आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकल्पासोबत संपर्कही कायम!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेची वाटचाल बसल्याजागी खिळवून ठेवणाऱ्या आणि क्षणोक्षणी उत्कंठावर्धक बनत जाणाऱ्या रोमांचक चित्रपटाप्रमाणे होत आहे. अनेकविध आव्हानात्मक टप्पे पार केल्यानंतर शनिवारी पहाटे चंद्राला स्पर्श करण्यास अवघे २.१ किलोमीटर अंतर बाकी असताना या चांद्रयानाचा विक्रम लँडरशी असलेला संपर्क खंडित झाला आणि तमाम देशवासीयांच्या काळजाचा ठोका चुकला. मोहिमेच्या निर्भेळ यशाला ग्रहण लागते की काय अशी हुरहुर दाटलेली असतानाच रविवारी इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी आपले लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्याची छायाचित्रे ऑर्बिटरने पाठवल्याचे जाहीर केले. लवकरच 'विक्रम'शी संपर्कही प्रस्थापित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्यामुळे आता मनात पुन्हा आशेचा चंद्र उगवला आहे ! इस्रोने यापूर्वी अनेक अचंबित करणारे प्रयोग करत अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. तथापि, अगोदरच्या कुठल्याच प्रसंगी या वेळेएवढी सर्वसामान्यांची 'इन्व्हॉल्व्हमेंट' नव्हती. माध्यमे, समाजमाध्यमांतील जनजागृती 'मिशन मंगल' चित्रपट आणि राजकीय-सामाजिक मंचांवरील चर्चांमुळे चांद्रयान-२ मोहिमेचा बोलबाला प्रचंड झाला. एकाअर्थी ते चांगलेच म्हणायचे. कारण, त्यातून भावी पिढीला याबाबत आकर्षण आणि प्रेरणाही मिळणार आहे. असो. मुद्दा आहे तो या मोहिमेच्या आखणीचा आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कामगिरीचा. ज्या पद्धतीने आपल्या शास्त्रज्ञांनी ही कामगिरी बजावली ती नक्कीच अद्वितीय म्हणावी अशी आहे. म्हणूनच तब्बल ५० वर्षांपूर्वी चंद्रावर मानवाला प्रत्यक्षात उतरवण्याची किमया करणाऱ्या 'नासा'नेसुद्धा या मोहिमेचे तोंडभरून कौतुक केले. आजवर चंद्राच्या ज्या दक्षिण ध्रुवावर जायचा अन्य कुणी विचारही केला नव्हता तिथे भारताचे चांद्रयान जाऊन पोहोचल्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाल्याचेही नासाने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर सूर्यमालेतील नव्या शोधांसाठी भविष्यात इस्रोशी सहकार्यास उत्सुक असल्याची नासाने दिलेली प्रतिक्रिया भारतवासीयांना अभिमानास्पद आहे. 'विक्रम'च्या सॉफ्ट लँडिंगमध्ये अडथळे आल्यानंतर भारताला टोमणे मारणाऱ्या पाकिस्तानातल्या काही वाचाळ नेत्यांच्याही सणसणीत श्रीमुखात लावणारी आहे. कितीही नाही म्हटले तरी अशा महत्त्वाकांक्षी मोहिमा राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाहीत. त्यामुळे या प्रतिक्रिया असोत की 'विक्रम'चा संपर्क तुटल्यावर के. सिवन यांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी मोदींनी दिलेला आपल्या खांद्याचा आधार असो... त्यावर चर्चा होणारच. त्यामुळे त्याला फार महत्त्व देण्यापेक्षा 'विक्रम'शी लवकरात लवकर संपर्क प्रस्थापित व्हावा यासाठी शास्त्रज्ञांना शुभेच्छा देण्याची गरज आहे. नेहरूंनी लावलेल्या इस्रोच्या रोपट्याचा शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे डेरेदार वृक्ष झाला आहे. आता तो मधुर फळांनी लगडलेला पाहण्यास सर्वजण अासुसलेले आहेत. तेव्हा 'विक्रम'ला लागलेली हार्ड लँडिंगच्या ग्रहणाची छाया लवकरच हटेल आणि मोहीम शत-प्रतिशत फत्ते होईल, अशी आशा करूयात.  

बातम्या आणखी आहेत...