Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Religion politics by Pakistan to hide unemployment

बेरोजगारी लपवण्यासाठीच पाककडून धर्माचे राजकारण; सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ. बक्षी यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी | Update - Sep 12, 2018, 10:47 AM IST

पाकिस्तानची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, दारिद्रय आणि बेरोजगारी लपवण्यासाठी जम्मू काश्मीरच्या निमित्ताने पाकिस्तानकडून धर

 • Religion politics by Pakistan to hide unemployment

  जळगाव- पाकिस्तानची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, दारिद्रय आणि बेरोजगारी लपवण्यासाठी जम्मू काश्मीरच्या निमित्ताने पाकिस्तानकडून धर्माचे राजकारण जिवंत ठेवले जात आहे. अशा वेळी भारतीयांनी एकसंघ होऊन राष्ट्रवादाची भावना वाढीला लावावी, असे मत सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ.जी.डी. बक्षी यांनी व्यक्त केले.


  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेतंर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद अभ्यास व संशोधन केंद्राच्या वतीने मंगळवारी निवृत्त मे.जनरल डॉ.जी.डी.बक्षी यांचे `भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने, विशेष संदर्भ 'सीमेपलीकडील दहशतवाद' या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी ते बोलत होते. कुलसचिव भ.भा. पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ.बक्षी म्हणाले की, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काश्मीर देखील भारतात विलीन झाला होता. मात्र, काश्मीरला विशेष दर्जा दिला गेला. त्यामुळे काश्मीर समस्या अधिक बिकट होत गेली. भारतीय सैन्याने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र रणांगणात जिंकूनही राजकीय तहात मात्र आपण पराभूत झालो. या प्रश्नावर सार्वमत घ्यायला भारताची तयारी आहे; परंतु पाकिस्तानची तयारी नाही.


  अलीकडच्या काळात सैन्यावर दगडांचा मारा करण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. कारण पाकिस्तान रणांगणातील युद्ध लढू शकत नाही. अशा वेळी काश्मीरमधील मानवी हक्कांवर गदा येत असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्र निर्माण केले जात आहे. हा प्रश्न सुटू शकत नाही याची पाकिस्तानलादेखील कल्पना आहे. मात्र, तो सुटू नये हीच त्या देशाची इच्छा आहे. कारण त्यातून निधी उभा राहतो आणि शस्त्र घेता येतात.


  केंद्राचे विभागप्रमुख प्रा. आर. बी. गोरे यांनी प्रास्ताविक केले. विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.अनिल डोंगरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यापीठ परिसरातील विविध विभागातील प्राध्यापकांसह विद्यापीठाच्या कॅम्पसमधील विद्यार्थ्यांची देखील माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती.


  जम्मू-काश्मीरमधील कुणालाही स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती नको आहे. केवळ काश्मीरमधील सहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी स्वतंत्रतेची मागणी केली जात आहे. पण ते शक्य नाही, असे सांगून डॉ.बक्षी यांनी भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न उधळून लावण्याचे आवाहन करताना जातीयवाद आणि प्रादेशिकवाद याच्या आहारी न जाता राष्ट्रवादाची भावना वाढवा, असे तरुणांना आवाहन केले.

Trending