे ठरवतो आणि निघतो. यामध्ये त्याच्याबरोबर निघतो अनाथाश्रमातून पळून आलेला नुबीयन ओबामा. बिशे, ओबामा आणि त्यांचे गाढव ‘हार्बि' हे जगावेगळे कुटुंब प्रवासाला निघते. ट्रेनमधले सुशिक्षित लोक त्याला कुष्ठरोगी समजून झिडकारतात तर रस्त्यावरचे अपंग, भिकारी त्यांना आधार देतात असे परस्परविरोधी अनुभव घेत, या प्रवासात बाप-लेकांचे अजब नाते फुलत जाते.चित्रपटाचा शेवट सुखांत असला तरी ते दोघे शेवटी कोणता निर्णय घेतात? काय होते या कुटुंबाचे? या चित्रपटात बिशेची भूमिका करणारा रादी गमाल हा स्वतः कैरोजवळच्या लेपर्स कॉलनीत राहणारा कुष्ठरोगीच, हा त्याचा खरा चेहरा आहे, हे समजते तेव्हा धक्का बसतो. दिग्दर्शक अबू बकर शौकीने त्याची विरूपता आणि व्यंग कुठेही लपवलेले नाही, इजिप्तच्या झळझळीत सूर्यप्रकाशात चित्रिकरण करत ते अधिक उघड केले आहे. त्याचमुळे चित्रपट संपतो तेव्हा मन घृणेने नव्हे, आदर, कौतुक आणि अभिमानाच्या छटांनी भरून येते आणि प्रेक्षकही होऊन जातो, त्याची ‘अदर फॅमिली'. या सगळ्या दिग्दर्शकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो मग शेवटी काय उरते, व्हॉट इज द ट्रुथ ओ डिरेक्टर? तू कोणता शोध घेऊ पाहत होतास या कलाकृतीतून? प्रत्येक सच्चा कलाकार आत्मशोधाची वाट शोधत असतो. मी, ‘स्व' म्हणजे मी - माझा समाज - देश - भवताल, यात स्वतःला शोधण्याची त्याची प्रक्रिया सतत सुरु असते. कधी त्याचे अनुभव संदिग्ध असतात, ते मनाच्या तळाशी दडून बसलेले असतात, ते नेहमीच विशुद्ध रूपात शेअर करता येत नाहीत, पण ते मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक अस्सल कलाकृतीमागे असतो, असावाच लागतो. त्यासाठी दिग्दर्शक वेगवेगळ्या अवकाशांचा शोध घेतो, अंधार-प्रकाशाशी खेळतो, काळाची मोडतोड करतो. थोडक्यात, तो अवकाश आणि काळाशी खेळत त्यातून त्याची भूमिका, त्याचे तत्वज्ञान तो मांडत जातो. एकदा हे लक्षात आले की, मग या प्रत्येक चित्रपटाच्या पलीकडचा प्रचंड मोठा अवकाश, त्याचा आवाका दिसू लागतो. उमगते, की हे केवळ चित्रपट नाहीत, तर त्यातून जे दृश्य होत आहे ते सगळे ओलांडून जीवनभाष्य करण्याचा, आधुनिक जगातल्या माणसाला नवी दृष्टी देण्याचा हा अतिशय वेगळा प्रयोग आहे, आणि यंदाच्या इफ्फीत झळकलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून या सगळ्या दिग्दर्शकांनी तो प्रयोग साधला आहे.

  लेखिकेचा संपर्क : ९८२११४८८१०

Trending