आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर धडा शिकवलाच

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृहिणी असो नोकरदार महिला किंवा महाविद्यालयीन तरुणी. प्रत्येकीला कुठल्या ना कुठल्या कारणाने घराबाहेर पडावेच लागते, समाजात मिसळावे लागते. अशा वेळी त्यांना अनेक समस्या भेडसावतात. नकोसे स्पर्श आणि नजरांना सामोरे जावे लागते. या गोष्टी त्या महिला ना टाळू शकतात ना त्याबद्दल तक्रार करून आरोपीला शिक्षा करण्याची हिंमत दाखवू शकतात. कधी कधी तर घराच्या चार भिंतींच्या आतच अन्याय करणारा दडलेला असतो. अशा वेळी कोंडी फोडून न्याय मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक असतं. मदत मागितली तर मिळते, पण त्यासाठी कुठे जावं, कोणाकडे तक्रार करावी, आदि माहिती देणारं हे नवं सदर.

 

प्रेमाच्या नावाखाली मुलींना फसवून त्यांच्यावर लैंगिक छेडछाडीच्या, बलात्काराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याला डेट रेप Date rape असं म्हणतात. औरंगाबादच्या एका महाविद्यालयात मुलींसमोर या विषयावर बोलण्यासाठी मला निमंत्रित केले होते. मोबाइल, सोशल मीडिया आणि सायबर क्राइमविषयी बोलताना सुरुवातीला मुलींकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र विषय जसजसा पुढे जात होता तस तसे मुलींच्या चेहऱ्यावरील भाव बदलताना दिसू लागले. मुलींनी आपला फारसा प्रतिसाद नोंदवला नाही पण माहिती लक्षपूर्वक ऐकत होत्या. माझे भाषण संपले. शेवटची पंधरा मिनिटे प्रश्न विचारण्यासाठी ठेवली होती, परंतु मुलींनी प्रश्न, शंका विचारल्या नाहीत. माझ्या ऑफिसचा पत्ता आणि माझा फोन नंबर मात्र मी त्यांना दिला. तिथून ऑफिसला जाऊन बसत नाही की, फोन वाजला. एक मुलगी बोलत होती, आता तुम्ही आमच्या कॉलेजला आल्या होत्या. मला तुम्हाला भेटायचंय, आम्ही लगेचच येतो. मुलींना काही अडचण असेल, हा विचार करून मी हो म्हणाले. काही वेळेतच मुली ऑफिसला पोहचल्या.

 

निशा आणि मेघा एकाच वर्गात शिकत होत्या. निशाने प्रश्न विचारायला सुरुवात केली - सायबर क्राइममध्ये तक्रार केली तर मुलीचे नाव पेपरला येते का? घरी पोलिस येतात का? मुलींना वारंवार पोलिस स्टेशनला बोलावले जाते का? मी म्हटलं, कोणत्याही पीडित मुलीचं नाव कधीही वृत्तपत्रात, टीव्हीवर प्रसिद्ध केलं जात नाही. घरी पोलिस येतात तेव्हा घडलेल्या घटनेविषयी जास्तीत जास्त माहिती घेतात, जेणेकरून तपासकामात त्या महितीचा उपयोग होईल. अगदी छोट्या छोट्या बाबी तपासकामात खूप महत्त्वपूर्ण असतात त्यामुळे गुन्हेगाराला शोधायला मदत मिळते. विनाकारण पोलिस पीडित व्यक्तीला पोलिस स्टेशनला बोलावत नाहीत, असे समजावून सांगितले. निशा आणि मेघा आमच्या संस्थेत आपले मन निर्धास्त मोकळे करू शकतात, याची शाश्वती दिली आणि हे त्यांच्या चेहऱ्यावरील बदलत्या हावभावावरून स्पष्ट होत होते. 

