शपथविधी / अल्ला, जिजाई, रमाईंचे स्मरण! राज्यपाल यांच्या तंबीनंतरही मंत्र्यांनी हट्ट पूर्ण करून घेतलाच

आमदार वर्षा गायकवाड यांना राज्यपालांनी रोखले
 

प्रतिनिधी

Dec 31,2019 11:19:31 AM IST

मुंबई - ठाकरे सरकारातील मंत्र्यांनी सोमवारी शपथविधीत वंदनीय असलेल्या व्यक्तीची नावे घेऊन वेगळेपण दाखवून दिले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तंबी देऊनही काही मंत्र्यांनी राज्यघटनेनुसार लिहिलेल्या शपथेव्यतिरिक्त इतर नावाचा उच्चार केला. मंत्र्यांना एक पदाची आणि दुसरी गोपनीयता अशा दोन शपथा घ्यायच्या असतात.त्याच्या आगेमागे मंत्रिगण आपल्या वंदनीय नेत्यांची किंवा अस्मिता दाखवणाऱ्या काही शब्दांचे उच्चार करत असतात. त्यातील अनेक जण ईश्वरसाक्ष शपथ न घेता गांभीर्यपूर्वक शपथ घेत असतात. साेमवारच्या शपथविधीत त्याचा प्रत्यय आला. बहुतेकांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली, मात्र जितेंद्र आव्हाड, के.सी. पाडवी, शंकरराव गडाख, अस्लम शेख यांनी ‘गांभीर्यपूर्वक’ शपथ घेतली. नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार या मंत्र्यांनी अल्लासाक्ष शपथ घेतली, तर बच्चू कडू यांनी तिरंगासाक्ष शपथ घेतली.


संजय बनसोडे व वर्षा गायकवाड हे ‘जय भीम’ म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांनी ‘जय जिजाऊ, जय सावित्री, जय रमाई’ असा उच्चार केला. कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांनी शपथविधीनंतर ‘जय सीमाभाग’ अशी हाक दिली. बच्चू कडू यांनी ‘जय जवान, जय किसान’ म्हणत समाराेप केला. विश्वजित कदम यांनी ‘जय हिंद’ म्हटले. अादित्य ठाकरेंसह बहुतेक मंत्र्यांनी वडिलांसह आईचाही नामोल्लेख केला. अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांनी ठाकूर-सोनवणे असा माहेर-सासरचा नामोल्लेख केला.

आमदार वर्षा गायकवाड यांना राज्यपालांनी रोखले


धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड शपथविधीला आल्या तेव्हा त्यांनी शपथविधीपूर्वी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उच्चारून वंदन करण्याचा प्रयत्न केला. त्याला राज्यपाल कोश्यारी यांनी आक्षेप घेतला. ‘आगे पिछे कुछ नही बोलनेका’ असे ते गायकवाड यांना म्हणाले. तरी शेवटी गायकवाड या ‘जय भीम’ म्हणाल्याच.

X
COMMENT