आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटणा - भाजपचे माजी विधान परिषद आमदार अनुज कुमार सिंह यांच्या घरावर रात्री अचानक 50 नक्षलवाद्यांनी हल्ला केला. गया जिल्ह्यातील डुमरिया या नक्षलग्रस्त परिसरात राहणारे अनुज कुमार सिंह गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बुधवार आणि गुरुवारच्या मध्यरात्री मोठ्या संख्येने आलेल्या नक्षलींनी सुरुवातीला त्यांच्या घरातील सर्वच कुटुंबियांना घराबाहेर काढले. त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर रिकामे घर स्फोटकांनी उडवले. लोकसभा निवडणुकीनंतर नक्षलवाद्यांनी हा हल्ला करून प्रशासनाला खुले आव्हान दिले आहे. दरम्यान, नक्षलींनी केलेला हल्ला आणि बॉम्बस्फोटात कुणाचाही मृत्यू झालेला नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, सशस्त्र नक्षलवाद्यांच्या एका समूहाने गयाचे माजी एमएलसी अनुज कुमार सिंह यांच्या घरावर हल्ला करून कुटुंबियांना बेदम मारहाण केली. यामध्ये भाजप नेत्याचे काका, भाऊ आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश होता. यानंतर घर रिकामे करून स्फोटके लावली आणि स्फोट घडवून घर पूर्णपणे उद्ध्वस्त केले. मारहाण, आरडा-ओरड आणि स्फोटाच्या आवाजाने अख्ख्या गावाची झोप उडाली. नक्षलवादी या दरम्यान जोरदार घोषणाबाजी करत होते. नक्षली हल्ला होत असताना आणि नक्षली गेल्यावर सुद्धा गावकरी भयग्रस्त होते. या घटनेनंतर रात्रभर गावात कुणीही झोपला नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले. विशेष म्हणजे, याच नेत्याच्या घराला नक्षलवाद्यांनी यापूर्वीही लक्ष्य केले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.