आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्र्यंबक कापडे
tryambak.k@dbcorp.in
चंद्रपूर असो की वाघोड, दारूबंदीचा निर्णय कठोरपणे घेतला पाहिजे. कारण जेथे बंदी आहे, तेथे बोगस दारू पोहोचते आणि ती सर्वाधिक हानिकारक ठरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा निर्णय हटवून तेथे पुन्हा दारू विक्रीला परवानगी द्यावी, या निर्णयाप्रत राज्य शासन आले आहे. दारूबंदी केल्यानंतरही सर्वाधिक दारू चंद्रपुरात विकली जाते, अशी माहिती समोर आली आहे. राज्य शासनाचा महसूल बुडवून अवैध आणि अप्रमाणित दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असेल, तर दारू विक्रीला परवानगी दिलेलीच बरी, असे मत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच मांडले होते. तथापि, दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील वाघाेड येथे महिलांनी दारू दुकाने जाळून आंदोलन केल्यामुळे बंदी असलेल्या गावात आणि जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी द्यायची किंवा नाही, हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
रावेर तालुक्यातील वाघोड गावात बंदी असताना काही लोक राजरोसपणे देशी दारू विक्री करतात. हा प्रकार चार वर्षांपासून सुरू आहे. अखेर या गावातील संतप्त महिलांनी दारू विक्रेत्यांना मारहाण करत दुकानेही जाळली. या घटनेमुळे तालुक्यात तणावही निर्माण झाला होता. याच प्रकारची स्थिती दारूबंदी असलेल्या अनेक गावांमध्ये आहे. जेथे दारूबंदी आहे, तेथे पोलिसांच्या सहकार्याने दारू विक्री केली जाते. लपूनछपून दारू विक्री होत असेल, तर तो निश्चितच 'डी माल' असतो. 'डी माल' म्हणजे बोगस, बनावट दारू. या दारूमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बंदी असलेल्या जिल्ह्यात आणि गावात दारू विक्री करून अनेकांनी उखळ पांढरे करून घेतले; पण त्यांच्या या अवैध कृत्यामुळे अनेक महिलांवर कपाळ पांढरे होण्याची वेळ आली आहे. अति दारू सेवनामुळे अनेकांच्या संसाराची धूळधाण झाली. त्यामुळे महिलांच्या पुढाकारातून दारूबंदीचा निर्णय समोर आला. त्याचे सर्वदूर स्वागत झाले. पण, कालांतराने त्याचे पडसाद वेगळेच उमटले. बंदी असली तरी गावात दारू मिळू लागली. मग पोलिसांनी हप्ते सुरू केले. विक्रेत्यांना एकप्रकारे कवच प्राप्त झाले. दारू मिळत नाही म्हटल्यावर बोगस दारू विक्री होऊ लागली. जेथे बंदी तेथे दारूचा महापूर, हे समीकरणच झाले आहे.
आपण चंद्रपूर आणि रावेरमधील घटनांचा विचार करत असलो, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. आजही तेथे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू पाठवली जाते. याचाच अर्थ दारूबंदी असली, तरी तेथे ती लपूनछपून का होईना, पण सहज मिळते. म्हणजे दारूबंदीच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची वेळ आली. चंद्रपूर असो की वाघोड, दारूबंदीचा निर्णय घ्यायचा असेल, तर तो कठोरपणे घेतला पाहिजे. कोणत्याही मार्गाने या गावात आणि जिल्ह्यात दारू पोहाेचणार नाही, हे पाहिले पाहिजे. कारण जेथे बंदी आहे तेथे सर्वाधिक बोगस दारू पोहोचते आणि ती सर्वाधिक हानिकारक ठरत आहे. अधिकृत परवाना असलेल्या गावांत बोगस दारू विक्रेत्यांवर निदान कारवाई तरी होते. पण, बंदी असलेल्या गावांत अधिक दुष्परिणाम जाणवायला लागले. त्याचे कारण म्हणजे प्रशासनाचे दुर्लक्ष. त्यामुळे शासनाला दारूबंदीबाबत जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा, पण अंमलबजावणी प्रामाणिक झाली पाहिजे. जेणेकरून शासनाचा निर्णय सामान्यांच्या जीवावर उठणारा नसावा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.