आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआष्टी- आपल्या पतीशी अनैतिक संबंध असलेल्या जावेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब विवाहितेने नगर जिल्हा रुग्णालयातील पोलिसांना दिला. यावरून आष्टी पोलिस ठाण्यात जावेविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तर वेगळे राहू दिले जात नसल्याने भावजयीनेच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिराने म्हटले आहे. दरम्यान, आष्टी पोलिसांनी केलेल्या घटनास्थळाच्या पंचनाम्यात महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करतेवेळी खोलीला आतून कडी लावली होती. दरवाजा तोडावा लागला होता अशी नोंद केली आहे. मनीषा सचिन लुणिया (रा. रुई नालकोल, ता.आष्टी) असे भाजलेल्या विवाहितेचे नाव आहे.
या प्रकरणी आष्टी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सासरच्या लोकांचे जबाब घेतले जाणार आहेत. रुई नालकोल येथील सचिन इंद्रकुमार लुणिया याचा अडीच महिन्यांपूर्वी मनीषाशी विवाह झाला होता. परंतु, मनीषाला तिच्या पतीचे जावेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयावरून कुटुंबात मागील काही महिन्यांपासून वाद होत होता. रविवारी (दि. २५ नोव्हेंबर) पहाटे मनीषा ही तिच्या खोलीत झोपली असताना तिची जाऊ पूनम लुणियाने तिच्या अंगावर राॅकेल ओतून पेटवून देत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असा जबाब मनीषाने नगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंदवला. दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण आष्टी पोलिसांकडे वर्ग केले. आष्टी पोलिसांत मनीषाच्या जावेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रविवारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल शहाणे करत आहेत.
रुई नालकोलातील सचिनशी अडीच महिन्यांपूर्वीच विवाह
रुई नालकोल येथील सचिन लणियाचा विवाह अडीच महिन्यांपूर्वी मनीषासोबत झाला होता. सचिनच्या कुटुंबात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार असून हे सर्व लुणिया कुटुंबीय एकत्रित राहतात.
मनीषाची मृत्यूशी झुंज
मनीषा ही ८० टक्के भाजली असून तिच्यावर सध्या नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिच्याबरोबर पती सचिन लुणिया हा रुग्णालयात आहे. मनीषा ही सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.
कुटुंबातील लोकांचे जबाब घेणार
लुणियाच्या कुटुंबातील इतर लोकांचे जबाब घेण्यात येणार असून या घटनेचा तपास लवकरात लवकर करण्यात येईल. विशाल शहाणे, तपास अधिकारी, आष्टी.
तिची स्वतंत्र राहण्याची इच्छा होती
मनीषाला स्वतंत्र राहायचे होते. परंतु आमच्या कुटुंबाला हे मान्य नव्हते. घरात स्वयंपाकासाठी स्टोव्ह घेऊन दिला होता. याच स्टोव्हमधील रॉकेल अंगावर ओतून घेतले. तेव्हा मनीषाने खोलीला आतून कड्या लावून घेतल्या होत्या. तिला वाचवण्यासाठी दरवाजा तोडून मी आत गेलो व तिच्या अंगावर पाणी टाकून तिला वाचवले. प्रवीण लुणिया, मनीषाचा दीर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.