आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदला : इराणचा इराकमधील बगदादच्या अमेरिकी दूतावासाजवळ रॉकेट हल्ल्यासह बॉम्बफेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बगदाद/वॉशिंग्टन : अमेरिकी हल्ल्यात इराणचे ज्येष्ठ लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाल्यावर दुसऱ्याच दिवशी शनिवारी सायंकाळी इराकमध्ये अमेरिकी ठिकाणांवर हल्ले झाले. इराकच्या अल-बालाद एअरबेसवर दोन रॉकेट डागले गेले. येथे सध्या मोठ्या संख्येने अमेरिकी जवान आहेत. दरम्यान, बगदादमध्ये अमेरिकी दूतावासाच्या ग्रीन झोनमध्ये दोन बॉम्ब पडले. हल्ल्यानंतर अमेरिकेतील सर्व शहरांत अलर्ट देण्यात आला आहे. मोसूलमध्ये राष्ट्रपती भवन परिसरातही बॉम्ब पडले आहेत. या बॉम्बहल्ल्यांत ५ लोक जखमी झाले. काही कारचेही नुकसान झाले. दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद जरीफ यांनी द. आशियातील अमेरिकी अिस्तत्वाच्या अंताचा हा प्रारंभ असल्याचे म्हटले आहे. सुलेमानी मारले गेल्यानंतर इराक आपल्या देशातील अमेरिकी ठिकाणांवर तसेच तळांवर कारवाई करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कताइब हिजबुल्लाह मिलिशियाने इराकी लष्कराला रविवारी सायंकाळपर्यंत अमेरिकी तळापासून १ किमी दूर जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अमेरिका व इराणमधील तणाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

बगदादमध्ये ग्रीन झाेन आणि एअरबेस हे लक्ष्य, पाच जण जखमी

ज्या एअरबेसवर हल्ला, तेथे आहेत अमेरिकी सैनिक

१० चौरस किमीत विस्तारलेल्या बगदादचे ग्रीन झोन २००३ मधील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय हालचालींचे केंद्र आहे. अति संरक्षणाच्या ग्रीन झाेनमध्ये संसद, मंत्रालय आणि दूतावास आहेत. अल आबाद एअरबेसवर मोठ्या संख्येने अमेरिकी सैनिक थांबलेले आहेत. मोसूलच्या राष्ट्रपती भवनातही अमेरिकी सैन्य अधिकारी राहतात.

इराणने मशिदीवर लाल ध्वज फडकावला, म्हणजे आता युद्ध 

सुलेमानीच्या सन्मानार्थ इराणने जमकरान मशिदीवर पहिल्यांदाच लाल ध्वज फडकावला आहे. महायुद्धाचे हे संकेत आहेत. पूर्वी कधीच पाहिले नाही,अशा युद्धाकडे इराण समाजाला घेऊन जात अाहे, असाही त्याचा अर्थ आहे.

अमेरिकेने आखातात ३५०० सैनिक पाठवले

सुलेमानीच्या मृत्यूनंतर अमेरिका आखातात आणखी ३५०० सैनिक पाठवणार आहे. इराक, कुवेत आणि इतर भागात हे सैनिक तैनात असतील. ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनचे हे सैनिक आधीच तेथे असलेल्या ६५० जवानांची मदत करतील.

सुलेमानीच्या मृत्यूमुळे युद्ध होणार नाही : ट्रम्प

अमेरिकेकडून इराणी कमांडरच्या हत्येनंतर विश्लेषकांनी तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी दावा केला की युद्ध होणार नाही. ट्रम्प या वेळी म्हणाले की, सुलेमानीने अनेक निष्पापांची हत्या केली होती.

ट्रम्प यांचा दावा : सुलेमानीने लंडन ते दिल्लीपर्यंत हल्ल्यांचा कट रचला होता

दरम्यान, शनिवारी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, इराणचे मेजर जनरल आणि कुद्स फोर्सचे प्रमुख कासिम सुलेमानी यांनी नवी दिल्ली ते लंडनपर्यंत हल्ल्याचा कट केला होता. ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याने भारताची चिंता वाढवली आहे. सुलेमानींच्या कटानुसार भारतात झालेल्या हल्ल्याचा थेट उल्लेख ट्रम्प यांनी केला नसला तरी २०१२ मध्ये इस्रायलच्या संरक्षण दलातील अधिकाऱ्याच्या पत्नीवर नवी दिल्लीत झालेल्या हल्ल्याचा संदर्भ याच्याशी जोडला जात आहे. कारला मॅग्नेट जोडून हा स्फोट घडवण्यात आला होता. यात ताल येहोशुआ कोरेन जखमी झाल्या होत्या.