आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोलीत अनेक गावांत घुमतायेत 'जो पाजील नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू' अशा घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमाकांत दाणी 

नागपूर - निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे प्रलोभन दाखवून निवडणूक प्रभावित करण्याचे प्रकार सर्रास होताना दिसतात. त्याचा निवडणुकीवर परिणाम व्हायचा तो होतोच. निवडणूक दारूमुक्त आणि नि:पक्ष पद्धतीने व्हावी म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील २८७ गावांच्या १२० ग्रामपंचायतींनी ग्रामसभांमध्ये ठराव घेऊन निवडणूक दारूमुक्त पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या व्यसनमुक्तीच्या मुक्तिपथ अभियानाला प्रतिसाद देत गडचिरोलीतील गावे त्यासाठी पुढे येत आहेत. मागील २२ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे. मात्र, आजही गावागावांमध्ये अवैध दारूची विक्री थांबलेली नाही. संपूर्ण जिल्हा तंबाखूमुक्त करण्याचेही मुक्तिपथचे प्रयत्न आहेत. त्यासाठी मुक्तिपथच्या गावसंघटनांचे जाळे उभारण्यात आले असून त्यामार्फत गावागावांमध्ये जागृती केली जात आहे.
 

६०० गावांमध्ये दारूबंदी
मुक्तिपथच्या कार्यकर्त्यांच्या सततच्या प्रयत्नांतून आतापर्यंत जिल्ह्यातील सहाशेवर गावांनी सामूहिक निर्णयाने गावात येणाऱ्या अवैध दारूला आळा घातला आहे. निवडणुकीच्या काळात मतांसाठी दारूचे आमिष दाखवण्याचे प्रकार घडतात. दारूमुक्त निवडणूक का हवी, याचे महत्त्व ग्रामपंचायतींच्या सदस्यांना मुक्तिपथचे कार्यकर्ते पटवून देत आहेत. परिणामी आतापर्यंत १२० ग्रामपंचायतींनी प्रतिसाद देऊन दारूमुक्त निवडणुकीचे ठराव घेतले आहेत. गावांमध्ये मिरवणुका काढून लोकांना दारूमुक्तीचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
 

असे आहेत ठराव
१. उमेदवार दारू पिणारा नसावा
२. तो दारूबंदीचा समर्थक असावा
३.निवडणुकीत दारूवाटप केले जाणार नाही
४. मतदारांनीही दारूच्या नशेत मतदान करू नये.
 

जो पाजील नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू..
अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यात गोलगुडम, ग्रासपेठा, तुमनूरमाल, रामंजापूर, एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली, दोड्डी, तोडसा, कुरखेडा तालुक्यातील गरगडा, खैरी, खेडगाव अशा अनेक दुर्गम गावांमध्येही दारूमुक्त निवडणुकीचे ठराव झाले आहेत. निवडणूक काळात गावात दारू येऊ दिली जाणार नाही, कारवाई केली जाईल, असा निर्धार ठरावांतून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे उमेदवार व राजकीय पक्षांनाही इशारा देण्यात आला आहे. “जो पाजील नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू..” अशा घोषणा गावात घुमत आहेत.
 

दारूमुक्त निवडणुकीचे आवाहन करावे
“मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीने केलेली दारूमुक्त उमेदवार व दारूमुक्त निवडणुकीची मागणी राज्याला एक नवी वाट दाखवणारी आहे. जनतेने पक्ष व शासनाला दारूमुक्त निवडणुकीचे आवाहन करावे.”
- डॉ. अभय बंग, ज्येष्ठ समाजसेवक