आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाजाला आरक्षण दिले नाही, मग मंत्रालयात कशा काय आलात?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- धनगर आरक्षण दिल्याशिवाय मंत्रालयात पाऊल ठेवणार नाही, असे तुम्ही म्हणाला हाेतात. धनगर समाजाला अद्याप आरक्षण दिलेले नाही. मग, ताई तुम्ही मंत्रालयात कसे काय चाललात, मी तुम्हाला मंत्रालयात जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराव वडकुते यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची मंगळवारी मंत्रालयातली वाट रोखून धरली. 

 

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठक होती. त्याला उपस्थित राहण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे सकाळी साडेदहाच्या सुमारास मंत्रालयाच्या प्रवेशद्वारी पोेचल्या. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार व धनगर समाजाचे नेते रामराव वडकुते उभे होते. त्यांनी प्रवेशदाराला दोन हात आडवे लावत 'तुम्ही मंत्रालयात कसे काय आलात?' असा मुंडे यांना सवाल केला. 

आमदार साहेब, माझे भाषण नीट ऐका. माध्यमांत काय दाखवले, काय छापून आले ते पाहू नका. मी तसे म्हटले नव्हते. धनगर समाजाला आरक्षण दिले नाही तर आम्हाला मंत्रालयात जाता येणार नाही, असे आपण म्हणालो होतो, असा मुंडे यांनी खुलासा केला. त्यानंतर मुंडे मंत्रालयातील चौथ्या मजल्यावरील आपल्या दालनात निघून गेल्या. पंकजाताई या आमच्या नेत्या आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही, असा त्यांनी इशारा दिल्यानंतर धनगर समाज आनंदी झाला होता. मात्र, ताईंची प्रतिज्ञा दुर्दैवाने एक दिवसच टिकली. पंकजाताईंनी धनगर समाजाच्या भावनांशी खेळ केला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भाजपसाठी निवडणुका जिंकण्याचा अजेंडा बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांना फसवले आहे. आता पंकजाताईसुद्धा फसवत आहेत, असा आरोप आमदार रामराव वडकुते यांनी 'दिव्य मराठी'ला कडे केला. दरम्यान, पंकजा यांना अडवल्यानंतर काही वेळानंतर त्या आपल्या दालनात जाऊन बसल्या त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. 

 

सत्तेसाठी सारा खेळ : नवाब मलिकांची टीका 
सहा जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबा यात्रेत भाजप नेते गणेश हाके यांनी धनगर समाजाचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांचे भाषण झाले होते. त्या भाषणात मुंडे यांनी सदर विधान केले होते. याप्रकरणी मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर घूमजाव केले आहे. त्यांना दोन दिवसही सत्तेपासून दूर राहता येत नाही. यांचा हा खेळ सत्तेसाठी आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. दरम्यान, आता याच मुद्यावर काँग्रेसने अजूनही काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे काँग्रेसही त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 

भाषण माेडतोड करून दाखवले : पंकजा मुंडे 
यासंदर्भात पंकजा मुंडे यांना पत्रकारानी विचारले असता, त्यांनी बातमीदारी कशी करायची यावरच पत्रकारांना धडे दिले.तसेच 'तुम्ही माझे भाषण मोडूनतोडून दाखवले आहे. धनगर समाजाला आरक्षण नाही दिले तर आम्ही मंत्रालयात जाऊ शकणार नाही, असे आपण त्या मेळाव्यातील भाषणात म्हणालो होतो, असे त्यांनी पत्रकारांकडे स्पष्ट केले. त्याच्या पुष्टर्थ्य मुंडे यांनी स्वत:च्या भ्रमणध्वनीतील मेळाव्यातील आपल्या भाषणाचा व्हिडिओ पत्रकारांना ऐकवला. 
 

बातम्या आणखी आहेत...