आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचमढीतील माकडे आणि विद्यार्थी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आपण जिथे जातो तिथे आपला ठसा सोडून जातो. पण तो ठसा कसा असावा? आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याचे भान आपण ठेवत नाही. किमान आपल्या अयोग्य वागणुकीची फळे इतरांना भोगावी लागू नयेत, याची आपण काळजी घ्यावी लागते. वाईट कोणीच नसतो. ना माणूस, ना प्राणी.


'भूतदया ज्याचे मनी,
तोचि साधू ओळखावा
देव तेथेचि जाणावा'
या उक्तीप्रमाणे निश्चितच आपण प्राणीमात्रांवर प्रेम करावे; त्यांना मदत करावी. पण हे करत असताना त्यांच्या नैसर्गिक जीवनशैलीत आपण हस्तक्षेप तर करत नाही ना, याचाही विचार जरूर केला पाहिजे. पण आपल्याकडून नकळतपणे नको ते वर्तन घडते. असाच काहीसा अनुभव काही दिवसांपूर्वी केलेल्या सहलीमध्ये आला. तसा सहल हा फार सुंदर अनुभव असतो. सहलीमध्ये आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं. सहवासातून सहकार्य वृत्ती वाढते.स्वयंशासन, स्वयंशिस्त सहलीतूनच शिकायला मिळते. साहस, निरीक्षणक्षमता सहलीतूनच वाढते. शिवाय पुस्तकात जे वाचलेले असते, त्याचा प्रत्यक्ष अनुभव सहलीतून घेता येतो. 

 

डिसेंबरमध्ये आमच्या शाळेतील सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल मध्य प्रदेशमधील पंचमढी या थंड हवेच्या ठिकाणी गेली होती. पंचमढी म्हणजे पाच गुंफा, ज्या निसर्गनिर्मित आहेत. त्या गुंफांमध्ये आपल्या सोयीनुसार  काहीही बदल केलेला नाही. ते जसं निसर्गाकडून आलं आहे तसंच जपून ठेवण्यात आलेलं आहे. अशा निसर्गसौंदर्याचा  आनंद घेत आम्ही जेव्हा त्या गुहांमधून बाहेर आलो तेव्हा तेथे खूप माकडे होती. मुलांना माकडे पाहून खूप आनंद झाला.पण जेव्हा विद्यार्थी रांगेत चालले होते तेव्हा ती माकडे मुलांच्या दिशेने धावत आली. त्यांनी मुलांच्या हातातील पिशव्या ओढून घ्यायला सुरुवात केली. पिशवी नाही दिली नाही तर चिडून ती त्यांच्या अंगावर येऊ लागली. पिशव्या घेऊन त्याची चेन उघडून त्यातील बिस्किटे, चिप्स, शीतपेये, पाणी, ती घेऊ लागली व स्वतः खाऊपिऊही लागली. त्या माकडांची संख्याही खूप होती. कधी कोठून माकड येईल ते सांगता येत नव्हते. मुलं खूप भेदरून गेली होती. एकदा तर मुलांनी चप्पल ठेवलेल्या स्टॅॕण्डवरही माकडं बसली. मग ती चप्पल घेऊ देईनात, म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला तर ती माकडे चिडून आमच्या अंगावर येऊ लागली. एवढ्यात तिथले एकजण काठी घेऊन आले व माकडांना हुसकावू लागले. मग तर ती आणखीनच चवताळली. शेवटी आम्हीच माघार घेतली व आम्ही बाजूला जाऊन उभे राहिलो आणि ती तेथून जाण्याची वाट पाहत थांबलो. बराच वेळाने ती तेथून निघून गेल्यावर आम्ही आमच्या चप्पला घेतल्या. त्यानंतर आमच्या प्रमुखांच्या सूचनेनुसार मुलांनी कोठेही काहीही खाद्यपदार्थ सोबत घेतले नाहीत. पण मी या प्रसंगाने अस्वस्थ झाले. दुसरे ठिकाण बघण्यासाठी आम्ही जिप्सी गाडीतून जात असताना मी तेथील ड्रायव्हरला सहज विचारले, "भय्या, ही माकडे पर्यटकांना एवढा त्रास देतात यावर तुम्ही स्थानिक लोक काही उपाय का करत नाही?"


माझ्या या प्रश्नावर त्याने जे उत्तर दिले, त्या उत्तराने मी नि:शब्दच झाले. तो म्हणाला,
"मॅडम, त्यांनी पर्यटकांना त्रास नाही द्यायला पाहिजे, तर मारायला पाहिजे."
मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहतच राहिले. त्यावर तो म्हणाला,
"मॅडम, या पर्यटकांनीच त्यांना सोकावले आहे. काहीही विकत घ्यायचं आणि त्यांना खायला द्यायचं. म्हणून हळूहळू त्यांना त्याची सवय झाली आहे. त्यांचे स्वत:चे खाद्य मग ते विसरूनच गेले. आता त्यांना नाही दिलं तर ते हिसकावून घेतात; प्रसंगी अंगावरही येतात. कधी - कधी तर हल्लाही करतात."


मी विचारात पडले. खरंच यामागे कोणाची चूक आहे? माकडांची? मुळीच नाही. आपण जिथे जातो तिथे आपला ठसा सोडून जातो. पण तो ठसा कसा असावा? आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याचे भान आपण ठेवत नाही. किमान आपल्या अयोग्य वागणुकीची फळे इतरांना भोगावी लागू नयेत, याची आपण काळजी घ्यावी लागते. वाईट कोणीच नसतो. ना माणूस, ना प्राणी. ज्याची जशी सवय तसा तो घडतो व बिघडतोही. म्हणून आपण चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत.


पर्यटन करायला सगळ्यांनाच आवडत असतं. निसर्गसौंदर्याचा आनंद घेत असताना, तेथील परिसर म्हणजे आपल्या इतिहासाचा अनमोल ठेवा आहे, याची काळजी घेणे एक भारतीय म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे, असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आपण जिथे पर्यटनासाठी जातो तेथून परत येत असताना मागे वळून नक्की बघितले पाहिजे.माझ्या सहवासाने इथल्या सौंदर्याला बाधा तर आली नाही ना हे नक्की पाहिले पाहिजे. नेहमीसाठी लक्षात असू द्यावे की, तुम्ही कोठेही पर्यटनाला गेल्यावर माकडांना व इतर प्राण्यांना काही खायला देऊच नये. 'जो जन्माला येतो त्याच्या भुकेची व्यवस्था ईश्वराने केलेली असते,' हे  सत्य ध्यानात असू द्यावे.

रेश्मा आळणे, माजलगांव, बीड
 

बातम्या आणखी आहेत...