आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’ची सायबर स्पेस

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रेणुका कड

ऑनलाइन ट्रोलिंगमुळे महिला आणि मुली मानसिकदृष्ट्या खचतात. एखाद्या स्त्रीने शेअर केलेला फोटो, व्हिडिओ किंवा तिचे मत कोणाला पटले नाही, तर अतिशय वाईट शब्दांत तिला ट्रोल केले जाते. किंबहुना ट्रोलिंगची भाषा, केली जाणारी शेरेबाजी ही व्यक्तिगत जीवनाची मानहानी करणारी असते.
इंटरनेट आणि सोशल मीडियाची व्यापकता प्रचंड मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढतच आहे. सोशल मीडिया ‘लोकल ते ग्लोबल आणि ग्लोबल ते लोकल’ अशा पद्धतीने माहितीची देवाणघेवाण करण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. या सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर सुरू झाला, तो स्मार्टफोनच्या माध्यमातून. मागील काही वर्षांत व्हॉट्सअॅप, फेसबुक, फेसबुक मेसेंजर, ट्विटर अशा अनेक साइट्स आणि अॅपची सुरुवात झाली. हे सगळे अॅपसह वापरताना त्यात फोटो पाठवणे, व्हिडिओ पाठवणे, फोटो काढणे, गप्पा मारणे, व्हिडिओ कॉल करणे असा वापर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झाला. यामुळे माणसांचा जगाशी रोज प्रत्यक्ष न भेटताही संबंध अर्थात नेटवर्क प्रस्थापित झाले. यात महिलांवर होणाऱ्या चांगल्या-वाईट परिणामांच्या दोन्ही बाजू समोर येत आहेत. मोबाइल आणि इंटरनेटची उपलब्धता महिला आणि पुरुषांना सारख्याच प्रमाणात मिळते का, यासाठी जीएसएमए असोसिएशनने भारतात मोबाइल आणि जेंडर गॅपच्या संदर्भातील अहवाल २०१९ मध्ये प्रकाशित केला. या सर्वेक्षणातून भारतात वर्ष २०१६ चे प्रमाण पाहिले, तर २०% महिला आणि ७१% पुरुष इंटरनेटचा वापर करणारे होते. २०१९ मध्ये हे प्रमाण अनुक्रमे ४०% आणि ६०% असल्याचा निष्कर्ष समोर आला. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत चीनच्या पाठोपाठ आपला देश इंटरनेट माध्यमाचा वापर करणारी सर्वात मोठी ऑनलाइन बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. २०२१ पर्यंत भारतात ६५३.८ दशलक्ष लोक इंटरनेट आणि मोबाइलचे वापरकर्ते असतील, असा अंदाज इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशनने मांडला आहे. इंटरनेटचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे असे दिसत असले, तरी यातील दुसरी बाजू लक्षात घेतली तर सोशल मीडियातून महिलांचे होणारे सादरीकरण हे या तंत्रज्ञानाच्या विश्वातही संकुचित मानसिकतेतून केले जाते. माध्यम कितीही प्रभावी असले, यामधून व्यक्त होणारी स्त्री प्रतिमा पूर्वीपासून साचेबंद होती. या प्रतिमेला छेद देण्याचे कार्य कॅरोलिना मिलानेसी यांनी त्यांच्या संशोधनातून २०१७ मध्ये जगासमोर आणले. सोशल मीडियातील इमोजी तयार करताना त्याचा वापर करताना लिंगसमभाव हा विचार पूर्णपणे दूर सारला गेला होता. सोशल मीडियातील इमोजीत लिंगसमभाव असला पाहिजे, हा विचार कॅरोलिना यांनी आपल्या संशोधनातून मांडला. त्यांच्या या अभ्यासाची दखल घेत या इमोजीच्या प्रकटीकरणामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण निर्णय २०१६ रोजी गुगल, अॅपल आणि युनिकोड या कंपन्यांनी घेतला. कॅरोलिनाच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार, ९२% स्त्री-पुरुष हे आपल्या भावना, आपली मते व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर करतात. या वापरल्या जाणाऱ्या इमोजीच्या प्रतिमा पाहिल्या, तर त्या म्हणतात, ‘जेंडर रिप्रेझेन्टेशन ’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षांनंतर इमोजीमध्ये विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिमा, वर्ण यांचा समावेश करण्यात आला. आज अनेक ठिकाणी महिला इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवसाय करत आहेत. तरीही हे प्रमाण अगदीच कमी आहे. याचे कारण या सायबर स्पेसमध्ये महिलांच्या बाबतीत होणारी हिंसा, लैंगिक शेरेबाजी, अश्लील विडिओ आणि फोटो यामुळे अनेक महिला आणि मुलीनी इंटरनेटचा वापर करणे बंद केले किंवा अगदीच कमी करून टाकले आहे. शिवाय, ऑनलाइन ट्रोलिंगमुळे महिला आणि मुली मानसिकदृष्ट्या खचत आहेत. 

