आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोरीची बाजू पडती?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजीत मीठ जास्त पडलं म्हणून सुनेला माहेरी पाठवून दिलं. आता तुम्ही म्हणाल, आता हे काय कारण झालं? असं कुठे घडत असतं का? वाचकहो, हे असं घडलंय. तेसुद्धा २०१६ सालात. या अशा अवघड प्रसंगातून हिमतीनं वाट काढून आपल्या मुलीला सन्मानानं न्याय मिळवून देणाऱ्या आईबद्दलचा लेखिकेनं घेतलेला अनुभव.  

 

जालना जिल्ह्यातील एका गावात महिलांची बैठक आयोजित केली होती. महिलांसोबत चर्चा करून पुढे काय करायचे यावर आम्ही सगळ्या बोलत होतो. तोच काही जणींची आपापसातली कुजबुज कानावर पडली. नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी रेखाला विचारलं. त्यावर रेखाने तिच्या गटातील संगीताने काल तिची मुलगी राधा सासरी पाठवताना  घडलेला प्रसंग सांगितला.


राधा एकुलती एक लाडात वाढलेली मुलगी. शिक्षणही जेमतेम झालं. आई-वडील मजुरी करणारे मात्र मुलीच्या संगोपनात, आवडीनिवडीत कधीही कमी पडू दिली नाही. राधा आता विवाहासाठी योग्य झाली आहे असं नातेवाईकांनी बोलायला सुरुवात केली. राधाच्या आईवडिलांनी हे बोलणं मनावर घेऊन आपल्या मुलीसाठी योग्य स्थळ मिळावे म्हणून वरसंशोधन सुरू केलं.


एक दिवस गावातील मोठ्या माणसांनी राधासाठी शेजारच्या गावात योग्य मुलगा आहे, तुम्ही स्थळ पाहून घ्या, असे सांगितले. राधाच्या वडिलांनी संमती दिली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या गावात मुलाला पाहण्यासाठी गेले. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हा मुलगा आपल्या मुलीसाठी योग्य आहे, आपण हा संबंध जुळवावा, असे राधाच्या वडिलांनी ठरवले. त्याप्रमाणे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला, वधुवरांनी एकमेकांना पसंत केले. दोघांच्या घरच्यांची गावातील मोठ्या माणसांसमोर बैठक झाली आणि विवाहाची तारीख निश्चित झाली.
मार्च महिन्यात राधाचे ठरल्याप्रमाणे विवाह संस्कार पार पडले. आईवडिलांनी मुलीची पाठवणी केली. लग्नानंतर मुलगी येती-जाती झाली. हळूहळू राधाच्या संसाराची घडी बसायला सुरुवात झाली. नवीन संसारात राधाही रुळत होती.


एक दिवस मात्र संसारात मिठाचा खडा पडला. म्हणजे असे झाले की, राधाने केलेली भाजी खारट झाली आणि पतिदेव रुसून बसला. रुसला तर रुसला, राधाला चार गोष्टी ऐकवल्या आणि तुझ्या आईने तुला साधी भाजी करायला शिकवलं नाही म्हणून घरातील अन्य लोकही बोलू लागले. राधा हिरमुसली झाली. चुकून भाजीत मीठ जास्त पडलं, मी दुसरी भाजी करते, असे म्हणाली. मात्र, नवऱ्याने रागात राधाला सरळ माहेरी जाण्याचा आदेश दिला. 


राधा रडत रडत माहेरी आली. आईवडिलांना सगळं सांगितलं. राधाच्या आईवडिलांना वाटले जावयाचा राग शांत झाल्यावर जावई घेऊन जाईल पोरीला. मात्र, आठवडा उलटला तरी जावयाचा काही निरोप नाही, सासरच्यांचा काही निरोप नाही, म्हणून मुलीच्या काळजीने आईवडील कासावीस झाले. मध्यस्थी माणसाकडे मदत मागितली. त्याप्रमाणे राधाच्या गावातील चार माणसं राधाच्या सासरी गेले, दोघांनाही समजावून सांगू लागले. यावर दोघेही तयार झाले, एकत्र नांदण्याचा निर्णय घेणार तोच मुलीचे सासरे म्हणाले, “आमची बेअब्रू झाली, असं कसं सुनेला घरात घ्यायचं!’ यावर सून म्हणाली, “मी मामंजींची माफी मागते! मग सासूबाईंचा आवाज आला, “कोणाच्या लेकीबाळीचा नास नाही करायचा, आम्ही बी पोरगी नांदायला घेऊन जाऊ, पण आमची एक अट आहे!’ राधाचे आईवडील चिंताग्रस्त झाले, तरी धीरानं आलेला प्रसंग निभावून नेऊ, अशी मनाची समजूत घातली आणि विहीणबाईला अट विचारली. विहीणबाई बोलू लागल्या, “तुमची पोरीची बाजू जरा पडती घ्यायला पाहिजे. आम्हीबी पोरीला ठेवून घेऊ, पण आधी पोरीच्या आईने आमच्या पायावर नाक रगडून माफी मागितली पाहिजे.” यावर राधाची आई उभी राहिली. गावातल्या मोठ्या माणसांसमोर बोलायची परवानगी मागितली आणि बोलू लागली. म्हणाली, “माझ्या विहीणबाईला त्रास झाला, माझ्या पोरीचा राग आला, भाजीत मीठ जास्त झालं, हे सगळं कबूल आहे. मी विहीणबाईची माफी बी मागील. पण आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. मला सांगावं की, माझ्या विहीणबाईने पोराला जन्म दिला म्हणून त्यांना कमी कळा आल्या आणि मी पोरीला जन्म दिला म्हणून मला जास्त कळा आल्या का? असं असेल तर मी माफी मागते.’ 


यावर बैठकीत शांतता पसरली. सर्व लोक चिडीचूप झाले, कोणाला काय बोलावं ते सुचेना. सगळे जण एकमेकांकडे पाहू लागले.


राधाची आई म्हणाली, पोरीची बाजू म्हणून पडतं घ्यायचं म्हणता. माझी पोरगी मला जड नाही. भाजीत मीठ कमी पडलं म्हणून घरातून काढून देणं, पोरीची आई आहे म्हणून नाक रगडून माफी मागणं, असा कसा कायदा तुमचा? मी माफी मागणार नाही, पुढे काय ते बोला. यावर गावातील मोठे लोक अवाक् होऊन पाहतच बसले. काय बोलावं ते कळेना कोणाला. एक जण उठून म्हणाला, पोरीला नांदायला घेऊन जा, कोणी बी कोणाची माफी मागणार नाही.


ही घटना २०१६मधली आहे. अशा अनेक छोट्या क्षुल्लक कारणावरून स्त्रियांना अनेक प्रकारच्या कौटुंबिक अत्याचाराला बळी पडावं लागतं. भाजीत मीठ कमी म्हणून घरातून हाकलून देणे, दिसायला काळी आहे म्हणून बाहेर काढणे, माझ्या आईच्या पाया पडली नाही म्हणून जाळून टाकणे अशा अनेक कारणांपायी स्त्रियांना जीवही गमावावा लागतो. राष्ट्रीय गुन्हे ब्युरोच्या अहवालाच्या २०१६च्या आकडेवारीनुसार स्त्रियांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. 


एका मजुरी करणाऱ्या अशिक्षित आईने केलेला सवाल आजही महिलांची परिस्थिती किती बिकट आहे हेच सांगतो आहे.

 

बातम्या आणखी आहेत...