 

निशामध्ये स्वत:बद्दल मनमोकळेपणाने बोलण्याचा विश्वास जाणवत होता. निशाने बोलायला सुरुवात केली. “काही दिवसापासून माझ्या मोबाइलवर मला अतिशय घाणेरडे कॉल्स व मेसेज येत आहेत. कधी कधी तर व्हिडियो पण येतात. कॉल्स कोणत्याही वेळी येतात. यामुळे मी खूप त्रस्त झाले आहे. म्हणून मी माझा नंबर बदलला. नंबर बदलतानाही  अडचणी आल्याच. आई म्हणाली, तुम्ही आजकालची मुलं सारखे नंबर बदलता. मला नवीन नंबर लवकर लक्षात राहात नाही. बाबांनी तर मी पैसे वाया घालते म्हणून रागावले. हे सगळे प्रकार माझ्या बाबतीत घडतात हे मी त्यांना सांगू शकत नाही. आई तर हे ऐकून प्रचंड घाबरेल आणि बाबा तर माझा मोबाईल वापरणं बंद करतील. मी कॉलेजला पहिलं पाऊल टाकलं तेव्हाच माझं करिअर ठरवलं होतं. मी फक्त त्यावर लक्ष केंद्रित करून कॉलेज करतेय. चारपाच महिन्यांपासून सुरू झालेल्या या त्रासामुळे मी बाथरूममध्येसुद्धा फोन घेऊन जाते. घरी अन्य कोणी माझा फोन घेऊ नये म्हणून,’ असे बोलून निशा रडू लागली. 

 

यातून मार्ग निघू शकतो. त्यासाठी तुला धैर्याने तुझ्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल आवाज उठवावा लागेल.यातून तुला बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळी मदत करू. यासाठी तू अगोदर तुझ्या आईबाबांशी बोल. जे घडतंय ते सगळं त्यांना सांग. ते तुला नक्की समजून घेतील, असं सांगितलं. निशा ऑफिसमधून बाहेर पडली. मेघानेही तिला आपण काकाकाकूंना सगळं सांगू, मीही तुझ्यासोबत येते, असा धीर दिला. मैत्रिणीकडून मिळालेल्या आधारामुळे निशा अजून खंबीर झाली आणि तू तुझ्या घरी जा, माझ्या आई बाबांशी मी नक्की बोलेन, म्हणाली.

 

निशा घरी पोहचली. बाबा ऑफिसमधून येण्याची वाट पाहत होती. निशाची घाई पाहून आईला वाटलं नक्की बाबांकडून नवीन ड्रेस किंवा काही वस्तू पाहिजे असेल म्हणून वाट पाहतेय. निशा म्हणाली, नाही गं नवीन ड्रेस नाही बाबाच हवे आणि तूही. मुलीचे असे बोलणे ऐकून आई काळजीने व्याकूळ झाली. निशाला प्रश्न विचारू लागली. आईला समजावत निशा म्हणाली, मला जे बोलायचं ते मी तुमच्याशी बोलू शकले नाही तर जगात कोणासमोरही माझे म्हणणे मी मांडू शकणार नाही. तू बाबा येईपर्यंत वाट पाहा. काही वेळातच बाबा आले. आई म्हणाली, अहो, लेकीला काही बोलायचंय. काय गं, काही असं तसं केलं नाहीस ना, असं ते म्हणाल्यावर निशा रडू लागली. मग दोघांनी तिला जवळ घेतलं आणि शांत करत काय झालं ते विचारलं. निशाने तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सगळी माहिती सांगितली. हे ऐकून आईबाबा काळजीत बुडाले. काय करावं सुचेना झालं. निशाने ती आमच्या संस्थेत कशी आली हे सांगितलं. आईबाबा काळजीने पुन्हा ओरडले, अग एकटीने त्रास सहन केलास हे पुरेसं नाही का? एकटी कशाला गेली होतीस. उद्या आपण सगळे जाऊ. तू काळजी करू नकोस, आता हा त्रास सहन करायचा नाही. आईबाबांच्या आधारामुळे निशाला स्वत:च्या मनावरील बरचसा ताण हलका झाल्याचे जाणवत होते. 

