आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुळशी पॅटर्न’नंतर आता आणणार ‘रेती पॅटर्न’; प्रसिद्ध मराठी अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘दिव्य मराठी’शी संवाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - गोवा मराठी चित्रपट महोत्सव नुकताच पणजी येथे झाला. या महोत्सवादरम्यान आयाेजित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाला महाराष्ट्रासह इतर ठिकाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटातील नन्या तरडे ही भाईची भूमिका साकारलेले तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक प्रवीण तरडे यांनी ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला. 

प्रश्न : आपण या क्षेत्रात कसे आलात?
> तरडे : खरे तर मी एमबीएपर्यंत शिकलो. नंतर एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक पदावर अनेक वर्षे काम केले आहे. मी मुळचा मुळशी तालुक्यातील असून तेथील शेतकऱ्यांबद्दलची वास्तविकता माझ्या मनाला भिडली म्हणून सर्व लोकांपर्यंत या प्रश्नाची दाहकता पोहोचवण्यासाठी मी या क्षेत्रात पदार्पण केले.


प्रश्न: मुळशी पॅटर्नबद्दल काय सांगाल ?
> तरडे : मुळशी पॅटर्न ही वास्तवातील कथा आहे. यातील सगळी पात्रे शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहेत. या चित्रपटाचा निर्माता आजही बारामतीत शेती करतो. शेती विकलेल्या कुटुंबातील मुले कसे गुन्हेगारी जगताकडे वळतात याचे वास्तव या चित्रपटात दाखवले अाहे.


प्रश्न : सेन्साॅर बोर्डाने या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट का दिले ?
> तरडे : हे मलाही आत्तापर्यंत कळले नाही. काही दाक्षिणात्य चित्रपटांत यापेक्षा जास्त हिंसा दाखवलेली असतानाही त्यांना ‘यूए’ प्रमाणपत्र मिळते. सेन्साॅरच्या लोकांना एका रांगेत उभे करून मारले पाहिजे. कारण मराठी, हिंदी व दाक्षिणात्य चित्रपट यांच्यासाठी ते वेगवेगळे नियम लावतात. त्यात माझ्या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी ७८ वर्षीय महिला आल्या होत्या, त्यांचे वय आणि आजची सामाजिक स्थिती यात फरक असणारच.


प्रश्न : शेतकरी आत्महत्यांबद्दल आपण काय सांगाल ?
> तरडे : आत्महत्या करणे हा शेतकऱ्यांचा स्वभावच नाही. पण हमीभावाअभावी कधी-कधी असे टोकाचे निर्णय घेतले जातात. खरे तर शेतीपिकासाठी दर २०० किमीवर कोल्ड स्टोअरेज उभारायला हवेत. शेतमालाला हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांनीदेखील आत्महत्या करण्यापेक्षा गटशेतीवर भर द्यावा. त्यातून चांगले उत्पन्न मिळते.  आजची शेतकऱ्यांची ही विदारक परिस्थिती राजकारण्यांमुळेच झाली आहे. 

सरकारी भ्रष्ट यंत्रणेला वाचा फोडणारा चित्रपट 
माझ्या आगामी चित्रपटाचे नाव रेती पॅटर्न आहे. या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू असून ती पूर्णत्वास येताच लवकरच चित्रीकरण सुरू हाेईल.  हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित हाेईल. वाळूची अवैध वाहतूक, यातून मिळणारा पैसा, सरकारी यंत्रणेचा भ्रष्टाचार, या व्यवसायातील गुन्हेगारी हा विषय या चित्रपटात दाखवला जाईल. या माध्यमातून वास्तव चित्रण मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. माफियांकडून सुरू असलेली वाळू तस्करी हा केवळ व्यवसायाचाच मुद्दा राहीला नसून त्यातून अनेक गैरकृत्यही चालतात, असे तरडे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...