आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीवर हल्ला करून निवृत्त कर्मचाऱ्याची आत्महत्या; रागीट स्वभावामुळे आत्महत्या केल्याचे नमूद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड -  कौटुंबिक वादातून पत्नीवर हल्ला करून आरोग्य विभागातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. एकनाथनगर भागात रविवारी सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली.


अशोक बाबूराव मस्के (६५, रा. एकनाथनगर, बीड) असे आत्महत्या केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांना एक मुलगी, दोन मुले आहेत. मुले शिक्षण, नोकरीसाठी बाहेरगावी राहतात. बीडमधील एकनाथनगर येथील घरी अशोक मस्के हे पत्नी किरण यांच्यासमवेत राहतात. रविवारी सकाळी पती- पत्नीत घरगुती कारणावरून वाद झाला. कडाक्याच्या भांडणानंतर अशोक मस्के यांनी पत्नीवर हल्ला केला. यात त्या रक्तबंबाळ अवस्थेत घरात कोसळल्या. त्यानंतर  शेजाऱ्यांनी किरण यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवले. दरम्यान, हल्ल्यात पत्नी मृत झाली असेल असे वाटून इकडे अशोक मस्के यांनी घरातील पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, मयत अशोक यांचा मुलगा अतुल मस्के यांनी जिल्हा रुग्णालय चौकी पोलिसांना दिलेल्या जवाबात वडील रागीट स्वभावाचे होते, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे. त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, आई कशामुळे जखमी झाली, हे जबाबात नमूद नाही. गंभीर जखमी झालेल्या किरण मस्के यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शिवाजीनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.