आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - ‘महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजपला सरकार स्थापण्याचा जनादेश दिला आहे. राज्यावर अवकाळीचे संकट असताना ही अस्थिर परिस्थिती परवडणारी नाही. युतीने जनादेशावर आता तातडीने अंमल करावा,’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दोन्ही पक्षांना दिला. मात्र, राष्ट्रवादीची भूमिका काय याविषयी त्यांनी आपले पत्ते उघड केलेच नाहीत.
रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी दुपारी पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ‘जनता राजकीय घडामोडींची गांभीर्याने नोंद घेत असते. आता राज्यपाल तर किती दिवस थांबवणार? राज्यपालांना लवकरच निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात परिस्थिती ओढावेल,’ असे सांगून ‘युतीने सरकार बनवायला हरकत नाही,’ याचा पवार यांनी पुनरुच्चार केला. सरकार लवकर स्थापन नाही झाले तरी राज्यात पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार नाहीत. मात्र, राष्ट्रपती राजवट लागू शकते. महाराष्ट्रात गेल्या ६० वर्षांत अपवाद सोडले तर राजकीय अस्थिरता कधीच ओढवली नव्हती याकडेही पवारांनी लक्ष वेधले.
आठवलेंनी मागितला सल्ला :
‘शरद पवार हे राज्यातील अनुभवी नेते आहेत. आताच्या परिस्थितीत काय करायला हवे, हा सल्ला घेण्यासाठी मी त्यांची आज भेट घेतली,’ असे रिपाइं अध्यक् रामदास आठवले यांनी सांगितले. तर ‘आठवले संसदेत जेव्हा बोलतात, त्यांचे म्हणणे सर्व गांभीर्याने घेत असतात. आता आठवले त्यांच्या मित्रांना लवकर सरकार स्थापन करावे, असा सल्ला देतील, अशी मला आशा मला अाहे,’ असे पवारांनी स्पष्ट केले.
आमच्याकडे ना शिवसेनेचा प्रस्ताव, ना भाजपचा...
‘राज्याच्या दृष्टीने हे वातावरण काही चांगले नाही. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. असते तर आम्ही थांबलो नसतो,’ असे पवार यांनी अाघाडीचे सरकार येईल का? या प्रश्नावर बाेलताना स्पष्ट केले. आमच्याबरोबर या, असे ना शिवसेनेने, ना भाजपने आम्हाला विनंती केली आहे, असा खुलासाही त्यांनी केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.