एखाद्या स्त्रीने शेअर केलेला फोटो, व्हिडिओ किंवा तिचे मत जर कोणाला पटले नाही तर अतिशय वाईट शब्दात तिला ट्रोल केले जाते. किंबहुना ट्रोलिंगची भाषा, केली जाणारी शेरेबाजी ही व्यक्तिगत जीवनाची मानहानी करणारी असते. डिसेंबर २०१९ मध्ये ब्रिटनच्या संसदेच्या निवडणुकीत एकूण १८ महिला उमेदवार उभ्या होत्या. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी या महिला उमेदवारांनी या निवडणुकांच्या आधी एक-दोन नव्हे, १८ महिला सदस्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे घोषित केले होते. याचे मुख्य कारण होते की, ह्या स्त्रियांवर अतिशय अश्लील पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेरेबाजी होत होती. निवडणूक काळात हे प्रमाण प्रचंड वाढले होते. यातील एक महिला हैदी अ‍ॅलेन यांनी त्यांच्या मतदारांना पत्र लिहिले होते. त्यात त्या म्हणतात, मी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या अतिक्रमणामुळे हैराण झाले आहे. यामुळे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. कृष्णवर्णीय महिलांना तर अजूनच ट्रोलिंगचा मारा सहन करावा लागला.आपल्याकडे मराठी अभिनेत्री केतकी चितळेने, तिला ट्रोल करण्यात आले, तेव्हा स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोलिंगला सडकून उत्तर दिले होते. ट्रोलिंगचे प्रमाण दिवसेंदिवस विकृतच होत चालले आहे. एक १५ वर्षांची मुलगी तिने शेअर केलेल्या फोटोसाठी ट्रोल झाली, कारण दिसायला ती जाड होती. दुसरी मुलगी ट्रोल झाली, कारण तिने घातलेला ड्रेस सोशल मीडियावर काही व्यक्तींना आवडला नाही. एक स्त्री अधिकारी ट्रोल झाली, कारण तिने तिच्या वैयक्तिक समारंभांचे फोटो पोस्ट केले होते. यामुळे बऱ्याच मैत्रिणी सोशल मीडियाचा वापर करत नाहीत किंवा कमी प्रमाणात करतात. याशिवाय ऑनलाइन शॉपिंग, विवाहविषयक साइट, डेट अ‍ॅप्स, फोटो मॉर्फिंग, पोर्नोग्राफिक वेबसाइट याद्वारेही महिलाविषयक आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ पोस्ट केले जातात. महिलांवरील वाढते अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार आणि यात भर पडली ती ट्रोलिंगची. स्त्रियांचे ट्रोलिंग, त्यांना उद्देशून अश्लील शेरेबाजी करणे, अर्वाच्य भाषेचा वापर करणे, लैंगिक अत्याचार व बलात्काराच्या धमक्या हे प्रमाण वाढले आहे. एकंदरीतच इतरांच्या पोस्टवर आपले मत नोंदवत असताना भाषेचे तारतम्य बाळगले जात नाही. जेंडर म्हणून पाहायचे झाल्यास पुरुषही ट्रोल केले जातातच. मात्र, स्त्रियांच्या पोस्टवर होणारे ट्रोलिंग हे अश्लील, अर्वाच्य, अत्याचाराच्या धमक्या देणारे आणि दहशत पसरवणारे असते. यामुळे स्त्रियांसाठी सायबर स्पेस आकसत चालली आहे. 
यावर वेळीच विचार करून महिलांना आपलीशी वाटेल, अशी सायबर स्पेस तयार करणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. 

संपर्क- ७७७४९८२३२१

बातम्या आणखी आहेत...