Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Restricted restrictions on the transportation of ashes in Parli

परळीत राखेच्या वाहतुकीवर कडक निर्बंध, रात्री राख उचलण्यासह वाहतुकीला बंदी

प्रतिनिधी | Update - Nov 08, 2018, 11:58 AM IST

दिवसा होणारी राख वाहतूक नियमाप्रमाणेच करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

 • Restricted restrictions on the transportation of ashes in Parli

  परळी - येथील औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे प्रमुख मार्गावर प्रदूषण होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांनी राख वाहतुकीवर कडक निर्बंध घातले आहेत. रात्रीच्या वेळी राख उचलण्यास व वाहतूक बंद करण्यात आली आहे. दिवसा होणारी राख वाहतूक नियमाप्रमाणेच करावी, अशा सूचना दिल्या आहेत. दाऊतपूर, वडगाव येथील राखेच्या तळ्यातून सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच राखेची उचल व वाहतूक करता येणार असून वाहतूक करणाऱ्या वाहनात समतल प्रमाणात राख भरावी लागणार आहे.

  राखेच्या प्रदूषणाचा "दिव्य मराठी'ने केलेल्या पाठपुराव्यांमुळे परळी थर्मल प्रशासनाने परिपत्रक काढून हा निर्णय घेतला आहे. परळी औष्णिक वीज केंद्रातून १५ हजार मेट्रिक टन राख रोज बाहेर पडते. १२ हजार मेट्रिक टन राख ओली असून उर्वरित तीन हजार मेट्रिक टन राख दाऊतपूर येथील राखेच्या तळ्यात पाइपद्वारे सोडण्यात येते. ही राख तळ्यात पसरते त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने घेतली जाते. ही राख वीटभट्टी चालक मोफत घेऊन ट्रकद्वारे लातूर, नगर, अंबाजोगाई, नांदेड, परभणी या ठिकाणी नेण्यात येते. बीड- परळी, परळी-अंबाजोगाई, परळी-गंगाखेड, परळी -लातूर, परळी घाटनांदूर मार्गे राखेची वाहतूक होते.

  रात्रीच्या वेळी राखेची वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याने रस्त्यावर राख पसरून ती वाहनचालकांच्या डोळ्यात जाऊन अपघात घडतात. परळी शहरातील उड्डाणपूल ते वैद्यनाथ मंदिर, इटके कॉर्नर ते मौलाना आझाद चौक या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. आठ दिवसांपूर्वीच पांगरी येथील ग्रामस्थांनी राख रस्त्यावर पडल्याने ४० टिप्पर अडवले होते. तहसीलदार आणि पोलिसांनी मध्यस्थी करूvन दिले होतेे. येथील राख वाहतुकीसंदर्भातील अौष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारेंनी ६ नोव्हेंबर २०१८ रोजी परिपत्रक काढून राखेच्या वाहतुकीसंदर्भात नियमावली जाहीर केली.

  या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्यात. परिपत्रक उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसह परळी शहर व परळी ग्रामीण ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना पाठवले आहे. दाऊतपूर,वडगाव व परिसरातील राखेच्या तळ्यातून सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच राखेची उचल व वाहतूक करावी, वाहतूक करणाऱ्या वाहनात समतल प्रमाणात राख भरावी, असे निर्देश दिलेत. उघड्या वाहनातून होत असलेल्या राखेच्या प्रदूषणाप्रकरणी "दिव्य मराठी'ने केलेल्या पाठपुराव्यांमुळे थर्मल प्रशासनाने कडक भूमिका घेतली.

  राख वाहतूक करण्याच्या या नियमांचे करावे पालन वाहनात राख समतल प्रमाणातच भरावी
  राख भरल्यानंतर वाहन व्यवस्थित झाकणे बंधनकारक. वाहतुकीदरम्यान गळती होणार नाही याची खबरदारी घ्यावी. राखेची वाहतूक सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच करावी.
  शासन नियमाप्रमाणेच कारवाई करण्यात येईल राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी नियमांचे पालन करूनच राख वाहतूक करावी. नियमबाह्य राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर नियमानुसार गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल. देविदास शेळके, पोलिस निरीक्षक परळी शहर.

Trending