आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूसतळणीचा ‘काकडा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती जिल्ह्यातील कापूसतळणी हे माझे सासर. सासू-सासरे कापूसतळणीला असताना बहुतांश वेळी दिवाळी तिथेच साजरी होत असे. आम्ही तेव्हा नागपूरला राहत होतो. नागपूर येथून दिवाळीला घरी यायचो. दीर, जावा, नणंदा त्यांची मुले असे सगळे नातेवाईक तिथे एकत्र येत असल्यामुळे आनंद द्विगुणित होत असे. तेथील आमचे घर म्हणजे मोठा वाडाच होता. काही दिवस तिथे राहिले की आमच्या स्नेहसंबंधातील लोकांचे तसेच आमच्या कुटुंबाशी जवळीक असणाºयांकडून आम्हाला आमंत्रणे यायची. घरे आत्मीयतेने जोडलेली होती. आजही महाजनांपैकी कोणी तिथे गेले तर या सगळ्यांना कमालीचा आनंद होतो. दिवाळी दरम्यानच विठ्ठल मंदिरामध्ये कार्तिकी उत्सवाला सुरुवात झालेली असे. राम मंदिरात पहाटे उठून काकडा आरती होत असे. पहाटे लवकर उठून सासूबाई, मुली तसेच सणानिमित्त जमलेले आप्तगण देखील काकडा आरतीत सहभागी होत असत.‘काकडा आरती’ हा कार्यक्रम आता लुप्त होत चालला आहे. आजकालच्या मुलींना हा प्रकार गावंढळपणाचा वाटतो. कमालीची थंडी असली तरी पूजा-अर्चेसाठी जाताना आनंद वाटायचा. कापूसतळणी लहान गाव असले तरी तो काळ आपुलकी, स्नेहाने भरलेला होता. आजच्याइतकी वागण्याबोलण्यात तांत्रिकता जाणवत नव्हती. सकाळी उठून सडासंमार्जन झाले की पूजाअर्चेत वेळ जायचा. विठ्ठल मंदिरात भजन, कीर्तन होत असे. सकाळपासून कार्यक्रम सुरू होत. त्यातही काही वेळ जायचा. बाहेरून कीर्तनकार यायचे, परंतु घरातही भक्तिमय वातावरण असल्याने तेही त्यात सहभागी होत. मूर्तिजापूरहून शकुंतला रेल्वेने कापूसतळणीला जावे लागे. शकुंतलेचा प्रवासदेखील आनंददायी वाटायचा. ती गाडी आपल्या गतीने चाले. एकेका स्थानकावर थांबत थांबत जात असल्याने प्रवासाचा आनंद मिळत असे. ते दिवस आता आठवणीत जमा झाले आहेत.