आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी आपण काही तरी देणं लागतो, या भावनेतून नगरमधील सहा निवृत्त सैनिकांनी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनची स्थापना केली. दर महिन्याला येणाऱ्या निवृत्ती वेतनातून ठरावीक रक्कम काढून ती या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून या निवृत्त सैनिकांनी नगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेमार्फत दोन वर्षांत जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. फाउंडेशनचे खजिनदार भाऊसाहेब कर्पे, सचिव जगन्नाथ जावळे, सहसचिव निवृत्ती भाबड, विश्वस्त दिगंबर शेळके, संभाजी वांढेकर व संतोष मगर यांनी पेन्शनमधील काही रक्कम दर महिन्याला जमा करून सामाजिक उपक्रम राबवले आहेत. जिल्ह्यातील माजी सैनिकांना न्याय मिळून देणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण, पाणी अडवा पाणी जिरवा, वयोवृद्धांना एक आधार काठीचा या उपक्रमांतर्गत काठी वाटप, गरजू रूग्णांना रक्त मिळावे म्हणून रक्तदान शिबिर, ग्राम स्वच्छता अभियान, थंडीमुळे कुडकुडणाऱ्या गोरगरिबांना गरम कपड्याची मिळावी यासाठी उबदार कपडे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, तरूणांना सैन्यात भरती होण्यासाठी मार्गदर्शन शिबिर असे सामाजिक उपक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवण्यात आले. त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओ, शहीद परिवाराला मदत व सन्मान मिळवून देणे, शहीद जवानांचे नगर मध्ये स्मारक, संग्रहालय व्हावे यासाठी पाठपुरावा करणे, सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन करणे, असे सामाजिक उपक्रम या माध्यमातून राबवण्यात आले आहेत.
फाउंडेशनने श्रमदानातून बांधला बंधारा
कायम दुष्काळात होरपळणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील कोल्हार या गावातील जानदरा येथे जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांनी श्रमदान करून बंधारा बांधला आला आहे. दर महिन्याला आम्ही आमच्या वेतनातून काही ठराविक रक्कम बाजूला ठेवून प्रत्येक शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज देण्याचा आमचा उपक्रम आहे. आतापर्यत फाउंडेशनच्या माध्यमातून दहा हजार राष्ट्रध्वज शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.
- शिवाजी पालवे,अध्यक्ष, जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.