आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन : ‘ट्रीपल आयटी’च्या विद्यार्थ्यांनी तयार केले शेतीसाठी ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - उपराजधानीच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या ‘ट्रीपल आयटी’मधील (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी) वैदर्भीय विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्मार्ट सिंचन यंत्र तयार केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयोगशीलतेची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्यात आली. ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०१९’मध्ये (हार्डवेअर एडिशन) नागपुरातील ‘ट्रीपल आयटी’च्या चमूने देशात अव्वल क्रमांक पटकावला, अशी माहिती “द टेरिफाईंग नाईटमेयर्स’ ग्रुपचा लीडर सौरव गजभिये याने दिली. या सिंचन यंत्राचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा यासाठी येत्या दहा दिवसात पेटंट घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्या नंतर व्यावसायिक उत्पादनासाठी विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू, असे सौरवने सांगितले. 


विदर्भात सिंचनाचा अनुशेष मोठा आहे. कोरडवाहू शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाने दडी मारल्यामुळे विदर्भावर दुष्काळाचे सावट असून दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. वीज रात्रीच मिळत असल्याने शेतीला पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांना प्रसंगी रात्र जागून काढावी लागते. हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी मोबाइलवर आधारित व कमी खर्चातील ‘स्मार्ट’ सिंचन यंत्र विकसित केले.


हे सिंचन यंत्र वायरलेस करणार असून पेटंट मिळवण्या पूर्वी सुप्रसिद्ध जर्नलमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध करणार असल्याचे साैरवने सांगितले. डॉ. आतिष दर्यापूरकर यांच्या मार्गदर्शनात सहा विद्यार्थ्यांच्या चमूने हे यंत्र विकसित केले. “द टेरिफाईंग नाईटमेयर्स’ ग्रुपमध्ये सौरव गजभिये, पूर्वा गोयडानी, वेदांत गन्नारपवार, हर्षल खंडाईत, प्रणव रबडे व कौशिक येलणे यांचा समावेश आहे.

 

चंदीगड येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत १४ चमूंमधून मारली बाजी 

‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०१९’मध्ये (हार्डवेअर एडिशन) ‘ट्रीपल आयटी’च्या चमूने हे यंत्र सादर केले. दुसऱ्या टप्प्यात १ हजार १०१ चमूंमध्ये ‘ट्रीपल आयटी’चा समावेश होता. दोन महिन्यांच्या खडतर प्रयत्नानंतर चमूला अखेरच्या फेरीत जाण्याची संधी मिळाली. ‘सीएसआयआर-सीएसआयओ’ चंदिगड येथे देशातील १४ चमूचे आव्हान होते. यात ‘ट्रीपल आयटी’च्या चमूने बाजी मारली. यंत्राची कल्पना ते प्रत्यक्ष ते विकसित करणे या प्रवासात अनेक अडचणी आल्या. मात्र एकत्रितपणे प्रयत्नांमुळे  राष्ट्रीय पातळीवर यश मिळाले, अशी भावना सौरवने व्यक्त केली. संस्थेचे संचालक डॉ. ओ. जी. काकडे, प्रभारी अधिष्ठाता डॉ.ए. जी. कोठारी, प्रभारी कुलसचिव के. एन. दाखले, डॉ. विपिन कांबळे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सौरवने सांगितले. 

 

पंप आपोआप चालू व बंदसुद्धा होऊ शकतोे
या प्रणालीतील ‘ऑटोमेशन मोड’मुळे पंप आपोआप चालू व बंद होऊ शकतो. प्रणालीला उपयुक्त बनवताना तापमान, मातीचा ओलावा, आर्द्रता इत्यादींची चाचपणी केल्यावर पंप चालू किंवा बंद होतो. पावसाचे प्रमाण, पर्जन्यमानाचा दर, सिंचनाचा प्रकार, पिकाच्या वाढीचा टप्पा यांच्या आधारावर पंपाचे कार्य चालते. या ‘स्मार्ट’ प्रणालीमुळे पिकाला आवश्यक तेवढेच पाणी मिळते.