 

दुसऱ्या दिवशी सकाळी निशा आईबाबांना घेऊन ऑफिसला आली. आईवडील सोबत असल्यामुळे कालच्यापेक्षा आज मनमोकळी बोलत होती. निशासोबत घडत असणाऱ्या घटना या सायबर गुन्ह्याच्या आहेत हे त्यांना समजावून सांगितलं. निशाला त्रास देणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी आपल्याला पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाची मदत घ्यावी लागेल हे सांगितले. यावर जड अंत:करणाने त्यांनी होकार दिला. मुलीविषयीची काळजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तिथून आम्ही सायबर क्राइम कक्षाकडे पोहचलो. पोलिस अधिकाऱ्यांनी निशाकडून तिच्या फोनवर येणारे कॉल्स, मेसेज, व्हिडिओ, आणि इंटरनेटवरील अकाउंटची माहिती घेतली आणि तपासाला सुरुवात केली. 

 

पोलिसांनी काही दिवसांतच निशाला ज्या फोन नंबरवरून त्रास दिला जात होता त्या व्यक्तीला शोधून काढलं. त्या व्यक्तीला ओळखण्यासाठी निशाला पोलिस स्टेशनला बोलवण्यात आले. निशा पोचली तेव्हा त्या व्यक्तीला पाहून थक्क झाली. कारण ती व्यक्ती तिच्याच वर्गात शिकणारा प्रदीप होता. त्याला ओळखल्यानंतर पोलिसांनी निशाला काही प्रश्न विचारले जसे की – त्याची तिची मैत्री होती का? काही प्रेमप्रकरण वगैरे. मात्र निशाने त्याच्याशी कधी बोललेसुद्धा नाही असं सांगितलं. त्यानंतर प्रदीपची चौकशी सुरू झाली. सुरुवातीला तो काहीच बोलेना. अखेर त्याला तोंड उघडावं लागलं. त्याला ती कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून आवडायची. तिच्याशी बोलण्यासाठी तो दररोज तिचा पाठलाग करायचा. निशा त्याच्याकडे साधे पाहातही नाही म्हणून त्याचे मित्र त्याची टिंगल करत असत. त्यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला होता. आता कसेही करून निशाला पटवायचे हे त्याने ठरवले होते. प्रदीपने दुसरं सिमकार्ड खरेदी केलं. त्या नंबरचा वापर तो फक्त निशाला कॉल्स, मेसेज करण्यासाठी करत असे. फेसबुकवर त्याने तिचे बनावट अकाउंट काढून त्यावर तिचे अश्लील फोटो, मजकूर आणि फोन नंबर टाकला होता. तिची बदनामी झाली तर तिच्याशी कोणी बोलणार नाही मग मी तिच्याशी मैत्री करून तिला प्रपोज करेन, असे प्रदीपने ठरवले होते. हे ऐकून निशा आणि तिचे आईबाबा चिंताग्रस्त झाले. त्यांना धीर देत आम्ही पोलिस स्टेशनमधून बाहेर पडलो. 

 

पोलिसांनी प्रदीपवर माहिती व तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा , भारतीय दंड संहिता १८६० या कायद्याअंतर्गत पाठलाग करणे, आक्षेपार्ह फोटो, मजकूर इलेक्ट्राॅनिक माध्यमातून देवाणघेवाण करणे, बदनामी करणे, छुपा पाठलाग या अपराधासाठी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
(व्यक्तींची नावे काल्पनिक आहेत).

 

लेखिका औरंगाबादस्थित कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये कार्यरत आहेत. महिलाविषयक कायदे, गुन्हे, तक्रारी, त्यांच्यासाठीच्या विविध योजना यांच्या संदर्भात त्या राज्यभरात काम करतात.

बातम्या आणखी आहेत...