आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : मनसे 'स्पेस' भरून काढेल का?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिजित वाटेगावकर

मुंबई महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी म्हणजेच राज ठाकरे यांच्यासाठी 'माझ्या राजाला साथ द्या', हे निवडणूक गीत तयार केले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या गाण्याचे लाँचिगही करण्यात आले होते. या निवडणुकीत मुंबईच्या जनतेने मनसेचे सात नगरसेवक निवडून दिले. त्यानंतर या गाण्याची चांगलीच चर्चा झाली. काही दिवसांनंतर सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेने पळवले. मनसेकडे सध्या एकच नगरसेवक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या सातपैकी एक दिलीप लांडे आमदार झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाला 'सक्षम विरोधी पक्ष बनवा', अशी साद मतदारांपुढे घातली. मात्र, राज यांचे हे आवाहनही मतदारांना पसंत पडले नाही. मनसेने राज्यात जवळपास शंभर जागा लढवल्या. मात्र, केवळ कल्याण ग्रामीण येथून राजू पाटील हे एकमेव आमदार निवडून आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उडत असलेल्या खटक्यांमुळे राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. पहिल्या सभेत राज यांनी 'माझा शेतकरी मला जीन्स टी-शर्ट घालून ट्रॅक्टरवर बसलेला पाहायचाय, माझ्या हातात सत्ता द्या, सुतासारखा महाराष्ट्र सरळ करून दाखवतो', यांसारखी अनेक प्रभावी वक्तव्ये करून जनतेवर प्रभाव पाडला. 'बदल हा निसर्गाचा नियम आहे', या उक्तीनुसार मतदारांनीही मनसेला विधानसभा निवडणुकीत एका फटक्यात १३ आमदार निवडून दिले. त्यानंतर नाशिक महापालिकेची सत्ताही दिली. पुणे-मुंबई या महापालिकेतही चांगल्या संख्येने नगरसेवक निवडून दिले. मात्र, त्यानंतर राज ठाकरे म्हणतात की, 'आमचा राजा गाफील राहिला आणि शत्रूने हल्ला केला'. त्यामुळे त्यांच्या पक्षाला अोहोटी लागली. एक- एक शिलेदार त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात गेला, याची कारणमीमांसा राज यांनी केली असेलच. एका भूमिकेवर ठाम असलेल्या नेत्यावर जनतेचा अधिक विश्वास असतो, हाच विश्वास मनसेने गमावला का? याचा शोध घ्यावा लागेल. मनसेने मराठीचा मुद्दा त्यावेळी एवढा प्रभावीपणे मांडला की मुंबईच्या अनेक भागांमध्ये मराठी पाट्या जागोजागी लागल्या. बॉलिवूडमध्येही मनसेच्या दणक्यामुळेच मराठीचा भाव वाढला. मात्र, त्यानंतर मनसेने हा मुद्दाही हळूहळू बाजूला सारला. उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलनाने मनसे रातोरात देशभरात पोचली. त्यानंतर राज यांनी नरेंद्र मोदी यांची बाजू घेतली. याचाच परिणाम किंवा आणखी काही म्हणून की काय, राज्यात भाजपने पाळेमुळे रोवली. तो राज्यात सत्तेवर आला. त्यानंतर आपला पक्ष संपतो की काय, या भावनेने राज यांनी पुन्हा भाजपविरोधात राष्ट्रवादीच्या साथीने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि इतरांवर टीकास्त्र सोडले. जनतेला राज यांचे धरसोडीचे राजकारण आवडले नसावे. विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला असला, तरी शिवसेनेच्या भूमिकेमुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी प्रचाराचा ना काँग्रेसला फायदा झाला ना राष्ट्रवादीला. आता राष्ट्रवादी महाविकास आघाडीत आहे. त्यामुळे मनसेला स्वत:ची 'स्पेस' निर्माण करावी लागणार आहे.

केवळ आपला मुख्यमंत्री व्हावा यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना हिंदुत्व, मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करत आहे. मात्र, असे सरकार स्थापन करून शिवसेनेने स्वतःची अडचण करून घेतली का, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. शिवसेना हा धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणता येईल कारण या पक्षात सर्व जाती-धर्मांचे आमदार आहेत. मात्र, शिवसेनेने हिंदुत्व हा मुद्दा बाजूला सारल्याचे हेरून राज ठाकरे आता पुन्हा नवी भूमिका घेण्याची शक्यता आहे.

आज २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मनसेचा मेळावा मुंबईत होत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेण्याची तसेच, आपल्या तिरंगी झेंड्यात बदल करून जनतेपुढे येण्याची शक्यता आहे. मात्र, राज ठाकरे यांची अशी सतत बदलत राहणारी भूमिका जनतेला आवडेल का? हे येणारा काळच ठरवेल.

एका भूमिकेवर ठाम असलेल्या नेत्यावर जनतेचा विश्वास असतो. असा विश्वास राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिळवणार का, हे पाहावे लागेल. मुंबईतील आजचा मेळावा त्यादृष्टीने महत्त्वाचा असेल...

अभिजित वाटेगावकर
abhijit.w@dbcorp.in

 

बातम्या आणखी आहेत...